ब्लॉग : मोबाईल देशा | पुढारी | पुढारी

ब्लॉग : मोबाईल देशा | पुढारी

श्रीमंत असो वा गरिब प्रत्येकाकडे मोबाईल दिसतोच. भारतातील मोबाईलचा वापर वाढला आहे. दिवसागणिक स्वस्तच होत जाणारे व सहज उपलब्ध होणारे इंटरनेट,मोबाईल डाटा आणि एकुणच हे छोटेसे उपकरण आता प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा अविभाज्य अंग बनत चालले आहे. याबाबतच्या अनेक नवीन बातम्या सतत येत असतात. अशाच काही बातम्या नुकत्याच आल्यात ज्यामुळे मोबाईल आता गावोगावी पोहोचलाय व पोहोचत राहणार आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मोबाईल ज्या वेगाने आपल्या देशात पसरतोय ती गती मती गुंग करणारी आहे. त्यामुळेच प्रत्येकाच्या हातात पोचलेला हा मोबाईल नक्की काय काय गुल खिलवत आहे हे समजून घ्यायला पुरेसा अवधीच मिळत नाही आहे. या छोटाश्या उपकरणाने फक्त आपले जगणेच नव्हे तर अख्ख्या देशाचा पोतच बदलुन टाकलेला आहे.कारण  आज देशाच्या विविध भागात , विविध विषयांमुळे जे काही घडतंय आणि बिघडतंय त्या सगळ्यांचं वरवरचे कारण काही का असेना पण प्रकरणाच्या मुळाशी गेले तर त्याचे खरे कारण मोबाईल आहे हे लक्षात येईल.म्हणुन आता मोबाइलमुळे होणारे सामाजिक, राजकीय, भौगोलिक व मानसिक परिणाम हे समजून घेण्याची वेळ आलेली आहे.

विशेषतः गेल्या दोन वर्षांत स्मार्टफोन आणि ‘फोर जी’ने मोबाईल क्रांती झाली. या क्रांतीमुळे मोबाईल भारताच्या ग्रामीण भागात पाोहचला. शहरी भागात, ज्याचा आपण नेहमी इंडीया असा उल्लेख करतो, तिथे हा स्मार्टफोन आणि त्यामुळे मिळालेली कनेक्टिव्हिटी येऊन पाच वर्षे होऊन गेली. त्यामुळे या शहरी वर्गाला विशेषतः मध्यमवर्गाला जे काही फायदे झाले त्यावर बरीच साधक बाधक चर्चाही झाली. मात्र, एका मर्यादेच्या पलीकडे ज्यांचा फारसा विचार केला जात नव्हता अशा ग्रामीण भागात म्हणजे थोडक्यात स्मॉल टाऊन इंडियामध्ये हे माध्यम वायुवेगाने घुसले आणि या तंत्रज्ञानामुळे ते खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहाचा भाग बनले. इंडीया आणि भारत अशा वर्गीकरणात जो समाज आणि वर्ग भारतात येतो त्या सगळ्यांकडे मोबाईल पोहोचला तो गेल्या २ वर्षातच. एका पत्रकार मित्राने हा फेनोमेनो सांगितला आहे. तो म्हणतो त्याप्रमाणे १९९१ च्या जागतिकिकरणामुळे जो फायदा झाला तो २००० सालापर्यंत श्रीमंतांना झाला. २००० ते २०१५ पर्यंत तो शहरी मध्यमवर्गाला झाला तर आता २०१५ ते २०२५ अशी १० वर्षे तो ग्रामीण भागाला आणि निम्न मध्यमवर्गाला होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काही वर्षात भारताचा केंद्रबिंदु हा तिकडे सरकणार आहे , कारण हा लाभार्थी वर्ग संख्येने प्रचंड आहे. हातातल्या छोटय़ाशा डिव्हाईसमुळे या सगळ्या लोकांना स्वतःचा आवाज मिळाला आहे, आत्मविश्वास मिळु लागला आहे.  देशाच्या वेगवेगळ्या राज्यात होणारी आंदोलने, वेगवेगळ्या चर्चा पाहिल्या तर असे लक्षात येईल कि ही आंदोलने आणि मागण्या ज्या आहेत  तो ग्रामीण भागाचा, शेतकरी वर्गाचा आवाज आहे. जो आजवर कधी मुख्य प्रवाहाचा भागच बनला नव्हता.

याचवेळी अजुन एक गोष्ट घडली ती म्हणजे सरकारने निश्चलनीकरणानंतर आलेले सर्व मोबाईल्स भारतीय भाषांमध्ये असणे बंधनकारक केले. सरकारी निर्णय व ग्राहकाभिमुखता यामुळे आता हा मोबाईल प्रत्येक माणसाला त्याच्या/ तिच्या बोली भाषेत उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आजपर्यंत कित्येकांकडे जरी मोबाईल असला तरी त्यांचा संवादासाठी वा इतर कामासाठी वापर करताना भाषेची विशेषत: इंग्रजी शब्दांच्या अज्ञानामुळे जी अडचण यायची ती कमी झाली आहे. याच कारणामुळे असेल कदाचित पण महिला, सिनियर सिटिझन यांच्याकडे आता सहजपणे स्मार्टफोन दिसु लागले आहेत. त्यामुळे आपल्या भाषेत जसे जमेल तसे आपले विचार, आपले मुद्दे, आपले प्रश्न मांडायला एका मोठ्या वर्गाला प्लॅटफॉर्म मिळाला. व्हॉट्सअॅप सारखे खुल्या संवादाचे माध्यम हाताशी आल्यामुळे ही नवी अभिव्यक्ती सहज सर्वत्र पसरणे ही शक्य झाले. आज ग्रामीण आणि निमशहरी भागात कित्येक लोक असे आहेत की ज्यांच्या मोबाइलवर इंग्लिश मधला की बोर्ड्च नाही. त्यांच्या मोबाईलवर अॅपच्या नावापासून ते त्यांच्या फोन कॉन्टॅक्ट्स पर्यंत सगळे त्यांच्या बोलीभाषेत आहे आणि युनिकोड सारख्या प्रणालीमुळे ते सर्व वापरायला मात्र अत्यंत सोपे आणि सुलभ आहे. केपीएमजी नावाच्या प्रख्यात संस्थेने केलेले सर्वेक्षण सुद्धा हाच मुद्दा अधोरेखित करते. या सर्वेक्षणानुसार २०२१ पर्यंत भारतामध्ये इंग्रजीतून इंटरनेट वापरणाऱ्या लोकांची संख्या इतकी रोडावली असेल की ती दखलपात्रच उरणार नाही ,त्याऐवजी भारतीय भाषांमधून मोबाइल वापरणाऱ्यांची संख्या ही भौमितिक वेगाने वाढेल .याचा फायदा असा दिसून येतो की ग्रामीण भागात, विशेषत तरुणाईमध्ये इंग्रजीचा म्हणून जो न्यूनगंड होता तो हळूहळू निघून जाऊ लागला आहे. आजची तरुण पिढी ही जास्त आत्मविश्वासपुर्ण वाटु लागली आहे. ती स्वतःचे प्रश्न विचारु लागली आहे, उत्तरे शोधु लागली आहे. या माध्यमांवर कोणाचेच नियंत्रण नसल्याने ज्ञान व माहिती मिळवायची संधी सर्वांनाच खुली झाली आहे. त्यात जात, धर्म, व्य, लिंग, गाव असा कोणताच अडथळा उरलेला नाही. त्यामुळे आजची मोबाईल सॅव्ही व्यक्ती विशेषतः तरुण आता कोणीतरी फक्त सांगतोय म्हणून एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवेनासा झाला आहे. कारण एखादा जे काही सांगत आहे ती माहिती  तपासायची आणि त्यातले खरं खोटं काय हे ठरवायची सोय आता त्याचा कडे आहे. याचा पहिला परिणाम जाणवु लागला आहे तो इतिहासावर. आज देशात जागोजागी ऐतिहासिक सत्यावर आणि मुद्द्यावरती जे काही वाद विवाद  मोठ्या प्रमाणात सुरू झालेत त्याचे एक प्रमुख कारण ही मोबाईल सेवी नवीन तरुण पिढी आहे. आजपर्यंतच्या धारणा , ज्येष्ठांनी सांगितलेले मुद्दे हे सर्व पुन्हा तपासुन पाहिले जात आहेत आणि कोणत्या तरी राज्यात हे बंड जातीच,  कुठं धर्माच, तर कुठं प्रादेशिक आणि भाषिक अस्मितेचे रुप घेऊन समोर येत आहे. पण याचे मुळ मोबाईलमुळे आलेली स्वतः बद्द्लची आणि स्वतःच्या अस्मितांबद्द्लची सजगता यात आहे.

कोणतेही बदल मनोरंजन व माध्यम क्षेत्रात सगळ्यात आधी दिसतात असे मानले जाते. हा बदललेला समाज आणि मुख्य प्रवाहात सामिल झालेले नवीन घटक याची नोंद मनोरंजन क्षेत्राने लगेच घेतल्याचे जाणवते. टीव्ही पाहिल्यानंतर असे लक्षात येते की जवळपास सर्वच मराठी म्युझिक चॅनलवर आजकाल लागणारी गाणी ही जास्तीत जास्त ग्रामीण बाजाची दिसतात. ज्याला आपण मास साँग्स म्हणू शकतो अशी गाणी असतात.दोन वर्षांपूर्वी ज्यावर स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे अशा शहरी कलाकारांची गाणी तासाला चार पाचदा लागायची. तसेच चित्रपट असो वा मालिका, पुस्तक असो वा संगीत. सगळीकडे हाच बदल झालाय. प्रत्येक माध्यम जास्तीत जास्त गावात पोहोचायचा प्रयत्न करत आहे किंबुहना या मोबाईल सॅव्ही नवीन समाजाच्या ताकदीने त्यांची दखल घेणे भाग पाडले आहे. मुख्य प्रवाहातील माध्यमे या नव्या पिढीला स्थान देऊ पाहत आहेत. त्याच वेळी या तरुणाईला मात्र विविध भाषातील जागतिक सिनेमे, नेटफ्लिक्स, अमेझॉन हे सगळं त्यांच्या हाताच्या बोटांवर उपलब्ध झाले आहे.यातील चांगल्या गोष्टी लगेच व्हायरल होत असल्याने या नवीन जागतिक दर्जाच्या गोष्टी समजून घ्यायला कोणत्याही गुरुची गरज उरलेली नाही. आज एखाद्या छोट्या गावातल्या मुलाने सुध्द्दा गेम ऑफ थ्रोन्स चे सर्व एपिसोड्स पाहिलेले असतात. इतकेच काय तर उपलब्ध सामग्रीतुन ते आता वेगवेगळ्या वेब सिरीज मोठ्या प्रमाणात बनवत आहेत. वऱ्हाडातल्या कुठल्या तरी मुलीचे “सोटी पोरगी” नावाचे व्हिडिओ,  बार्शीच्या पोरांनी चालवलेले “ट्रम्प तात्या”चे व्हिडिओ आणि सध्या व्हॉट्सॅपवर फेमस झालेले वेगवेगळा इंग्लिश गाण्यांच्या व्हिडिओत मराठी शब्द घालून केलेले रिमिक्स  व्हिडिओ  स्टेट्स असे काहीतरी वेगळ एक भन्नाट मिक्स गेल्या वर्षभरात प्रामुख्याने समोर येत आहे .गंमत म्हणजे पूर्वी या सगळ्याला ग्राम्य म्हणून हिणवले गेले असते पण आता सो कॉल्ड शहरातल्या उच्चभ्रू लोकांनाही हे सगळे आवडायला लागले आहे . वेगवेगल्या बोलीभाषांना सुगीचे दिवस आले आहेत. एक सांस्कृतिक घुसळण नकळत सुरु आहे ती या मोबाईल मुळे. या मोबाईलच्या ताकदीचे एक ठळक उदाहरण म्हणजे गेल्या काही दिवसात उदयाला आलेले नवीन आयडॉल्स. प्रत्येक पिढीला नवे आयडॉल लागतात, नसतील तर ते उभे करावे लागतात. तसेच या पिढीचा एक आयडॉल म्हणून उभा राहिले ते म्हणजे विश्वास नांगरे पाटील. एका वाक्यात सांगायचे तर खरंतर या मोबाइल जनरेशनचे फलित होय. नांगरे-पाटील घरोघरी पोहोचले आणि फेमस झाले ते त्यांचे प्रेरणादायी भाषणाचे, त्यांच्या कामाच्या थरारक अनुभवांचे व्हिडिओ मोबाईलवरुन व्हायरल होऊ लागले त्यावेळेला. आता तर त्यांच्या खऱ्या-खोट्या, त्यांनी बोललेल्या आणि न बोललेल्या कोट्सचे मेसेजसुद्धा धुमाकुळ घालत असतात. ग्रामीण भागात मुलतः च असणारे सिव्हिल सर्व्हिसेसचे विशेषत: पोलिसी पेशाचे विशेष आकर्षण लक्षात घेतले तर विश्वास नांगरे-पाटील हे या नव्या तरुणाईचे हिरो का बनले ते सहज लक्षात येईल.

आज भारतात जितके लोक टीव्ही पाहतात किंवा जितके लोक रेडिओ ऐकतात, त्याहून जास्त लोक व्हॉट्सअॅप वापरतात. याचाच  अर्थ असा की येथून पुढे कोणत्याही प्रकारच्या संवादासाठी व्हॉट्सअॅप किंवा मोबाइल हेच प्रमुख माध्यम राहणार आहे. अगदी भविष्यातील राजकारणाचा व निवडणुकांचा केंद्रबिंदु सुद्धा मोबाईलच राहणार आहे आणि इथेच खरा धोका आहे. जसे या नवीन माध्यमांमुळे पिढी बदलली,  जाणिवा बदलल्या, समाजच बदलला . तसं हेच माध्यम लोकांची माथी भडकवण्यासाठी सुद्धा वापरता येऊ शकते, याच मोबाईलवरुन एखाद्या स्त्रीचे आयुष्यही उध्वस्त करता येते. महाराष्ट्र बंदच्या दिवशी मोबाईलमुळे इतक्या अफवांचे पिक आले की जवळपास २ दिवस प्रशासनाला मोबाईल इंटरनेट बंद करावे लागले.पण प्रत्येक वेळी इंटरनेट बंद करणे हा उपाय असणार नाही. कारण विघातक शक्ती जेव्हा हे अस्त्र वापरत असतील तेव्हा याच मोबाईल इंटरनेटवर हजारो लाखो तरुण त्यांच्या भविष्याच्या दृष्टीनं अभ्यास करत असू शकतात, लोकांशी बोलत असू शकतात, संवाद साधत असू शकतात. थोडक्यात त्यांची सगळी प्रगती हि त्या मोबाईलच्या आणि इंटरनेटच्या माध्यमातून सुरू असू शकते. त्याला असे सतत ब्रेक लावणं शक्यच नाही. या नव्या रिअॅलिटीत सेन्सॉरशिप हा पर्यायच असू शकत नाही. मग या माध्यमांचा विधायक वापर होईल यासाठी नक्की करायचं तरी काय? तर त्याचे उत्तर आहे या माध्यमांबद्दल आपलेच समाजभान तयार करणे. फक्त कायदे करून व्हॉट्सअॅपवरच्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी गुन्हे दाखल करून प्रश्न सुटणारे नाहीत. आपल्या समाजाला मोबाईल नक्की कसा वापरायचर हे ठरवावे लागेल. कोणतेही नवीन माध्यम आले की हाच गोंधळ उडतो.  टीव्ही आला तेव्हाही चांगल्या वाईटाचे प्रश्न निर्माण झाले होते, रेडिओ बद्दलही झाले होते .पण आत्ताचा प्रश्न मोठा यासाठी की या मोबाईलची गती प्रचंड आहे. त्यामुळे जे काही सोशल फ्रेमवर्क तयार करायचे आहे ते लवकर करावे लागेल. त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात कळत -नकळत जे बदल होत आहेत ते समजुन घ्यावे लागतील आणि ते सगळे मुळात या मोबाईलशी संबंधित आहेत हे मान्य करुन कामाला लागावे लागेल. ‘डाटा इज न्यू ऑईल’ हे नव्या जगाचे सत्य आहे. येथून पुढच्या काळात जो डाटावर कंट्रोल करेल तोच या जगाचा राजा ठरेल. हे जर का आपल्याला कळलं तर एक समाज म्हणून आपल्याला या नव्या जाणीवांना, नव्या गुंतागुंतीला व त्यातुन तयार होणाऱ्या नव्या प्रश्नांना सामोरे जाता येईल . आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आहे ती म्हणजे आपला डेमोग्राफिक डिव्हिडंट म्हणजे आपली तरुणाई . सुदैवाने ही तरुणाई जास्तीतजास्त सक्षम बनु लागली आहे, थँक्स टु मोबाईल !! फक्त ही शक्ती नीट वापरावी लागेल नाहीतर तिचा डेमोग्राफिक बॉम्ब बनायला वेळ लागणार नाही. मंगल देशा, पवित्र देशा , मोबाईल देशा हीच उद्याची गरज आहे.

Back to top button