रशियाकडून भारत खरेदी करणार ४५ हजार टन पाम तेल! | पुढारी

रशियाकडून भारत खरेदी करणार ४५ हजार टन पाम तेल!

कोल्हापूर; राजेंद्र जोशी : रशिया-युक्रेन यांच्या दरम्यान लांबलेल्या युद्धाचा फटका भारतीय तेल बाजाराला बसला आहे. युद्धामुळे जागतिक पातळीवर क्रूड ऑईलच्या किमतींचा आलेख वाढल्यामुळे डिझेलच्या किमतींनी आता भारतात प्रतिलिटर शंभरी पार केली आहे. पेट्रोलच्या किमती वाढत आहेतच. शिवाय, खाद्यतेलाच्या आघाडीवरही भारताला रशियाकडून पाम तेलाच्या खरेदीत टनामागे तब्बल 520 डॉलर्सचा फटका बसला आहे.

भारत हा जगातील पाम तेलाच्या आयातीतील सर्वात मोठा ग्राहक समजला जातो. भारतात मलेशिया, इंडोनेशिया, युक्रेनमधून प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात पाम तेलाची आयात केली जाते. यंदा युक्रेनमधील युद्धस्थितीमुळे तेथून आयातीचे मार्ग पूर्ण बंद झाले आहेत. इंडोनेशियाने पाम तेलाच्या पुरवठ्यावर बंधने आणली आहेत आणि दक्षिण अमेरिकेत सोयाबीनच्या उत्पादनात घसरण झाली आहे. यामुळे भारतापुढे पाम तेलाच्या आयातीविषयी मोठा प्रश्‍न होता. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी रशिया भारताच्या मदतीला धावून आले. परंतु, तेथील पाम तेलाच्या खरेदीसाठी भारतीय उद्योगांना चढ्या भावाने खरेदी करावी लागते आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी जागतिक बाजारामध्ये भारताला प्रतिटन 1630 डॉलर्स या दराने पाम तेल उपलब्ध होत होते. आता युद्धस्थिती बिकट झाल्याने रशियाकडून हे तेल खरेदी करण्यासाठी प्रतिटन 2150 डॉलर्स मोजावे लागताहेत.

भारतात सध्या खाद्यतेलांची बाजारपेठ भडकली आहे. अशा स्थितीत पामतेलाची आयात बाजारातील किंमत रोखण्यास नेहमी मदत करते. तेलांचे भाव स्थिर होतात आणि ग्राहकांना दिलासा मिळतो. सध्या तेलाची टंचाईही जाणवू लागल्याने खाद्यतेलाच्या व्यवसायामध्ये असलेल्या भारतीय उद्योगांनी नुकतेच रशियन कंपन्यांबरोबर पामतेल खरेदीचे करार केले आहेत. या करारानुसार 45 हजार टन पाम तेल भारतात आयात केले जाणार आहे. यामध्ये खाद्यतेलाच्या बाजारपेठेत अग्रेसर असलेल्या जेमिनी इडिबल अँड फॅटस् इंडिया या कंपनीच्या 12 हजार टन पाम तेल आयातीचा समावेश आहे. एप्रिलमध्ये हे तेल भारतीय बाजारात उपलब्ध होऊ शकते. यामुळे खाद्यतेलाच्या किमती खाली येऊन ग्राहकांना थोडा दिलासा मिळू शकेल, अशी अपेक्षा आहे.

Back to top button