मुलांना ‘ही’ शिकवण आवश्य द्या | पुढारी

मुलांना ‘ही’ शिकवण आवश्य द्या

आजच्या काळात मुलांनी स्मार्ट बनणं गरजेचे बनलं आहे. त्यासाठी आपण मुलांना अनेक प्रकारचे वेगवेगळे क्लास, प्रशिक्षण वर्ग लावत असतो. त्याचा फायदा मुलांना मिळतोच; पण काही छोट्या छोट्या गोष्टी आपण घरीच मुलांना शिकविल्या, तर मुलांना त्याचा फायदाच होऊ शकतो. तसेच मुले सजग आणि स्मार्ट बनू शकतात.

सध्या घराची सुरक्षितता सर्वात महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. आई-वडील नोकरीनिमित्त बाहेर राहत असतील तर मुलेचे घरी असतात. अशावेळी मुलांना घर बंद करण्याचे, खिडकी दरवाजे बंद करण्याचे शिकविणे आवश्यक ठरते. लहानपणापासून ही सवय लावल्यास घराच्या सुरक्षिततेबाबतीत मुले सुरुवातीपासूनच गंभीर राहतील. तसेच गॅस आणि रेग्युलेटरचा वापर कसा करायचा, हेदेखील आपण मुलांना शिकवू शकतो.

गॅसची सुरक्षितता कशी बाळगायची, हे मुलांना शिकविल्यानंतर आपण नेहमीच चिंतामुक्त राहू शकतो. शिवाय, आपण घराबाहेर असल्यास मुले घरात अशा वस्तूंशी खेळणार तर नाहीत ना, याची काळजी राहणार नाही. यानंतर मुलांना इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद करण्याबाबतही माहिती द्यावी. त्यांच्यासोबत उभे राहून त्यांच्याकडून टीव्हीचे मुख्य बटण बंद करण्यास सांगावे. तसेच संगणक, पंखा, एसी, घरातील दिवे या सर्व वस्तू बंद करण्यास मुलांना शिकवावे. गरज नसताना या वस्तू वापरू नयेत ही शिकवण एकदा दिली म्हणजे मुलांनाही ऊर्जा बचतीची सवय लागेल आणि पुढे आयुष्यभर या सवयीचा त्यांना फायदा होईल.

संबंधित बातम्या

बरीच मुले बेसीन, सिंक किंवा टॉयलेटमधला नळ कारण नसताना सुरू ठेवतात अथवा बंद करायला विसरतात. यामुळे पाणी वाया जाते. बरेचदा सकाळी नळाला पाणी आल्यानंतर लक्षात येते की, मुलांनी रात्री नळच बंद केला नाही. यामुळे पाणी सर्वत्र पसरत राहते. मुलांना पाण्याचे महत्त्व वेळीच पटवून द्यावे आणि भविष्यात पाणी किती अमूल्य ठरणार आहे, याची जाणीव करून द्यावी म्हणजे ते पाण्याचा वापर काळजीपूर्वक करतील.

कुठलाही कचरा कचरापेटीत टाकावा ही सवय लहानपणापासून मुलांना लावावी. चॉकलेटचे कागद, बिस्किटाचे रिकामे पुडे, मुलांनी केलेला इतर कचरा इत्यादी सर्व स्वत: मुलांना कचर्‍याच्या टोपलीत टाकण्यास सांगावे. तसेच बाहेर गेल्यानंतरही वेफर्स किंवा अन्य कुठल्याही स्नॅक्सच्या रिकाम्या पिशव्या व इतर कचरा सार्वजनिक कचरापेटीत टाकण्यास भाग पाडावे. हा कचरा रस्त्यात कुठेही फेकण्यापासून मज्जाव करावा म्हणजे घरातील स्वच्छतेसोबत सार्वजनिक स्वच्छतेबाबतही मुले जागृत होतील. पर्यायाने घर आणि परिसर स्वच्छ राहण्यास मदत होईल.

Back to top button