‘पालक डिशेस’मधील पोषक वैविध्य | पुढारी

‘पालक डिशेस’मधील पोषक वैविध्य

आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असला पाहिजे, याबद्दल डॉक्टर, आहारतज्ज्ञ आग्रही असतात. कारण त्यातून मिळणारे पोषण. पालेभाज्या खाणे हे बर्‍याचजणांना आवडत नाहीत, पण त्यातील पोषक घटक शरीराला गरजेचे असतात. पालेभाज्यांमध्ये पालक ही भाजी आपण अनेकदा आहारात वापरत असतो. या भाजीत भरपूर पौष्टिक घटक असतात. पालकाची हिरवीगार पानं वेगवेगळ्या प्रांतात स्वयंपाकात वापरली जातात.

पालकाची भाजी वर्षभर मिळते. पण मार्च ते मे आणि सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यांत येणारी भाजी जास्त चांगली. हा पालकाचा हंगाम असल्याने, भाजी चवदार येते. स्पिनाशिया ओलेराशिया असे या कुलाचे शास्त्रीय नाव आहे. हिरवीगार, मऊ नाजूक पाने असलेल्या पालकाच्या भाजीतून भरपूर प्रमाणात पोषक द्रव्ये मिळतात. भरपूर पोषक द्रव्ये देणारी ही भाजी, उष्मांक मात्र अत्यंत कमी देते. त्यामुळे वजन वाढत नाही, पण ही भाजी जीवनसत्व, खनिज आणि इतर द्रव्यांनी युक्त असते. त्यामुळे ही भाजी सगळेजण खाऊ शकतात. तसेच ती सर्वत्र सहज उपलब्ध होते. ही भाजी सर्वांनाच परवडू शकणारी आहे. तसेच ती तुम्ही तुमच्या घरी परसदारी किंवा बागेत लावू शकता.

पालकाची भाजी अनेकविध प्रकारे खाल्ली जाऊ शकते. तुम्ही त्याची भाजी करा किंवा धुवून कच्ची चिरून सलाड मध्ये वापरा. पालकाचे इतरही काही पदार्थ होऊ शकतात. पालक कोणत्याही म्हणजे शाकाहारी किंवा मांसाहारी पदार्थात वापरला जाऊ शकतो. पालकाच्या या लोकप्रिय, चविष्ट पाककृतींविषयी…

पालक आणि कॉर्न भजी : भजी आपल्या भारतीय आहारातला अविभाज्य घटक म्हणता येईल. सगळ्यांनाच तो आवडतो. पालक चिरून घ्या. कॉर्नचे दाणे आणि चिरलेला पालक यांमध्ये पीठ, मसाला, मीठ घाला. कडकडीत तेलात भजी तळून घ्या.

मशरूम-पालक समोसा : मशरूम आणि चिरलेल्या पालक मीठ आवडीचे मसाले घालून परतवून घ्या. कणकेची पोळी लाटून दोन भाग करा. एका भागात वरील मिश्रण भरा, त्रिकोणी आकार देऊन तळून घ्या.

कॉर्न, पालक चीझ टोस्ट :  कॉर्न आणि पालक चिरून उकडून घ्या. आपल्या आवडीप्रमाणे मसाले, मीठ टाकून नेहमीसारखे सँडवीच बनवा. वरून चीज घाला.

पालक पुरी : ही पुरी बहुतेक सर्वजण आवडीने खातात. ती बनवण्यासाठी आधी पालकाची पेस्ट बनवा, त्यात चवीनुसार मीठ, मसाले घालून त्यात पीठ मळा. पुर्‍या तळून घ्या. कैरीच्या चटणीबरोबर किंवा मिरचीच्या लोणच्याबरोबर सर्व्ह करा. पालकाच्या भाजीत चीज घातले तरीही पालक छान लागतो. पालक चीज भाजी तयार होईल.

पालक पनीर : ही डीशही सर्वांच्याच आवडीची. टोमॅटो-कांद्याच्या पेस्टमध्ये खडा मसाला घालून पालक आणि पनीर टाकून शिजवलेली ही भाजी बनवता येते. मसूर किंवा विविध डाळींचा वापर करूनही पालकाची भाजीही उत्तम लागते. मऊ शिजलेला मसूर आणि पालकाच्या भाजीत थोडे गरम मसाले घातले, तर भाजी अधिक चवदार होते.

पालकाची भजी : भजीप्रेमी लोकांची ही आवडती डिश आहे. पालकाची छोटी पाने, तिखट, हळद, मीठ घालून भिजवलेल्या डाळीच्या पीठात बुडवून, तेलात तळावीत. झाली पालकभजी तय्यार !

मूग डाळ घालून केलेली पालकाची भाजी चवदार होते. तसेच भाजीची पौष्टिकताही वाढते. ही भाजी पातळ आणि सुकी अशा दोन्ही प्रकारे करता येते. पालकाची मूग डाळ घालून परतून केलेली भाजी ही दक्षिण भारतात जास्त प्रमाणात पहायला मिळते.

Back to top button