प्रभाते मनी : आनंदाचे उगमस्थान मन! | पुढारी

प्रभाते मनी : आनंदाचे उगमस्थान मन!

रत्नागिरी : विशाल मोरे

प्रत्येकाची आनंदाची कल्पना वेगळी असते. बर्‍याचदा ही कल्पना कल्पनेतच राहते. काहींना करिअरमध्ये आनंद असतो, काहींना कुटुंबामध्ये, काहींना मित्र-मैत्रिणींमध्ये, काहींना खाण्यामध्ये.  काहींना आनंद असतो तो दुसर्‍याला आनंद देण्यात तर काही विकृत लोकांचा आनंद दुसर्‍याच्या दुःखात लपलेला असतो. प्रत्येकजण स्वतःचा आनंद शोधत असतो. छोट्या-छोट्या गोष्टींमधून सुखाचे क्षण वेचण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतो. सुख मिळाले की आनंद होतो. त्यामुळे आपण सुखी व्हावे ही प्रत्येकाचीच  इच्छा असते. आनंद ही काही मूर्त वस्तू नाही. बाजारात पैसे देऊन ती विकत मिळत नाही किंवा कुणाकडे मागूनही मिळत नाही. एखादा चिंताग्रस्त, दुर्मुखलेला मनुष्य जर म्हणेल की काय करणार? माझ्या नशिबातच आनंद नाही तर ती चूक नशिबाची नसून त्याचीच असते. 

माणसांचे प्रकार काय किंवा त्यांच्या कर्माचे धडपडीचे प्रकार काय? आणि त्यामागे असलेल्या हेतूंचे प्रकार काय? ते सारे अगणित दिसले, तरी त्याचे एकच एक समान सूत्र, समान उद्दिष्ट – समान हेतू आहे आणि तो म्हणजे आनंद मिळवणे. कधी त्याला माणूस सुख म्हणेल, कधी समाधान म्हणेल. पण या सार्‍या धडपडीमागे त्याला हवा असतो तो म्हणजे आनंद! आनंद हा मानून घेण्यावर असतो. आनंद आपल्या सभोवार पसरलेला असतो. घरात नुकतेच बोलता येऊ लागलेले बाळ त्याचे बोलणे ऐकल्याने, त्याच्यासोबत बोलण्याने, शाळेतून घरी आलेल्या आपल्या मुलांकडून शाळेत झालेल्या गमती-जमती ऐकल्याने, खूप दिवसांनी मिळालेल्या मित्र – मंडळी सोबत बोलल्याने, चांगले काम केल्यास मोठ्यांकडून शाब्बासकी मिळाल्याने, आपल्याच घरात मिळणारे आनंदाचे क्षण आहेत. ही सृष्टीच मुळात आनंदातून निर्माण झालेली आहे आणि तिचा विलयसुद्धा आनंदात आहे. असे उपनिषदात म्हटले आहे. मानव हाच आनंदस्वरूप आहे. प्रत्येक मनुष्य आपापल्यापरीने आनंदाचा शोध घेत असतोच. छंद हे आनंद मिळवण्याचे एक साधन आहे. हे छंद बर्‍याच प्रकारचे असू शकतात. कुणाला तिकिटे जमविण्याचे, कुणाला चित्रे जमविण्याचे, कुणाला कचर्‍यातील काही वस्तू गोळा करण्याचे, त्या वस्तूतूनच काही नवीन तयार करण्याचा, कुणाला पेपरातील कात्रण काढून ठेवण्याचा असे कित्येक छंद असतात.  परंतु, कुठलाही छंद आनंद देण्यास सारखाच समर्थ असतो. कुणी दु:खितांची सेवा करून तर कुणी विद्यादान करून आनंद मिळवितात. कलाकाराला आपल्या कलासाधनेतून अलौकिक आनंद मिळतो. ध्येय प्राप्तीमुळे तसेच कर्तव्यपूर्तीतूनही आनंद मिळतो. आपला मुलगा यशाच्या शिखरावर पोहोचलेला बघून आईला मिळणारा आनंद केवळ अवर्णनीय असतो.

आनंद हा ज्ञानाप्रमाणे देण्याने वाढतो. दुसर्‍याला आपल्या आनंदात सहभागी करून घेतल्यास तो द्विगुणित होतो. घरी आलेला एखादा आनंदी व खेळकर पाहुणा संपूर्ण घर कसे प्रसन्नतेने भरून टाकतो. त्यामुळे त्या घरची मंडळी त्याला भरपूर आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करतात. यावरून इतके लक्षात येते की आनंद दिल्याने त्याही पेक्षा जास्त पटीने परत मिळतो. एखादी सुंदर वस्तू खरेदी केली असेल तर ती दुसर्‍याला दाखविल्याशिवाय चैन पडत नाही. आनंद उपभोगायलाही कुणाची तरी सोबत हवी असते. त्यामुळेच हवेतील राहणार्‍या सर्व सुखात लोळणार्‍या श्रीमंतांपेक्षा भटकणारा कलंदर मनुष्यही जास्त सुखी व आनंदी असू शकतो. निसर्ग हे आनंदाचे मूर्तिमंत प्रतीक आहे. निसर्ग हा कधीच दुःखी नसतो,  सकाळ होताच टवटवीत होऊन वार्‍यासोबत डोलणारी झाडे, किलबिल करणारे व मोहक हालचाली करणारे पक्षी, फुलांमध्ये बागडणारी फुलपाखरे, खळखळाट करत धावणारी नदी, मोठ-मोठ्या पहाडांवरून संथ उतरणारे झरे, ही निसर्गाची निरनिराळी रूपे आपला आनंद उधळत असतात. आम्ही आनंदी आहोत तुम्ही आनंदी व्हा, असाच संदेश जणूकाही ते आपल्याला देत असतात.

आनंदाची अनेकविध रूपे आपल्याला ठायी ठायी दिसत असतात. अशा परिस्थितीत दुःखी राहणे म्हणजे पाण्यात राहून कोरडेच राहणे नव्हे काय? ज्या प्रमाणे कावीळ झालेल्या मनुष्याला सारे जग पिवळं दिसत असते. त्याचप्रमाणे दुःखी मनुष्याला सारी कडे दुःखच भरलेले दिसत असते. म्हणून आनंदी होण्याची अनेक उत्तम उपाय म्हणजे स्वतःच्या दु:खाचा विचार सोडून दुसर्‍याच्या दुःखाचा विचार करणे व ते कमी करण्याचा प्रयत्न करणे. अशा प्रकारे आनंदाचा उगमस्थान हे म्हणजे मनच आहे. आनंद मिळवण्यासाठी इकडे तिकडे न भटकता स्वतःच्या मनाशी त्याचा शोध घेतला पाहिजे. 
 

Back to top button