तूळ : प्रसन्नता लाभेल, आर्थिक लाभ व नोकरीत बढती | पुढारी

तूळ : प्रसन्नता लाभेल, आर्थिक लाभ व नोकरीत बढती

संगीत, वाद्य, चित्रपट व नाट्य याची मोहिनी तूळ व्यक्‍तींना जन्मजात असते. तूळ व्यक्‍ती म्हणजे मानवी जीवनाचे वैभव आहे. जीवन कसे जगावे हे तूळ व्यक्‍तींना अधिक कळते. सर्वांबरोबर मिळून मिसळून वागण्याची कला, आर्जवी, मधुर व्यक्‍तिमत्त्व, न्यायाविषयीची आवड व सर्वांबरोबर मिळतेजुळते घेण्याचा स्वभाव यामुळे तूळ व्यक्‍ती सर्वांनाच प्रिय असतात. सौंदर्याचे, निसर्गाचे खरे रसिक आपणच असता. आपली सौंदर्याची अभिरुची ही अभिजात असते. नि:पक्षपातीपणा व न्यायाची आवड या गोष्टी आपल्याकडे जन्मजात आहेत. समतोल वृत्तीबद्दल आपण प्रसिद्ध असता.
 
yesआरोग्य
आरोग्याच्या दृष्टीने तूळ राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष अत्यंत चांगले जाणार आहे. हे वर्ष आपणास आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे. गुरू आपणाला यावर्षी अनुकूल आहे. ११ ऑक्टोबरपर्यंत गुरू तूळ राशीत म्हणजेच आरोग्याच्या स्थानात आहे. त्यामुळे मागील वर्षी झालेल्या आरोग्याच्या कटकटी आता संपणार आहेत. मन आनंदी व आशावादी राहील. उत्साह व उमेद वाढणार आहे. आत्मविश्‍वास वाढणार आहे. जिद्द व चिकाटी वाढेल. आपल्या साडेसातीचा कालखंड संपलेला आहे. त्यामुळे साडेसातीमध्ये ज्या अडचणींना सामोरे जावे लागले, ज्या कटकटींना सामोरे जावे लागले त्या कटकटी, त्या अडचणी आता संपणार आहेत. तेव्हा आरोग्याचे सौख्य लाभणार आहे. या वर्षी २ जानेवारी ते ५ फेब्रुवारी, २७ मार्च ते १९ एप्रिल, ९ जून ते ३१ जुलै, ३ सप्टेबर ते २० ऑक्टोबर, ५ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर हा कालखंड आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहेत. या कालखंडात मानसिक प्रसन्नता लाभेल, कौटुंबिक सौख्य लाभेल. मन आनंदी, आशावादी राहील. तुम्ही सकारात्मक दृष्टीने विचार कराल. खालील कालखंडात आपण आपल्या आरोग्याच्या काळजी घेण्याची गरज आहे. १ ऑगस्ट ते १ सप्टेबर हा कालखंड आरोग्याच्या संदर्भात संमिश्र जाण्याची शक्यता आहे.

yesव्यवसाय, उद्योग, आर्थिक स्थिती
व्यवसाय, उद्योग, व्यापार, कारखानदारी या दृष्टीने तूळ राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष समाधानकारक जाईल. व्यवसायातील कारभारांकडे लक्ष देवू शकाल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. गेल्या साडेसात वर्षातील कटकटी, अडचणी व अडथळे, मानसिक, आर्थिक कुचंबणा, अनपेक्षित येणार्‍या अडचणी, लोकांचे अपेक्षित सहकार्य न मिळणे, अंदाज चुकणे, कौटुंबिक जीवनात सामाजिक जीवनात काहीवेळा गैरसमज निर्माण होणे अशा गोष्टी होवून गेल्या असतील. परंतु आता साडेसातीचे फार मोठे ओझे संपलेले आहे. त्यामुळे आता कामे वेगाने होतील. गतिमानतेने होतील. अडथळे, अडचणी कमी होतील. लोकांचे हार्दिक सहकार्य लाभेल व हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. विशेषत: १२ ऑक्टोबर २०१८ नंतर गुरू धनस्थानामध्ये प्रवेश करत आहे. १२ ऑक्टोबर २०१८ पुढील कालखंड हा अत्यंत चांगला जाणार आहे. या कालखंडामध्ये आपण आपल्या व्यवसायाची नवीन शाखा निर्माण करू शकाल. व्यवसायात वाढ करू शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण यावर्षी चांगले राहणार आहे. आर्थिक लाभाच्या दृष्टीने १२ जानेवारी ते ५ मार्च, ३ मे ते ३ जुलै, २ ऑगस्ट ते ९ सप्टेबर ११ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर हा कालखंड चांगला जाणार आहे. पण, ७ मार्च ते २५ मार्च, ७ एप्रिल ते २ मे, ६ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालखंडात व्यवसायात व आर्थिक व्यवहारात अधिक दक्षता घ्यावी,  नुकसानीची शक्यता आहे.
 

laughनोकरी
नोकरीतील तूळ राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष चांगले जाणार आहे. गेल्या वर्षापेक्षा हे वर्ष तूळ व्यक्‍तींना नोकरीच्या दृष्टीने समाधानकारक राहणार आहे. तुमच्या आशाआकांक्षा पूर्ण होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. विशेषत: १२ ऑक्टोबर २०१८ नंतरचा कालखंड अत्यंत चांगला आहे. या कालखंडामध्ये पगारवाढीची शक्यता आहे. बढतीची शक्यता आहे. तुम्हाला नवीन संधी लाभण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचे व थोरामोठ्यांचे सहकार्य मिळण्याच्या दृष्टीने हा कालखंड चांगला आहे. थोरामोठ्यांच्या व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यश मिळवू शकाल. अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल. यावर्षी १५ जानेवारी ते ११ फेब्रुवारी, १४ एप्रिल ते १४ मे, १७ जुलै ते १६ सप्टेबर, १९ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर हा कालखंड नोकरीतील व्यक्‍तींना चांगला आहेत. तूळ राशीच्या नोकरीतील व्यक्‍तींना १ जानवारी ते १२ जानेवारी, १४ फेब्रुवारी ते १३ मार्च, १५ मे ते १४ जून, १७ सप्टेबर ते १७ ऑक्टोबर हा कालखंड त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. तेव्हा खालील कालखंडात तूळ राशीच्या व्यक्‍तींनी नोकरीत जागरूक राहिले पाहिजे. वरिष्ठांबरोबर संयमाने वागले पाहिजे व आपण एखाद्या बेकायदेशीर गोष्टीत अडकत नाही ना? याची दक्षता घेतली पाहिजे.
 

laughप्रॉपर्टी
प्रॉपर्टी, गुंतवणूक, जागा, जमिनी, प्लॉट, फ्लॅट, बंगला, वाहन खरेदी यादृष्टीने तूळ राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष विशेष समाधानकारक ठरणार आहे. विशेषत: वर्षाचा उत्तरार्ध म्हणजेच ३ मे २०१८ नंतरचा कालखंड प्रॉपर्टीच्या दृष्टीने अत्यंत चांगला आहे. या कालखंडामध्ये आपण आपल्या राहत्या घराचे व व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न सोडवू शकाल. या कालखंडात प्रॉपर्टीच्या व गुंतवणुकीच्या संदर्भात काही नवीन प्रस्ताव समोर येतील. प्रॉपर्टीच्या संदर्भातील आपली स्वप्ने या कालखंडात पूर्ण करू शकाल. १४ जानेवारी ते १२ फेब्रुवारी, ३ मे ते २८ मे, ९ जून ते ४ जुलै, २८ जुलै ते ३० ऑगस्ट, १५ सप्टेबर ते ५ नोव्हेंबर, हा कालखंड आपणाला प्रॉपर्टीच्या दृष्टीने चांगला जाईल जातील. ८ मार्च ते २ मे हा कालखंड प्रॉपर्टीच्या दृष्टीने प्रतिकूल ठरण्याची शक्यता आहे. खालील कालखंडात महत्त्वाचे प्रॉपर्टीचे व गुंतवणुकीचे निर्णय पुढे ढकलावेत. या कालखंडात प्रॉपर्टीची महत्त्वाची कामे विलंबण्याची शक्यता आहे. काही कटकटी निर्माण होण्याची शक्यता आहे.

smileyसंततीसौख्य
संततीसौख्य, मुलामुलींची प्रगती या दृष्टीने हे वर्ष तूळ राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष चांगले जाणार आहे. त्यांच्या परीक्षांचे निकाल, शाळा, कॉलेज प्रवेशाचे प्रश्‍न यासाठी महत्त्वाचा ग्रह म्हणजे गुरू. सध्या गुरू  प्रथमस्थानात आहे व १२ ऑक्टोबर रोजी गुरू धनस्थानात वृश्‍चिक राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे वर्षभर गुरू अनुकूल आहे. संपूर्ण कालखंड शुभ कार्य, साखरपुडा, विवाह, व्यवसायाची सुरुवात, नवीन कामाचा शुभारंभ या सर्व शुभ कार्यासाठी प्रतिकूल आहे. तेव्हा मुलामुलींचे विवाह होण्याची द‍ृष्टीने तसेच मुलामुलींची त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती होण्याच्या दृष्टीने हे वर्ष चांगले आहे. ३ मे ते ३ जून, ५ जुलै ते ३१ जुलै, १७ ऑगस्ट ते १६ सप्टेबर हा कालखंड संततिसौख्याच्या दृष्टीने चांगला आहे. १७ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या काळात मुलेमुली काही नवीन समस्या निर्माण करतील. अनपेक्षितपणे संततिसौख्याच्या संदर्भात काही प्रश्‍न नव्याने उभे राहतील.

heartविवाह / वैवाहिक सौख्य
विवाह व वैवाहिक सौख्य यादृष्टीने व विवाहेच्छुंचे विवाह जमण्याच्या दृष्टीने हे वर्ष चांगले जाणार आहे. मागील वर्षी वैवाहिक जीवनात अनेक कटकटींना सामोरे जावे लागले असेल. परंतु या वर्षी मतभेद संपणार आहेत. विशेषत: ११ ऑक्टोबरपर्यंतचा कालखंड हा वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने अत्यंत चांगला आहे. पती-पत्नीमधील सामंजस्य वाढणार आहे. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. शुभकार्य, साखरपुडा, विवाह यासाठी गुरूची अनुकूलता लागते. ही अनुकूलता तुळ राशीच्या व्यक्‍तींना वर्षभर लाभणार आहे. त्यामुळे विवाहेच्छुंचे विवाह जमतील. ११ ऑक्टोबरनंतरच्या कालखंडामध्ये कुटुंबातील महत्त्वाचे प्रश्‍न सोडवू शकाल. कुटुंबाला वेळ देऊ शकाल. कौटुंबिक जीवनात व वैवाहिक जीवनात सौख्य व समाधान लाभेल. १ जानेवारी ते २० जानेवारी, २ फेब्रुवारी ते ७ मार्च, ४ मे ते ७ जुलै, २७ जुलै ते ३१ ऑक्टोबर हा कालखंड वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने चांगला आहे. ८ मार्च ते २५ मार्च, ५ एप्रिल ते १ मे, १० नोव्हेंबर ते २० डिसेंबर हा कालखंड वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने प्रतिकूल आहेत. ज्यांच्या वैवाहिक जीवनात अगोदरचेच मतभेद आहेत ते मतभेद खालील कालखंडात वाढीला लागतील, मतभेद तीव्र होतील. तेव्हा राशीच्या व्यक्‍तींनी आपल्या वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने खालील कालखंडात शांत राहणे योग्य ठरेल.

smileyप्रवास / तीर्थयात्रा
प्रवास, तीर्थयात्रा, परदेश प्रवास या दृष्टीने हे वर्ष तूळ राशीच्या व्यक्‍तींना चांगले जाणार आहे. मागील वर्षामध्ये प्रवासामध्ये अडचणी निर्माण झाल्या असतील परंतु, हे वर्ष प्रवासाच्या दृष्टीने समाधानकारक ठरणार आहे. महत्त्वाचे प्रवास घडतील. प्रवासाच्या निमित्ताने महत्त्वाच्या गाठीभेटी पडतील. काहींना तीर्थयात्रेचे तर काहींना परदेश प्रवासाचे योग येतील. विद्यार्थ्यांनी मात्र वर्षाच्या पूर्वार्धात प्रवासामध्ये काळजी घ्यावी. लहान सहलीचे योग येतील. कुटुंबातील व्यक्‍तींना बाहेर घेऊन जाऊ शकाल. तरीही प्रत्येक व्यक्‍तीच्या व्यक्‍तिगत पत्रिकेतील ग्रहयोगावर ते अवलंबून राहील. 
८ जानेवारी ते २७ जानेवारी, १५ मे ते २५ जून, ३ सप्टेबर ते १८ सप्टेबर आमि २७ ऑक्टोबर ते २५ डिसेंबर हा कालखंड प्रवासाच्या दृष्टीने अतिशय चांगला जाईल.

smileyसुसंधी / प्रसिद्धी व सुयश
सुसंधी, प्रसिद्धी, अंगिकृत कार्यात यश या दृष्टीने हे वर्ष तूळ राशीच्या व्यक्‍तींना अत्यंत यशदायक असे ठरणार आहे. तुम्हाला अपेक्षित असणार्‍या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभणार आहे. मागील वर्षी तुम्हाला जरी अपेक्षित संधी मिळाली नसेल, तुमच्या ज्या आशाआकांक्षा पूर्ण झाल्या नसतील त्या आशाआकांक्षा यावर्षी पूर्ण होणार आहेत. यावर्षी तुमच्या कर्तृत्त्वाला अपेक्षित वाव मिळणार आहे. 
तूळ रास ही जन्मत: कला, संगीत, नाट्य यांची आवड असलेली असते. तूळ व्यक्‍ती यांना सौंदर्य दृष्टी असते. अभिजात सौंदर्याची आवड असते. कला, संगीत, नाट्य यामध्ये रुची असते. त्यांच्याकडे उत्कट अशी अभिरुची असते व तूळ व्यक्‍ती या कलेच्या क्षेत्रात पुढे येतातच. यावर्षी आपली जिद्द व चिकाटी वाढणार आहे. जिद्द व चिकाटीच्या जोरावर आपणाला सुयश लाभणार आहे. लेखन, प्रकाशन या क्षेत्रात यश लाभेल. ६ फेब्रुवारी ते १ मार्च, २७ मार्च ते १९ एप्रिल, १० मे ते २६ मे, १२ जून ते २५ जून, २ सप्टेबर ते ११ ऑक्टोबर,२७ ऑक्टोबर ते २० डिसेंबर हा कालखंड आपणाला सुसंधीच्या व प्रसिद्धीच्या दृष्टीने अनुकूल जातील.

smileyप्रतिष्ठा, मानसन्मान
प्रतिष्ठा, मानसन्मान, सार्वजनिक कामात यश, नावलौकिक या दृष्टीने तूळ राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष समाधानकारक राहणार आहे. तुम्हाला सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राहू वर्षभर दशमस्थानात आहे. त्याचा देखील फायदा होणार आहे. विशेषत: १२ ऑक्टोबरनंतरचा कालखंड तुम्हाला महत्त्वाचे पद मिळण्याच्या दृष्टीने, एखादी महत्त्वाची जागा मिळण्याच्या दृष्टीने अत्यंत चांगला आहे. या कालखंडामध्ये तुम्ही स्वत:चे नाव निर्माण करू शकाल. तुमचा दबदबा राहील. तूळ राशीच्या व्यक्‍तींकडे मुळात चिकाटी असते. समाजजीवनाची, सांस्कृतिक जीवनाची, कलेची, संगीताची त्यांना उपजत आवड असते व या सर्व क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती आपोआप होत असते. १४ जानेवारी ते १२ फेब्रुवारी १४ एप्रिल ते १४ मे, १८ जुलै ते १५ सप्टेबर हा कालखंड अधिकार, प्रतिष्ठा या दृष्टीने चांगले आहेत.

 

laughlaughlaugh

सारांश

साडेसातीचा काळ संपलेला  आहे. आरोग्य सुधारणार आहे. प्रकृतीची अपेक्षित साथ लाभेल. व्यवसायामध्ये समाधानकारक स्थिती राहील. व्यवसायातील उलाढाल व मानसन्मान, प्रतिष्ठा या दृष्टीने संपूर्ण वर्ष चांगले असले तरीही १२ ऑक्टोबरनंतरचा कालखंड विशेष चांगला आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहणार आहे. मुलामुलींच्या प्रगतीच्या दृष्टीने वर्षाचा उत्तरार्ध जास्त चांगला आहे. वैवाहिक सौख्य लाभणार आहे. विवाहेच्छुंचे विवाह जमण्याच्या दृष्टीने हे वर्ष चांगले आहे. प्रवास सुखकर होतील. अनेकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान, प्रतिष्ठा, नावलौकिक व सुसंधी लाभणार आहे. हे वर्ष तूळ राशीच्या व्यक्‍तींना अनेक दृष्टीने चांगले जाईल. पुढील काही वर्षाचे नियोजन करण्याच्या दृष्टीने हे वर्ष चांगले आहे.

Back to top button