भय इथले संपत नाही | पुढारी | पुढारी

भय इथले संपत नाही | पुढारी

मी एक जपानी कथा वाचली होती. एक आई आपल्या दोन मुलांसोबत समुद्रकिनारी फिरत असताना एकदम त्सुनामीचा इशारा झाला. सर्वजण जीव वाचवण्यासाठी पळत होते. त्यात तीही आपल्या दोन्ही मुलांसोबत किनार्‍याच्या दिशेने धावत होती. लाटांचा वेग प्रचंड वाढला, तसे तिने छोटयाला दोन्ही हातांनी उचलून घेतले. तेवढयात एक प्रचंड लाट तिघांवर येवून आदळली. छोटा तिला बिलगून असल्याने ती दोघं एकत्रितपणे लांब फेकली गेली पण मोठयाचा हात सुटल्याने तो एकटाच त्या लाटेच्या तडाख्यात सापडला. धडपडत उठत पुढची लाट आदळण्यापूर्वी त्यांनी किनारा गाठला. दोन्ही मुले सुरक्षित बघून आईचा जीव भांडयात पडला. ती दोघांना कुशीत घ्यायला पुढे झाली पण मोठा मुलगा तिच्यापासून दूर झाला,

तेव्हा मलाही  तुझी तितकीच गरज होती. तू हात सोडल्याने मी ही खूप घाबरलो होतो. पण आता माझा मी शिकलो लाटेतून सावरायला…

मी खूप वेळा विचार केला की, या प्रसंगात त्या आईची काय चूक होती पण त्या त्सुनामीत तिने आपला मुलगा गमावलाच.

अशा असंख्य त्सुनामी नोकरीवाल्या आईबाबांच्या आयुष्यात येत असतात. नेमक्या कुठल्या वेळेला मुलाचा हात सुटेल आणि मुलगा गमवावा लागेल याचा नेम नाही. त्यामुळे सतत असुरक्षिततेची भावना पालकांच्याही आणि मुलांच्याही मनात आहे. मुलांना वाटते की आई-बाबांना आपल्यासाठी वेळ नाही त्यामुळे कधी त्यांच्या सोयीचा विचार करुन तर कधी आपल्या सोयीने ती अनेक गोष्टी शेअर करायच्या टाळतात. या उलट आपण मुलांसाठी पुरेसा वेळ देवू शकत नाही या अपराधीपणाच्या भावनेतून मुलांच्या विश्‍वात स्वत:ची जास्तीत जास्त जागा निर्माण करण्याची पालकांची धडपड चालू असते. यातून या नात्यात साचेबद्ध कृत्रीमपणा येत चालला आहे.

‘मुलं ही आपली प्रायॉरिटी असली पाहिजे’ हे परवलीचं वाक्य आजकालची फॅशन झाली आहे. प्रायॉरिटी ही संकल्पना समजून घेण्यात आपली फार मोठी गल्लत होते. मुलं प्रायॉरिटी असणं म्हणजे मुलांना भरमसाठ चैनीच्या वस्तू, गॅझटेस, महागडी खेळणी, फाइव्ह स्टार ट्रीटस हे सगळं उपलब्ध करुन देणं. त्यांनी न मागताही त्यांना सर्व सुखसोयी, बरं ’सुखसोयी’ याचीही व्याख्या पुन्हा आपण आपल्या सोयीने ठरवून, निर्माण करुन ठेवणं किंवा दर विकेंडला  त्यांना कुठेतरी पिकनिक स्पॉटला नेणं, भरपूर पैसा खर्च करुन देशविदेशात फिरायला नेणं. हे सर्व करता आले की आपण खूप चांगले पालक झालो असा एक गोड गैरसमज आहे. यातून आपणच आपल्या मुलांच्या सुखाच्या कल्पना भौतिकवादाशी जोडत जातो.

आजकालची मुलं आपल्या व्यस्त जीवनशैलीचा आणि विभक्त कुटुंबपध्दतीचा प्रचंड  ताण  सहन करत आहेत.याची कितीजणांना कल्पना आहे? मुलांचं जगही खूप ताणतणावाचं असतं. ज्या गोष्टी आपल्या दृष्टीने खूप क्षुल्लक असतात, त्या असंख्य गोष्टी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या, अवघड, गुंतागुंतीच्या असतात. त्या व्यक्त करण्यासाठी त्यांना जेव्हा खर्‍याखुर्‍या  जीवंत माणसांची गरज असते तेव्हा आपण त्यांना निर्जीव गॅझेटच्या जगात ढकलून देत असू तर त्यांच्याकडून संवेदनशीलतेची अपेक्षा ठेवणे चूक ठरेल. माणूस हा निसर्गत: समाजशील प्राणी आहे. त्याला सतत आपल्या अवतीभोवती सजीव जाणींवाचा वावर आवश्यक वाटतो. आपल्या नोकरीच्या किंवा इतरही अनेक कारणांच्या निमित्ताने आपण मुलांना बर्‍याचदा एकटे सोडून जातो. अशा वेळी ती आपापल्या परिने त्या एकटेपणावर उपाय शोधतात.  

पण हे उपाय शोधताना त्यांच्या बालमनाची त्रेधातिरपिट  होत असेल, त्यात काही त्रुटी  राहून जात असतील, चुका घडत असतील हे आपल्या ध्यानीमनीही  येत नाही. याउलट काही बाबतीत पालक म्हणून आपला अतिरेकी हस्तक्षेपही चालूच असतो. त्यात मुलांच्या शाळेत जावून रोजच्या रोज चौकशी करणे, मुलांचे होमवर्क- प्रोजेक्ट स्वत:च करणे, त्यांचा तासनतास समोर बसवून अभ्यास करुन घेणे. अगदी खेळायला सुद्धा त्यांच्यासोबत जावून त्यांच्यावर लक्ष ठेवणे. म्हणजे जी कामे त्यांची त्यांनी करणे अपेक्षित आहे ती आपण करायची!  त्यात मग मुलांशी आपली किती जवळीक आहे? आपण त्यांची किती काळजी घेतो?  वैगेरे स्वत:चं समाधान करून घ्यायचं. हल्ली अनेक वेळा काही प्रसंग सर्वत्र सारखेच घडताना दिसतात त्यातला सगळयात दुर्देवी म्हणजे आपल्या नात्यातल्या जवळच्या व्यक्तिचे निधन झाल्यावर मुलांना न नेणं. मग मुलांची शाळा बुडते, क्लास बुडतो किंवा कसली तरी फलाणी परिक्षा महत्त्वाची असते. अशा वेळी एखादया जवळच्या व्यक्ती पेक्षा हे सगळे जास्त महत्त्वाचे आहे हे मुलांच्या  मनावर कोण बिंबवतं ? मग आईवडीलांच्या मृत्युनंतरही आपल्या करियरचा महत्त्वाचा टप्पा आहे म्हणून परदेशातून परत न येणार्‍या मुलांच्या कथा नुसत्या व्हॉटसअ‍ॅपवर टाकून काय उपयोग?

या सर्वापेक्षाही गंभीर समस्या आहे ती एकुलत्या एक मुलांची. येत्या काळात ती एक मोठी सामाजिक समस्या बनू शकते. कारण त्यांना घरातून कुठल्याही गोष्टीत समायोजन करण्याचा, त्यांची कुठलीच गोष्ट इतरांशी शेअर करण्याचा किंवा प्रसंगी पूर्णच दुस-या भावंडाला देवून टाकण्याचा असा प्रसंगच येत नाही. घरातले इतर सगळेच मोठे म्हणून त्याला समजून घेणारे, सांभाळून घेणारे आणि त्याचे लाडच पुरवणारे असतात. पण हे सगळे आपणही दुस-याच्या बाबतीत करायला हवं हे शिकवायला कुठला तसा अनुभवच नसतो. बरं दुसरं असं की त्यांनी  एकुलतं एक असावं हा त्यांचा चॉईस नसतो. त्यामुळे आपल्याला कुणी भावंड नाही याचा सल कुठेतरी त्यांच्या मनात असतो. तो त्यांना व्यक्त ही करता येत नाही  आणि सहज दुर्लक्षित करता येत नाही.आपल्याला नेहमी समवयस्क व्यक्तिंची सोबत जास्त हवीहवीशी वाटते कारण त्यांच्यापाशी आपण सहज मोकळे होवू शकतो.

घरात कितीही सुसंवाद असला, पालक-मुले यांच्या नात्यात मोकळेपणा असला तरी त्या नात्यांमध्ये व्यक्त होण्याच्या ज्या नैसर्गिक मर्यादा आहेत त्या राहतातच. या अणि अशा अनेक लहानसहान गोंष्टीवर गंभीरपणे विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. सुजाण पालकत्व हे पूर्वीसारखे सहज घडून जाणारी गोष्ट उरली नाही. याला कारण पालकांमध्ये किंवा पालकतत्वामध्ये काही दोष आहेत आहेत असे मुळीच नाही. अनेक गोष्टी मध्ये पालकांनी बदल करण्याची गरज आहे. जेवढया चूका कमी करता येतील तेवढया नक्कीच कराव्यात पण शंभर टक्के दोषरहीत पालकत्वाचा अट्टाहास मात्र सोडावा.

या सर्व प्रकरणाची दुसरी बाजूदेखील तितकीच गंभीर आहे. आजच्या पिढीला घडवण्यात किंवा बिघडवण्यात पालकांची भूमिका खूप मर्यादित आहे. मुलांना विविध घटकांची माहिती देणारी, त्यांचे ज्ञान वाढवणारी आणि त्यांच्या जाणीवांच्या कक्षा रुंदावणारी अनेक माध्यमे आज सहज उपलब्ध आहेत आणि त्यांच्यावर पालक म्हणून आपले कोणतेही नियंत्रण नाही. आज समाजाची मूल्ये झपाटयाने बदलत आहेत. पूर्वी समाज स्वास्थ्याला प्राधान्य देणारी कुटुंबसंस्था आज व्यक्तिस्वातंत्र्य आधिक मोलाचे मानत आहे. हे कालौघात होणारे अपरिहार्य बदल मुलांच्या मानसिकतेवर परिणाम करत आहेत. त्यामुळे आजकालची मुले आपल्या हक्कांच्या बाबतीत अधिक अट्टाहासाने बोलू लागली आहेत.

आपले आई-बाबा आपल्याच भविष्याच्या चिंतेने अहोरात्र धावत आहेत ही जाणीव होण्याआधी ते आपल्यासाठी वेळ देत नाहीत ही तक्रार महत्त्वाची होऊन बसली. आपल्या शिक्षणपध्दतीने मुलांना मार्कांच्या स्पर्धेत धावायला लावले, बौध्दिक विकास अनिवार्य झाला पण भावनिक विकास तितकाच महत्वाचा आहे हे कोणाच्याच गावी नाही. भौतिक प्रगती, तंत्रज्ञानाचा विकास यात ही पिढी इतकी गुरफटून गेली आहे की त्याच्या पलिकडे चिरंतन मानवी मूल्यं असलेलं एक जीवन आहे याची त्यांना कल्पनाच नाही. करीयर, टार्गेट, अचिवमेंटस, सक्सेस या शब्दांच्या भोवतीच त्यांचे जग अडकून पडले आहे आणि व्हर्चुअल जग हेच त्यांचे खरे विश्‍व होऊन बसले आहे. अगदी परवाच मी कुठेतरी एक फोटो पाहिला ज्याची कॅप्शन लाईन होती.’ 

फार मागे जाण्याची गरज नाही पण पाच-सहा वर्षांपूर्वी एखाद्या चांगल्या घरातला मुलगा किंवा मुलगी नेटकॅफेमध्ये दिसली तर पालकांची झोप  उडत होती. आज तर ते ‘नेटकॅफे’ च मुलांच्या हातात आहेत. त्याचे खोलवर परिणाम अगदी त्यांच्या हार्मोनल सिस्टीमवर होत आहेत. त्यामुळे वयात येणारी / आलेली मुलं भावनिक दृष्टया अस्थिर होत आहेत. वरवर सगळं चांगलं दिसत असलं तरी त्यांच्या मनात या हव्या नको त्या माहितीचा अक्षरश: कचरा साठलेला आहे. आज अनेक माध्यमातून झालेला माहितीचा विस्फोट इतका भयंकर आहे की त्यापासून आपल्या मुलांना अलिप्त ठेवणं ही पालकांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. त्यातल्या चांगल्या वाईटांचा निवाडा अर्थात मनातील कचर्‍याचे योग्य व्यवस्थापन नव्या पिढीला  स्वत:च करावे  लागणार आहे. त्यात पालकांची भूमिका आवश्यक तिथे मार्गदर्शन करण्यापूरतीच मर्यादित राहणार आहे.

जुन्या काळातील, मुलांना घडवण्याच्या सर्वस्वी जबाबदार असणा-या, काहीशा देवत्वाच्या संकल्पनेतून पालकांनी बाहेर पडणे गरजेचे आहे. सतत जुने दिवस आठवून त्याच्याशी आपली स्वत:ची  आणि मुलांचीही तुलना करणे बंद करुन नव्या आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी केली पाहिजे.’ ‘हे देणं सव्याज समाजाला परत करायचं आहे, आपण फक्त विश्‍वस्त आहोत. आज नुसते अनावश्यक सुरक्षेचे कवच देत राहण्यापेक्षा उदयाच्या व्यवहारी जगात वावरण्यासाठी आवश्यक ते गुण त्याच्यात येण्यासाठी प्रयत्न करता येतील. सगळया वस्तू सहज न मागता मिळत नाही हे वास्तव कळाल्यावर ती हेलपाटून जावू नयेत, नकार किंवा अपयश आले तरी जगण्यापासून निराश होऊ नयेत एवढे तर त्यांना कणखर बनवता येईल. त्यांच्या व्यक्तिमत्चाचा पाया घालण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आपली जबाबदारी डोळसपणे पार पाडली तर पुढची इमारत डळमळीत होणार नाही, याची खात्री बाळगता येईल. एवढे करुनही कुठे काही चुकतंय, बिघडतंय अशी शंका मनात यायला लागली तर सरळ मुन्नाभाई स्टाईलने मुलांना  एक ‘जादूकी झप्पी’ देऊन टाका. शब्दांपेक्षा स्पर्शाची भाषा जास्त प्रभावी असते त्यातून कळू द्या त्यांना की ‘तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि तुम्हाला ती हवी आहेत.’

– विद्या पोळ-जगताप   -मुख्याधिकारी

Back to top button