मडगाव पालिकेचा गणेशोत्सव; पैसे घेतले सात दिवसांचे; उत्सव दीड दिवस | पुढारी

मडगाव पालिकेचा गणेशोत्सव; पैसे घेतले सात दिवसांचे; उत्सव दीड दिवस

मडगाव ः रविना कुरतरकर येथील नगरपालिकेच्या गणेशोत्सव मंडळाने गेल्या पाच वर्षांपासून खर्चाची गोळाबेरीज न दाखविल्याने मंडळाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. पूर्वी सात दिवसांचा उत्सव साजरा करणारे मंडळ तीन वर्षांपासून केवळ दीड दिवसांत गणेश विसर्जन करत आहे; पण त्यासाठी कर्मचार्‍यांच्या पगारातून सात दिवसांच्या उत्सवाचे पैसे कापून घेतले जात आहेत.

मडगाव नगरपालिकेचे गणेशोत्सव मंडळ दरवर्षी सात दिवसांचा गणेशोत्सव साजरा करत होते. पालिका उद्यानात बाप्पा विराजमान होत होता. सात दिवसानंतर खारेबांद तेथील तळीवर विसर्जन होत होते. 2020 मध्ये कोरोना महामारीचे आल्याने बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव समितींनी दीड ते पाच दिवस गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मडगाव नगरपालिकेच्या गणेशोत्सव मंडळानेही गणपती दीड दिवस पुजण्याचा निर्णय घेतला. आता कोरोना महामारीचे सावट कमी झाल्याने राज्यात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा झाला; पण पालिकेच्या गणेशोत्सव मंडळाने यंदाही दीड दिवस हा उत्सव साजरा केल्याने कर्मचार्‍यांनी आश्चर्य व्यक्त केले.

पालिकेच्या एका कर्मचार्‍याने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सात दिवस गणपती पूजन केले जात होते. सुमारे 30 ते 40 इंच मूर्ती यावेळी आणली जात होती. दुपारची व रात्रीची आरती केली जात होती. सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगार यात सहभागी होत होते. आरती झाल्यावर प्रसाद व सहाव्या दिवशी सत्यनारायणाची पूजा बांधली जात होती. भाविकांना महाप्रसाद दिला जात होता. मात्र तीन वर्षांपासून सात ऐवजी केवळ दीड दिवसच गणपती पूजन केले जात आहे, असे त्यांनी सांगितले. वार्षिक पद्धतीनुसार होणारे सर्व कार्यक्रम रद्द केले. बाप्पांच्या मूर्तीचा आकारही लहान करून केवळ 16 ते 20 इंच मूर्ती आणली जाते.

प्रत्येक कर्मचार्‍यांकडून 250 तर रोजंदारीवर काम करणार्‍या कामगारांकडून 100 रुपये वर्गणी मंडळ घेते. त्याव्यतिरिक्त पालिका निधीतून 15 हजार रुपये मंडळाला मिळतात. वर्गणी स्वरूपात जमा होणार्‍या लाखो रुपयांचे काय केले जाते, याचा अहवाल पाच वर्षांपासून दिलेला नाही. मंडळाच्या सदस्यांना याविषयी विचारल्यास ते उडवाउडवीची उत्तरे देतात. मंडळाचे सदस्य काय ते पाहू, अन्य कोणाला विचारण्याचा अधिकार नाही, असे सांगितले जाते, अशी माहिती कर्मचार्‍यांनी दिली.

अनेक वर्षे तीच समिती

अनेक वर्षांपासून पालिका गणेशोत्सव मंडळाची समिती बदललेली नाही. या मंडळात एकूण सात सदस्य आहेत. पैकी पाच सदस्य निवृत्त झालेत. निवृत्त होऊनही मंडळात कार्यरत असल्याने कर्मचार्‍यांनी आश्चर्य केले. दीड दिवस गणपती पूजन का करतात, अशी विचारणा केल्यास श्री दांमबाबाचा प्रसाद दीड दिवसांसाठीच झाला असल्याचे उत्तर मंडळाचे सदस्य देतात.

आपण तीन महिन्यांपूर्वीच मडगाव पालिकेच्या मुख्याधिकारी पदावर रुजू झालो. गणेशोत्सव मंडळाविषयी आपल्याला काहीही माहिती नाही. आपण त्या समितीचा सदस्यही नाही. मात्र पालिका प्रत्येक वर्षी गणेश चतुर्थीला व नाताळाला 15 हजार रुपये निधी मंडळाच्या स्वाधीन करते.                                                                                                                                                                    -रोहित कदम, मुख्याधिकारी, मडगाव

Back to top button