गल्लीबोळात नागराज परशा अन् आर्ची | पुढारी

गल्लीबोळात नागराज परशा अन् आर्ची

पुढारी ऑनलाईन 
महाराष्ट्र सैराटमय झाला. शेंबड पोरगसुद्धा झिंगाट गाण्यावरती सैराट झालं. मग तुही कट्ट्यावरती मट्टा पीत म्हणालास. “अरे.. मी पण पिक्चर काढू शकतूय की रं…’’ मग गल्लीबोळात तुझ्यासारख्या पोरांनी पिक्चरचा  खेळ मांडून कधी खेळ केला, कळालं नाही. ज्यांना कधी सिनेमाच व्याकरण समजल नाही, अशांनी चालू केली चौका-चौकात ऑडीशन्स… मग  घराघरातला परश्या स्वप्नातही न मावणारी स्वप्न पाहू लागला…मग सिनेमाच भूत डोक्यावर बसलेल्या प्रत्येकाला दिसू लागलं ग्लॅमर,  वैभव आणि किर्ती…ते जग तुलाही हवय पण, नुसता कॅमेरा असला म्हणजे नागराज होता येत नाही, हे समजू दे. गट्ट्या खेळण्याइतकं सोप नसतं पिक्चर-पिक्चर खेळणं, हे समजू दे तुला. नाहीतर वेळ वाया घालवून आयुष्याचा खेळ करुन ठेवशील.

गल्लीबोळात नागराज, परश्या, अन् आर्ची तुला काय समजणार? सोड…तुला अजून जब्बार पटेल, आचार्य अत्रे, व्ही. शांताराम, दादा कोंडके समजले नाहीत. तरीही पण तू मात्र नागराज होण्याची भाषा करतोस. नागराजचा संघर्ष, अभ्यास, संमय तुला कळणार  नाही. तू आधी शाळावाल्या सुजयचा विजय, ख्वाडावाल्या भाऊरावचा प्रवास, मकरंदच्या आयुष्याच रिंगण, दशक्रियेच्या संदीपने लावलेला दीप समजून घे. मगच सिनेमाच्या वाटेवरचा वाटसरू बन. बघ उघड्या डोळ्यांनी, विचार कर, गल्लीबोळात कसल्याही शॉर्टफिल्म बनवून, पाहुण्यांना दाखवून वाहवा मिळवायच सोडून दे. सिनेमाच व्याकरण समजून घे, कारण कॅमेरातून फोटो काढायला काही सेकंद लागतात. पण तोच कॅमेरा घेवून नागराजसारखी ईमेज बनवायला आयुष्य कमी पडत. वादळी चक्रात गुरफटू नकोस. कुणालाही परश्या-आर्ची करण्याच स्वप्न दाखवू नकोस. कारण स्वप्न मारणं हे माणस मारण्यापेक्षा वाईट असत, हे समजू दे तुला.

आता गल्लीबोळातल्या परश्या आणि आर्चीबद्दल काय बोलू. ऑडीशन्सचे दोन-चार हेलपाटे झाले, एखाद्या शॉर्टफिल्ममध्ये रोल केला की, हे टपरीवरती चहा पीत मोठ्या अनुभवी कलाकरांची मापं काढायला रिकामे. मित्रा तुला कधी नाट्यशास्र, नवरस, अभिनयाचे प्रकार परिपूर्ण समजले नाहीत. तरी तुझा अहंकार मात्र हॉलीवुडच्या नटासारखा, तुला खाडीलकर, किर्लोस्कर, शंकरराव खरात, वामन होवाळ, देवल, गडकरी, अत्रे हे नाटककार वाचायला तुझ्याकडे वेळ नसेलच.

 पण कमीत-कमी अनिरुद्ध खुटवड, मोहित टाकळकर, राजकुमार तांगडे, प्रदीप वैद्य, अरविंद जगताप यांना तरी वाच. कुठेतरी शूटिंग बघायला जावून फेसबुकवर फोटो टाकून लाईकसाठी धडपडण्यापेक्षा, तुला लोकांनी लाईक करावं व तुला भेटण्यासाठी लोकं धडपडावीत असं काहीतरी  कर…आणि हो अजून एक, तुला चित्रपट व नाट्यसंस्था काढायचं खूपच वेड लागलय रे, नाट्यसंस्था काढण्याआधी पेठेंची नाटकघर, वैद्यांची एक्सप्रेशन लॅब, अलोकची नाटक कंपनी, टाकळकरांची आसक्त, राजकुमारची रंगमळा, सत्याप्पाची हापूस नाट्यसंस्था, प्रवीणची नाट्यवाडा या नाट्यसंस्था अनुभवण्याचा प्रयत्न कर. तुला एक सांगतो मित्रा, तू तरुण आहेस, तुझा प्रवास सुरू होण्याआधीच मरू नये याची दक्षता घे. तुझ्यावर पश्‍चातापाची वेळ येऊ नये म्हणून हा खटाटोप. प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटीशिवाय पर्याय नाही.
 – विशाल शिरतोडे 
 

Back to top button