झिरो पेशंट झिंगेवाली! | पुढारी | पुढारी

झिरो पेशंट झिंगेवाली! | पुढारी

एड्स, स्वाईन फ्लू, मर्स, सार्सनंतर एक नवा रोग व नवा विषाणू म्हणून कोरा करकरीत कोरोना आला आणि बघता बघता अवघे विश्‍व त्याने कवेत घेतले. डिसेंबर 2019 मध्ये त्याचा उद्भव झाला म्हणून आणि करोना कुटुंब कबिल्यातला म्हणून त्याला ‘कोव्हिड-19’ असे काहिसे गोंडस भासणारे नाव जागतिक आरोग्य संघटनेने दिले. सार्स आणि मर्स हे याआधी उद्भवलेले साथरोगाचे विषाणू हे कोरोना कुटुंबातलेच. मग, नव्या ‘कोव्हिड-19’ ची पहिली लागण कुणाला झाली असावी, हा प्रश्‍न कोल्हापूरपासून ते क्‍वालालंपूरपर्यंत जगाच्या कानाकोपर्‍याला पडलेला होता. अखेर या प्रश्‍नाचे उत्तर मिळाले आहे. जगातल्या पहिल्या कोरोना संक्रमिताची माहिती उघड झाली आहे. वुहान येथील सी फूड मार्केटमध्ये (मटण बाजारात) झिंगे विकणार्‍या वेई गुझियान या 57 वर्षांच्या महिलेला सर्वांत आधी कोरोनाची लागण झाली होती, असा दावा चीनमधील एक न्यूज वेबसाईट ‘द पेपर’ने केला आहे. 

…अन् विषय वार्‍यावर उडाला

सर्वांत आधी 6 मार्च रोजी ‘द वॉल स्ट्रिट जर्नल’ने झिरो पेशंट म्हणून वेई गुझियानचे नाव छापले होते. जेरेमी पेज, वेंझिंग फॅन आणि नताशा खान यांनी दिलेल्या या वृत्तातून चीनच्या चुकांवर बोट ठेवण्यात आले होते; पण यादरम्यान कोरोनाच्या प्रादुर्भावाची हवा इतक्या वेगाने जगभरात वाहिली, की झिरो पेशंटचा विषय कुठल्या कुठे उडून गेला. चीनच्या चुकांची चर्चाही बंद झाली. जानेवारी 2020 पर्यंत झिरो पेशंट बरीही झाली होती.

झिरो पेशंट म्हणजे काय?

वेई गुझियान हिला या वेबसाईटने झिरो पेशंट जाहीर केले आहे. एखाद्या नव्या साथीच्या पहिल्या रुग्णाला झिरो पेशंट म्हटले जाते. ‘द पेपर’ने 31 डिसेंबर रोजी वुहान महानगर आरोग्य आयोगाच्या पहिल्या 27 रुग्णांच्या यादीचा हवाला दिला आहे. यादीत वेई गुझियान हिचा पहिला क्रमांक आहे. यादीतील 27 पैकी 24 सुरुवातीचे रुग्ण हे वुहान मटण मार्केटशी संबंधित आहेत, हे विशेष!  महिनाभर वेई गुझियानवर इलाज चालला आणि ती एकदम ठणठणीत झाली आहे. अवघे जग आपापल्या घरात कोंडलेले असताना परवा ती वुहानमध्ये मैत्रिणींसह मजेत सिनेमा बघत होती. चीनमध्ये आता कोरोना ओसरलेला आहे. मॉल, चित्रपटगृहे सुरू झालेली आहेत.

कोण काय म्हणते?

‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने म्हटले आहे, की 10 डिसेंबर 2019 रोजी वेईला कोरोनाची बाधा झाली. स्वत: वेईचे म्हणणे आहे, की तिने मार्केटमधीलच एका सार्वजनिक शौचालयाचा वापर केला आणि नंतर तिला ताप, सर्दी सुरू झाली. 

ब्रिटनमधील ‘द मिरर’, सिडनीतील ‘न्यूज डॉट ऑस्ट्रेलिया’व्यतिरिक्‍त भारतातील पीटीआय तसेच आयएएनएसनेही ही महिला जगातील कोरोनाची पहिली रुग्ण असल्याच्या बातम्या दिल्या आहेत.

अर्थात, चीन सरकारने याला अधिकृत दुजोरा अद्याप दिलेला नाही. उलट चिनी वृत्तपत्र  ‘ग्लोबल मीडिया’ने कोरोना विषाणू अमेरिकन लष्कराच्या प्रयोगशाळेत विकसित करण्यात आल्याचा आरोप केला आहे. 

चिनी वृत्तपत्र पुढे म्हणते, की वुहान येथे ऑक्टोबरमध्ये झालेल्या ‘वर्ल्ड मिल्ट्री गेम्स’दरम्यान मजाट्जे बेनासी हा सायकलपटूच कोरोना विषाणूचे उगमस्थळ होते. यानंतर चीन आणि अमेरिकेमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले. 

वेई गुझियान ते पहिले 266 रुग्ण

‘द वॉल स्ट्रिट जर्नल’च्या वृत्तानुसार वेई गुझियानच्या संपर्कात आल्याने त्यांची कन्या, भाची आणि पती बाधित झाले. शिवाय वुहान सी फूड मार्केटमधील जे व्यापारी तिच्या संपर्कात आले तेही संक्रमित झाले. 

सुरुवातीच्या या 266 लोकांची ओळख चीन सरकारने पटविलेली आहे. चीन सरकारने योग्य ती पावले तेव्हाच उचलली असती, तर जगात आज हा हाहाकार माजला नसता, अशी टिपणीही केली आहे.

मला थंडी पडली, की दरवेळेला सर्दीचा त्रास होतो. यावेळेलाही मला तसेच वाटले; पण नंतर हे तसे नाही, असे जाणवले आणि मी वुहानच्या द इलेवंथ हॉस्पिटलमध्ये दाखविले. तिथेही कुणाला काही निदान करता आले नाही. 5 दिवसांनी माझी शुद्ध हरपायला लागली. 16 डिसेंबरला मी वुहान युनियन हॉस्पिटलमध्ये गेले. मला ‘दुर्धर’ आजार जडल्याचे समजले. हॉस्पिटलवाल्यांनी मला हेही सांगितले, की तुमच्यासारखेच (याच लक्षणांचे) आणखीही काही पेशंट आलेले आहेत. डिसेंबरच्या अखेरीस मला क्‍वारंटाईन करण्यात आले. 

– वेई गुझियान, कोरोनाची पहिली रुग्ण, झिंगेवाली, सी फूड मार्केट, वुहान

Back to top button