Stock Market Updates | गुजरात- हिमाचलच्या निकालानंतर शेअर बाजारात चढ-उतार, सेन्सेक्स ६२,५७० वर बंद | पुढारी

Stock Market Updates | गुजरात- हिमाचलच्या निकालानंतर शेअर बाजारात चढ-उतार, सेन्सेक्स ६२,५७० वर बंद

Stock Market Updates : गुजरातमध्ये भाजपने विक्रमी बहुमताची आघाडी मिळवली. तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने विजयी आघाडी घेतली. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.८) शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीत चढ-उतार दिसून आला. सेन्सेक्स १६० अंकांनी वाढून ६२,५७० वर तर निफ्टी ४८ अंकांनी वधारून १८,६०९ वर बंद झाला.

दरम्यान, आज सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टीने स्थिर सुरुवात केली होती. त्यानंतर दोन्ही राज्यांतील निवडणूक निकालांचे कल येताच दोन्ही निर्देशांकात चढ-उतार दिसून आला. गुजरातमध्ये भाजपने बहुमताकडे वाटचाल केल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीत काही प्रमाणात तेजी दिसून आली होती.

गुजरातमध्ये भाजपने १५६ जागांवर विक्रमी आघाडी मिळवली. तर काँग्रेस १७, आप ५ जागांवर आघाडीवर आहे. गुजरातमधील भाजपच्या विक्रमी बहुमतामुळे शेअर बाजारात सकारात्मक वातावरण तयार झाल्याचे चित्र होते.

हे शेअर्स घसरले….

एसबीआय लाइफ, पॉवरग्रिड, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी लाइफ आणि टाटा मोटर्स यांचे शेअर्स आज NSE वर १.३५ टक्क्यांपर्यंत घसरले. याउलट आयशर मोटर्स, एल अँड टी, एम अँड एम, अपोलो हॉस्पिटल्स आणि अदानी एंटरप्रायझेस यांचे शेअर्स आघाडीवर होते.
बँक ऑफ इंडियाचा शेअर ७.२२ टक्क्यांनी वाढून ९९.६५ रुपयांवर गेला. या शेअरने दिवसभरात १०० रुपयांचा उच्चांक गाठला. या शेअरची उलाढाल ३७.१८ कोटी रुपये झाली. एनडीटीव्हीचे शेअर २.६३ टक्क्यांनी घसरून ३४४.४० रुपयांवर आला. बँक ऑफ बडोदाचा शेअर ५.४४ टक्क्यांनी वधारून १८६.१० वर पोहोचला.

हे मुद्देदेखील शेअर बाजारातील व्यवहाराला कारणीभूत ठरले

जगभरात आर्थिक मंदीचे सावट आहे. तसेच महागाई उच्च स्तरावर पोहोचली आहे. हे मुद्दे देखील शेअर बाजारातील व्यवहाराला कारणीभूत ठरले. अमेरिकेतील प्रमुख निर्देशांकांत घसरण झाल्याचे पडसाद आशियाई बाजारात दिसून आली. आशियाई बाजारात संमिश्र वातावरण होते. जपानचा निक्की निर्देशांक ०.७४ टक्क्यांनी आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.७७ टक्क्यांनी घसरला. तर चीनचा शांघाय कंपोझिट ०.१६ टक्क्यांनी खाली आला आहे. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक मात्र १.४५ टक्क्यांनी वधारला. गुरूवारी आशियाई बाजारांत सुरुवातीच्या व्यवहारात तेलाच्या किमती स्थिर होत्या.

आरबीआयने रेपो दर ३५ बेसिस पॉईंटने वाढवल्यानंतर शेअर बाजाराचा सेन्सेक्स बुधवारी २१५ अंकांनी घसरला होता. तर निफ्टी ८२ अंकांनी म्हणजेच ०.४४ टक्क्यांनी घसरून १८,५६० वर बंद झाला होता. (Stock Market Updates)

NSE आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी बुधवारी १,२४१.८७ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली, तर स्थानिक गुंतवणूकदारांनी ३८८.८५ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. दरम्यान, ब्रेंट क्रूड फ्यूचर्स ०.७९ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ७७.७८ डॉलरवर पोहोचले.

हे ही वाचा :

Back to top button