गोवा : आरोग्य केंद्राची इमारत दीड वर्ष धूळखात; पार्किंगच्या जागेत रुग्णांवर उपचार | पुढारी

गोवा : आरोग्य केंद्राची इमारत दीड वर्ष धूळखात; पार्किंगच्या जागेत रुग्णांवर उपचार

मडगाव; विशाल नाईक : कोव्हिडमुळे राज्यात अडकून पडलेल्या अनेक सरकारी महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये कुडचडेतील कोट्यवधी रुपयांच्या आरोग्य केंद्राचाही समावेश होतो. 2014 मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाचे काम पूर्ण व्हायला सहा वर्षे लागली आहेत. बांधकामाचा भाग जरी पूर्ण झालेला असला तरीही फर्निचर, स्वयंपाक घर, अंतर्गत भागांची दुरुस्ती आणि मेडिकल गॅसच्या अभावी गेली दीड वर्षे इस्पितळाची ही इमारत तशीच धूळखात पाडलेली आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकार्‍यांवर पार्किंगसाठी तयार करण्यात आलेल्या तळ मजल्यात रुग्णांना वैद्यकीय सुविधा देण्याची वेळ आली आहे.

गेली सुमारे सहा वर्षे या इमारतीच्या पार्किंगच्या जागेत इस्पितळ सुरू आहे. ज्या ठिकाणी साधी व्हेंटिलेटरची सेवाही उपलब्ध नाही. सांगेत प्राथमिक आरोग्य केंद्र असूनही हव्या तशा सुविधा तिथे देण्यात आलेल्या नाही. त्यामुळे गंभीर स्थितीतील रुग्णांना थेट कुडचडेत आणले जाते. सांगे बरोबर सावर्डे मतदारसंघातील सावर्डेपासून ते दाभाळ पंचायतीपर्यंतचे लोक कुडचडेच्या वैद्यकीय केंद्रात येतात. त्याव्यतिरिक्त केपेतूनही रुग्णांना येथे आणले जाते. कुडचडेतील रुग्णांना याच इस्पितळाचा आसरा आहे. पण गेली सहा वर्षे रुग्ण हे इस्पितळ पूर्ण होण्याची वाट पाहत आहेत. कोव्हिडच्या काळात राज्यातील इतर सरकारी प्रकल्पांबरोबर कुडचडेचे आरोग्य केंद्रही तब्बल दोन वर्षें अडकून पडले होते. आता या इस्पितळाच्या इमारतीचा भाग शंभर टक्के पूर्ण झाला असूनही इस्पितळ तेथे स्थलांतरीत केले जात नसल्याबद्धल संताप व्यक्त केले जात आहे. तीन मजली इस्पितळ तयार असतांना रुग्णांना तळमजल्यावर सेवा दिली जाते. अपुर्‍या जागेत लोक रांगेत थांबून सेवा घेतात. इस्पितळाच्या भिंतीना तडे गेले आहेत.व्हेंटिलेटरवरचा अभाव असल्याने रुग्ण या इस्पितळात भरती होण्यापेक्षा मडगावच्या जिल्हा इस्पितळात जाणे पसंत करू लागले आहेत.

इस्पितळाच्या या नूतन इमारतीवर आतापर्यंत सुमारे चाळीस कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. लिफ्ट, वीज व्यवस्था, प्लम्बिंग आदी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. सर्व मजल्यांवर सीसीटीव्ही, आग आटोक्यात आणणारी यंत्रणा, शेड अशा सर्व सेवा इमारतीत उपलब्ध आहेत. बर्‍याच महिन्यांपूर्वी खाटा, खुर्च्या, इतर वैद्यकीय यंत्रसामग्री या इमारतीत आणण्यात आल्या होत्या. त्या तशाच पडून आहेत. त्यांचा वापर न झाल्याने पत्र्याच्या या वस्तू आता गंजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्लबिंग, वीज व्यवस्था, अग्निशमन यंत्रणा, लिफ्ट आदीवर सुमारे तीन कोटी रुपये सरकारने खर्च केले आहेत. स्वयंपाक घरातील साहित्य आणि फर्निचर आदी कोट्यवधीचे साहित्य गेले कित्येक महीने धूळखात पडून आहेत. त्या व्यतिरिक्त फॅन, वॉटर कुलर आदी विजेवर चालणारी यंत्रणाही वेळेत उपयोग करून न घेतल्यास खराब होऊ शकतात.

Back to top button