ट्रम्प यांच्या ‘या’ निर्णयाचा भारतीयांना मोठा फटका | पुढारी

ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाचा भारतीयांना मोठा फटका

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

अमेरिकेत कोरोना व्हायरसने हाहाकार घातला आहे. अमेरिकेत कोरोना बाधितांची संख्याही अधिक आहे. त्यात लॉकडाऊन लागू झाल्याने अमेरिकेची अर्थव्यवस्था ढासळली आहे. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी एच-१ बी, एच-४ व्हिसा निलंबित करण्याची घोषणा केली असून त्यामुळे भारतासह जगातील आयटी कंपन्यातील कामगार आणि अन्य आयटी व्यावसायिकांना मोठा फटका बसणार आहे. 

अमेरिकेत कोरोना महामारीमुळे बेरोजगारीचा दर अचानक वाढला आहे. बेरोजगारी कमी करण्यासाठी आणि अमेरिकेच्या  नागरिकांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या हा निर्णय तात्पुरत्या स्वरूपाचा घेण्यात आला आहे. 

अमेरिकेत असंख्य लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. त्यामुळे एच-१ बी व्हिसा रद्द करण्याच्या निर्णयामुळे अमेरिकेतील भारतीय आयटी कंपन्या आणि नोकरदारांना फटका बसणार आहे. वर्षाच्या अखेरपर्यंतच एच-१ बी, एच-४ हे व्हिसा लागू राहणार आहेत. 

गुगलच्या सीईओ सुंदर पिचाई यांनीही या निर्णयावर निराशा व्यक्त केली आहे. सुंदर पिचाई यांनी म्हटले आहे, प्रवाशांनी अमेरिकेला आर्थिकरित्या मजबूत बनवण्यासाठी मदत केली आहे आणि राष्ट्राला तंत्रज्ञान क्षेत्रात अव्वल बनवलं. त्यामुळे आज गूगल या स्थानी आहे. मी सरकारच्या इमिग्रेशनशी संबंधित निर्णयांवर निराश आहे. आम्ही प्रवाशांसोबत आहोत आणि त्यांना प्रत्येक संधी देण्यासाठी काम करत राहू.  

तर जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही ट्विटरवरून अमेरिकेच्या या निर्णयाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रोहित यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे-H1B व्हिसा कार्यक्रम रद्द करण्याचा प्रशासनाचा निर्णय निराशाजनक आहे. व्हिसाधारक व नूतनीकरण करणाऱ्यांना याचा फटका बसणार नाही, अशी मी अपेक्षा करतो. आज ‘जागतिक नेते’ वैयक्तिक मैत्रीच्या गोष्टी करत असताना या मैत्रीचा देशाला काहीही फायदा होत नसल्याचं आपण सध्या अनुभवतोय.’

 

Back to top button