जगभरात ५८ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण | पुढारी

जगभरात ५८ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण

मॉस्को : पीटीआय

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात येत असल्यामुळे हळूहळू रूग्णसंख्येत वाढ होत असलेल्या रशियामध्येही धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेत कोरोना बळींच्या संख्येने एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. याचा अर्थ, व्हिएतनाम आणि कोरियन युद्धात एकत्रितपणे ठार झालेल्या लोकांपेक्षाही अधिक संख्येने अमेरिकी लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात कोरोनाने 58 लाख 3 हजार 785 लोक बाधित झाले आहेत. 25 लाख 8 हजार 944 रूग्ण बरे झाले आहेत. बळींचा आकडा 3 लाख 57 हजार 714 झाला आहे.

दक्षिण कोरियामध्येही गुरूवारी गेल्या 50 दिवसांनंतर प्रथमच उच्चांकी नवे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे कठीण परिस्थितीत विजय मिळवता येऊ शकतो अशा प्रकारचा आदर्श जगासमोर ठेवलेल्या या देशाच्या प्रतिमेला मोठा झटका बसला आहे. दुसर्‍या  बाजूला रशियामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात नवे रूग्ण आढळत असल्यामुळे अर्थव्यवस्था खुली करण्याचा धोका अधोरेखित झाला आहे. रशियामध्ये गुरूवारी कोरोनाचे 8,300पेक्षा अधिक नवे रूग्ण आढळले आहेत. बाधितांची एकूण संख्या 3 लाख 79 हजार झाली आहे. अमेरिका आणि ब्राझील यांच्यानंतर रशियात सर्वाधिक रूग्ण आढळले आहेत. रशियामध्ये आतापर्यंत 4,142 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 101 डॉक्टरांचा समावेश आहे. लॉकडाउनमधील निर्बंधात शिथिलता आणल्यामुळे रशियातील कोरोनाचा धोका वाढत चालला आहे.

रशियात गेल्या पंधरा दिवसांपासून 8 हजारपेक्षा अधिक नवे रूग्ण आढळत आहेत. अमेरिकेत लास वेगास कसिनो आणि वॉल्ट डिस्ने वर्ल्ड पुन्हा सुरू करण्याचा विचार सुरू झाला आहे. त्यातच उन्हाळ्याच्या महिन्यांमुळे अमेरिकी नागरिक मास्क न घालताच बिचवर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. अन्य काही देशांत मात्र कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. स्पेन आणि इटलीमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून नवीन रूग्णांची संख्या घटत चालली आहे.

चाचणी न करताच अनेकांचा मृत्यू

जगभरातील अनेक कोरोनाबाधित लोकांचा मृत्यू चाचणी न करताच झाला असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसमुळे होणार्या मृत्यूंची संख्या प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर असल्याचे मानले जात आहे. चाचणीचे विविध स्तर दिले गेल्यामुळे आणि काही बळी मोजले न गेल्यामुळे देशांची तुलना करणे कठीण असल्याचेही बोलले जात आहे.

Back to top button