मुलायम हातांसाठी… | पुढारी

मुलायम हातांसाठी...

कीर्ती कदम : त्वचेला मॉयश्चराईज केल्यावर हातही मुलायम होतात. मॉयश्चराईज केल्याने नखांच्या जवळ असलेली पांढरी आणि बाहेर आलेली त्वचा मुलायम होते.
आपल्या हातांच्या नखांजवळची त्वचा खूप नाजूक असते. जर तिची नीट काळजी घेतली नाही तर ती कोरडी होते. त्यामुळे नखांच्या जवळच्या त्वचेत फटी पडू लागतात आणि ती फाटत जाते. त्यावर वेळीच इलाज केला नाही तर त्यामुळे एग्जिमासारखे त्वचाविकार बळावण्याची शक्यता असते. त्वचेला मॉयश्चराईज केल्यावर हातही मुलायम होतात. मॉयश्चराईज केल्याने नखांच्या जवळ असलेली पांढरी आणि बाहेर आलेली त्वचा मुलायम होते.

मॉयश्चराईजरचा वापर

आपल्या हातांच्या बोटांचा आपण सर्वाधिक वापर करतो. त्यामुळे हातांवर रोज हँड लोशनने काही वेळ मसाज करा. हातांची बोटे काही वेळ गरम पाण्यात बुडवून ठेवा. त्यामुळे नखे मऊ होतील आणि ती सहज कापता येतील. नखांच्या आसपास असलेली त्वचाही नरम पडते आणि अशावेळी डेड स्कीन सहजपणे काढून टाकता येते. डेड स्कीन काढून टाकण्यासाठी क्यूटीकल क्लिपरचा वापर करता येतो.
तुमच्या नखांच्या जवळची त्वचा मॉयश्चराईज करा. त्यासाठी कोरड्या त्वचेवर ऑलिव किंवा खोबरेल तेल लावा. त्यामुळे हातांची चमक परत येईल. ज्यांच्यात बी जीवनसत्त्वाची कमतरता असते, त्यांची त्वचा कोरडी असते. म्हणून ‘बी’ जीवनसत्त्व असलेल्या पदार्थांचा जेवणात समावेश करा. एवढे करूनही तुमचे हात रखरखीत असतील तर मग डॉक्टरांचा सल्ला घ्या.

घरगुती उपाय

हात मुलायम आणि तजेलदार होण्यासाठी काही घरगुती उपायही आहेत. नखांच्या आसपासची त्वचा तंदुरुस्त राहण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. हातावर दोन चमचे दही घ्या. ते दोन्ही हातांवर चांगले चोळा. हात टॉवेलच्या खाली किंवा एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत घालून पाच ते दहा मिनिटे ठेवा. त्यामुळे दह्यातील लेक्टीक अ‍ॅसिडद्वारे हातांची डेड स्कीन निघून जाते. हात बाहेर काढून कोमट पाण्याने धुवा. तुमचे हात जास्तच चिकट झाले असतील तर साबण नसलेल्या क्लीनरने ते धुवा.
याशिवाय आणखीही काही उपाय आहेत. त्यातील एक म्हणजे एका वाटीत कच्चा मध, ऑलिव ऑईल आणि कोरफडीचा रस घ्या. ब्रशने हे सर्व चांगले एकत्र करून घ्या. नंतर थोडासा कापूस त्यात बुडवून ठेवा. कापसाने ते सर्व मिश्रण शोषून घेतले की तो कापूस घेऊन आपल्या कोरड्या त्वचेवरून हलक्या हाताने  फिरवा.

Back to top button