भारत-चीन सीमा प्रश्नात ट्रम्‍प यांची मध्यस्‍थी चीनने धुडकावली | पुढारी

भारत-चीन सीमा प्रश्नात ट्रम्‍प यांची मध्यस्‍थी चीनने धुडकावली

बीजिंग : पुढारी ऑनलाईन

भारत आणि चीन या दोन देशांमधील सीमेवर गेल्‍या काही दिवसांपासून तणावपूर्ण परिस्‍थिती निर्माण झाली आहे. त्‍यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. अशा परिस्‍थितीत भारत आणि चीन या दोन देशांतील सीमा प्रश्नात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प यांनी मध्यस्‍थी करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. तसा प्रस्‍ताव ट्रम्प यांनी दोन्ही देशांना कळवला होता. मात्र ट्रम्‍प यांचा प्रस्‍ताव चीनकडून धुडकावून लावण्यात आले आहे.

यावर एका वृत्‍त संस्‍थेच्या वृत्‍तानुसार चिनी परराष्‍ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्‍याने चीन आणि भारत हे द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून या मुद्याचे निराकरण करण्यात आम्‍ही सक्षम आहेत, असे म्‍हटले आहे. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनमध्ये उद्भवलेल्या ताज्या सीमावादावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलल्याचे सांगितले होते. त्यांनी चीन सोबत सुरु असलेल्या सीमावादाबाबत मोदी हे चांगल्या मूडमध्ये नसल्याचे स्पष्ट केले होते. याचबरोबर ट्रम्प यांनी भारत आणि चीन यांच्या सीमावादात आपण मध्यस्थाची भुमिका निभावण्यास तयार असल्याचे सांगितले होते.

ट्रम्प यांना त्यांनी बुधवारी केलेल्या मध्यस्थी करण्याबाबतच्या ट्विटसंदर्भात विचारले असता त्यांनी, ‘जर भारत आणि चीनला याचा फायदा होईल असे वाटत असेल तर मी मध्यस्थी करायला तयार आहे.’ असे सांगितले. पण, ट्रम्प यांनी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींशी कधी बोलले हे स्पष्ट केले नाही.   

ट्रम्प यांच्या या मध्यस्थीच्या प्रस्तावावर भारताने काल गुरुवारी आम्ही सीमावाद शांततेने सोडवण्यासाठी चीन बरोबर चर्चा सुरु केली आहे असे सांगितले होते. भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दोन्ही देशांनी लष्करी तसेच राजनैतिक स्तरावर सीमा वाद सोडवण्यासाठी व्यवस्था एक प्रस्थापित केली आहे. याद्वारे चर्चा करुन शांततेने हा वाद सोडवला जाईल, असे सांगितले. सीमेवरील तणाव दूर करण्यासाठी भारत आणि चीनच्या फिल्ड कमांडरनी चर्चा सुरु केली आहे.  

Back to top button