वास्कोतील बारमालकाचा खून; चार लाखांचा ऐवज लांबविला | पुढारी

वास्कोतील बारमालकाचा खून; चार लाखांचा ऐवज लांबविला

वास्को ; पुढारी वृत्तसेवा : मोगाबाय (विहीर) काटेबायणा येथील कायतान डिसोझा (60) हे रविवारी रात्री आपल्या घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत सापडले. घरातील कपाटे फोडून अज्ञाताने सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू असा सुमारे तीन ते चार लाखांचा ऐवज लंपास केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कायतान हे गेले दोन-तीन दिवस एक अज्ञाताबरोबर हिंडत-फिरत होते. त्यामुळे त्या अज्ञाताकडे संशयाची सुई फिरू लागली आहे.

मुरगाव पोलिस त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. चोरीच्या उद्देशाने कायतान यांच्या घरामध्ये शिरलेल्या अज्ञात व्यक्तीने खून केला असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी लावला आहे. तथापि पोलिस सर्व बाजूंचा विचार करून तपासाची दिशा ठरवित आहेत.

कायतान हे आपल्या पत्नीसह राहतात. त्यांची एक विवाहित व इतर दोन मुली लंडनला राहतात. कायतान यांनी शहर भागातील एक बार चालविण्यास घेतला आहे. त्या बारचा कारभार कधी ते तर कधी त्यांची पत्नी पाहते. कायतान शांत स्वभावाचे होते. रविवारी रात्री त्यांची पत्नी बार बंद करून घरी आल्यावर त्यांना कायतान रक्तीच्या थारोळ्यात दिसून आले. घरातील कपाटे फोडून मौल्यवान वस्तू लंपास झाल्याचे आढळून आले.

याप्रकरणी मुरगाव पोलिसांना कळविल्यानंतर पोलिस निरीक्षक राघोबा कामत व इतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. यावेळी वास्को पोलिस स्थानकाचे निरीक्षक कपिल नायक, उपअधीक्षक राजेश कुमार, अधीक्षक अभिषेक धनिया तेथे पोहोचले. त्यांनी तेथील घटनेची माहिती घेतली. मृतदेह शवचिकित्सासाठी इस्पितळामध्ये पाठविण्यात आला.

कायतान यांच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्याचे दिसून आल्या. चोरी करणार्‍या अज्ञाताने पुढील दाराला आतून कडी घातली होती व मागील दाराने पळ काढला असे स्थानिकांनी सांगितले. कायतान हा व्याजाने पैसे देत होता. त्याच्याकडून बरेचजण व्याजाने पैसे घेत होते. त्यामुळे त्या व्यवहारातूनही हा प्रकार घडला की काय या दिशेने पोलिस तपास करीत आहेत. खून नेमका कोणत्या वेळेत झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मुरगाव आऊट पोस्ट सुरू करा

काटेबायणा हा भाग मुरगाव पोलिस क्षेत्रांतर्गत आला आहे. त्यामुळे तक्रारदारांना सुमारे सहा किलोमीटरचा फेरा घेऊन बोगदा येथे पोलिस स्थानकामध्ये जावे लागते. त्यामुळे तक्रारदाराची धावपळ उडते. त्यांना गैरसोय सहन करावी लागते. पूर्वी काटेबायणा हा भाग वास्को पोलिस स्थानकाच्या अंतर्गत येत होता. तो पुन्हा वास्को पोलिस स्थानकाच्या अंतर्गत समाविष्ठ करावा किंवा बायणामध्ये ज्या प्रमाणे वास्को पोलिस आऊटपोस्ट आहे, त्याप्रमाणे तेथील भागात आऊट पोस्ट सुरू करावे, अशी मागणी एका सामाजिक कार्यकर्ते रवळू पेडणेकर यांनी केली.

अज्ञाताचा मोबाईल क्रमांक पोलिसांकडे

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर हे माहिती मिळताच रात्री घटनास्थळी पोहचले. त्यांनी सदर प्रकार दुखदायक असल्याचे सांगितले. लोकांनी अज्ञात व्यक्तींपासून सावध राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मुरगाव पोलिसांना आम्ही त्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक दिला. जेणेकरून पोलिसांना संशयिताचा शोध घेण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

घटनास्थळावरील तर्क-वितर्क

* पत्नीसमवेत राहणारे कायतान हे पुढील दोन-तीन महिन्यांनी आपल्या मुलींकडे राहण्यास जाणार होते.
* गेल्या दोन-तीन दिवसांपासून ते एका अज्ञात व्यक्तीला घेऊन फिरत असल्याचे काहीजणांनी पाहिले होते. ती व्यक्ती कोठे राहते हे शेजार्‍यांनाही माहीत नव्हते.
* कायतान त्या व्यक्तीला घेऊन बारमध्येही गेला होता.
* रविवारी त्यांची पत्नी बारमध्ये असल्याने कायतान त्या व्यक्तीसमवेत घरी आले असावे. कायताना यांच्याकडे मौल्यवान वस्तू असल्याची माहिती त्या व्यक्तीला असावी.

Back to top button