गोव्यातून सैनिकांसाठी 27 हजार राख्या पाठवणार | पुढारी

गोव्यातून सैनिकांसाठी 27 हजार राख्या पाठवणार

पणजी; पुढारी वृत्तसेवा : भूमीचे, जनतेचे आणि धर्माचे रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज सारखे योद्धे आम्हांला दैवतासमानच आहेत. देशाचे संरक्षण करणारे सैनिकही आम्हाला दैवतासमान आहेत. अधिसूचना काढून अमुक व्यक्तीला देव माना, संत माना अशी भारताची परंपरा नाही. लोकाना जे वंदनीय वाटतात ते आम्हाला देवासमान ठरतात. सैनिकाप्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठीच गोव्यातून 196 शाळा व स्थानिक नागरिकांकडून जमा केलेल्या 23 हजार राख्या सैनिकांना पाठवल्या जातील, असे प्रतिपादन बिहारचे राज्यपाल तथा चैतन्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र आर्लेकर यांनी आज सोमवारी केले.

चैतन्य प्रतिष्ठानतर्फे एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम आज राबवण्यात आला. राज्यभरातून तब्बल 26 हजार राख्या घेऊन विद्यार्थी व नागरिक मोठ्या संखेने या वेळी जमा झाले होते. या राख्या सैनिकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत.

या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबाळे, पणजी जिमखान्याचे अध्यक्ष उद्योजक मनोज काकुलो, ब्रिगेडियर अजय सिंग साहणी व कमांडर श्रीवास्तव उपस्थित होते.

या प्रसंगी आर्लेकर म्हणाले की गेली दहा वर्षे चैतन्य प्रतिष्ठानतर्फे सैनिकांसाठी राख्या जमा करून त्या पाठवण्यात येतात. गेली दोन वर्षे आपण हिमाचल प्रदेशचा राज्यपाल असताना प्रत्यक्ष सैनिकापर्यंत जाऊन त्याना राखी बांधल्या. गेल्या वर्षी 10 हजार राख्या जमा झाल्या होत्या. यंदा 27 हजार झाल्या. यावरून गोवेकरांचा सैनिकांप्रति आदर वाढल्याचे सिद्ध होत असल्याचे सांगून सीमेवर देशाचे रक्षण करणार्‍या सैनिकांच्या पराक्रमाची आठवण म्हणून हा उपक्रम आयोजित केल्याचे आर्लेकर म्हणाले. देशविरोधी घोषणा देणार्‍यांत राष्ट्रभक्ती प्रज्वलित करण्याची आज गरज असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.

एक राखी सैनिकांसाठी हा देशप्रेम आणि चैतन्य निर्माण करणारा उपक्रम असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. चैतन्य प्रतिष्ठानमुळे सैनिकांना राखी पाठवण्याचे भाग्य गोमंतकीयांना लाभल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. याप्रसंगी विविध शाळातून आलेल्या मुलींनी
सैन्याचे ब्रिगेडियर अजयसिंग साहणी व नौदलाचे कमांडर श्रीवास्तव यांच्यासह मान्यवरांचे औक्षण केले व त्यांना राख्या बांधून गोवेकरांनी जमा केलेल्या राख्या सैन्याच्या स्वाधीन केल्या.

गोवेकरांनी सैन्यात जावे

गोव्यातील लोक सुसंस्कृत, देशाप्रति त्यांच्यामध्ये आदरही मोठा आहे, मात्र सैन्यामध्ये गोवेकरांची संख्या अल्प आहे. त्यामुळे गोमंतकीयांनी सैन्यामध्ये भरती व्हावे असे आवाहन होसबाळे यांनी या वेळी केले. एक राखी सैनिकांसाठी हे देशप्रेमाची भावना जागृत करणारा अद्भुत आणि अनोखा असा उपक्रम असल्याचे सांगून सैन्याप्रतिचा आदरभाव आम्ही दर दिवशी व्यक्त करणे गरजेचे असल्याचे होसबाळे म्हणाले.

गोव्यामध्ये होणार सैनिक स्कूल

चैतन्य प्रतिष्ठानच्या संचालक अनघा आर्लेकर यांनी गोव्यामध्ये चैतन्य प्रतिष्ठान तर्फे सैनिक स्कूल होणार असल्याचे या वेळी जाहीर केले.

Back to top button