गोव्यात अनधिकृत घरांना पाणी बील दुप्पट दराने : मंत्री नीलेश काब्राल | पुढारी

गोव्यात अनधिकृत घरांना पाणी बील दुप्पट दराने : मंत्री नीलेश काब्राल

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  सार्वजनिक बांधकाम खाते यापुढे अनियोजित पद्धतीने बांधलेली घरे किंवा बेकायदा वस्त्यांना दुप्पट पाणी बिल आकारण्याबाबत विचार करत आहे. मंत्री नीलेश काब्राल यांनी ही माहिती दिली. गुरुवारी खोर्ली येथे समतल जलाशय प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार राजेश फळदेसाई, सरपंच लुसियानो परेरा, कुष्टा सालेलकर उपस्थित होते.

काब्राल म्हणाले, वैध घरांना पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहे. यासाठीच आम्ही अवैध घरांना दुप्पट पाणी कर आकारण्याचा विचार करत आहोत. अशी घरे बांधताना सेटबॅक सोडण्यात येत नाही, मोकळ्या जागाही नसतात. अशा अनियोजनामुळे जलवाहिन्या टाकण्यासाठी जागा उरत नाही. केवळ जलाशय किंवा टाक्या बांधून उपयोग होणार नाही. यासाठी लोकांनी पाण्याचा वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे.

काब्राल म्हणाले, लोकांनी पाण्याची टाकी बांधण्यासाठी जागा देणे आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम खाते 2012 पासून अशा प्रकल्पांसाठी जमिनी संपादित करत नाही. सध्या केवळ महामार्ग बांधण्यासाठीच जमीन संपादित केली जात आहे. विकास हे भाजप सरकारचे ब्रीदवाक्य आहे. आम्ही आमची कामे जनतेला समर्पित करतो. आम्ही लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी येथे आहोत.

नवीन जलाशयाचा 500 घरांना फायदा

आमदार फळदेसाई म्हणाले की, या 800 घनमीटर क्षमतेच्या नवीन जलाशयाचा फायदा खोर्ली, मलार आणि मांगडो येथील 500 घरांना होणार आहे. पुढील काही काळात मतदारसंघातील पाण्याच्या सर्व समस्या सोडवल्या जातील. पावसाळ्यानंतर अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीचे कामही हाती घेतले जाणार आहे. भाजप सरकारच्या काळात मतदार संघात अनेक विकासकामे झालेली आहेत आणि यापुढेही होत राहतील.

Back to top button