कौटुंबिक लोकशाही | पुढारी | पुढारी

कौटुंबिक लोकशाही | पुढारी

माणसाजवळ ध्येयं आहेत, ध्यास आहेत व त्यापेक्षा उद्दिष्टही आहे. माणसं कुठेतरी ध्येय ठेवतात आणि त्यामागे धावत सुटतात. एखादं उद्दिष्ट ठरवतात आणि गेट सेट… पळा नुसते पळा. विशेषतः ही ध्येये ही पैशाशी निगडीत, उच्च पदाशी संबंधित. पण, या धावाधाव करण्यातून कुटुंब टिकायला हवं, नाती जपायला हवीत, नात्यात प्रेम जिव्हाळा बांधिलकी, विश्‍वासार्हता असायला हवी हे उद्दिष्ट आता महत्त्वाचे आहे. विवाह आणि कुटुंंबव्यवस्था भग्‍न पावणार नाही, मोडणार नाही याची दक्षता घ्यावी. हे तर आजच्या युगाचा मंत्र होय. तो साध्य करण्याच्या अनेक मार्गापैकी ‘कौटुंबिक लोकशाही’चा मार्ग जतन करून ठेवायला हवा.

कौटुंबिक लोकशाहीत कुटुंबातलं फक्‍त पुरुषाचं नेतृत्व मान्य नसावं. त्यांचाच शब्द अंतिम व बंधनकारक नसावा. याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे फक्‍त स्त्रीचं ही नेतृत्व मान्य नसावं. तिचाच शब्द हुकुम म्हणून पाळणं हीच कुटुंब  पद्धत नक्‍कीच जाचक व लोकशाहीला मारक ठरणारी आहे. घर दोघांचं, स्वर दोघांचा, कर्तव्य दोघांची हेच सूत्र अस्तित्वात आणि अंमलात येणं वा रहाणं गरजेचं अगदी मूल झाल्यानंतरही. घर सर्वांचं, स्वर सर्वांचा व्हायला हवा हेच कौटुंबिक लोकशाहीसाठी आवश्यक आहे.

अर्थात, कौटुंबिक लोकशाही कुटुंबप्रणाली योग्य असली, तरी त्यात अडचणी येतातच. एकतर पुरुषप्रधान कुटुंबपद्धती व कुटुंबाची सत्ताही पुरुषांकडे. ती सहजासहजी  हद्दपार करणं अवघड आहे. दुसरं म्हणजे स्त्री दुय्यम दर्जाची व तिचे स्थान कनिष्ठ असेही रूढ संकेत. परिणामी, त्यांच्यात न्यूनत्वाची भावना असण्यातून गोंधळेपण, भित्रेपण व पुरुषांचा सुपिरिऑरिटी कॉम्पलेक्स वाढत जातो, हे टाळायला हवे.

संबंधित बातम्या

सुनेला वागणूक एक आणि मुलीला दुसरी ही कौटुंबिक लोकशाहीला बाधकच. दोन स्त्रीमनाचे सहसंवेदन होतं, असे मत. पण तोही अलिकडे भ्रम ठरत आहे. आई-वडिलांचा अहंकार, त्यांचं विभक्‍त होणं घडत आहे. त्यामुळे मुलांची कोंडी हे चित्र. काय निष्पन्‍न होणार यातून?  विवाहविच्छेदन आणि कुटुंबभग्‍नता याकडेच वाटचाल ना!

कुटुंबातील नात्यामध्ये स्वातंत्र्य, समानता, सहसंवेदना हवी तरच लोकशाही कुटुंबात प्रस्थापित होईल. कुटुंबातील प्रत्येकामध्ये विशेषतः पती-पत्नीमध्ये वृत्तीच्या देवाण-घेवाणबाबत दोघांनी पन्‍नास पावलं मागं-पुढं चालत यावं. तरच व्यवस्थित समतोल साधला जाईल. प्रायव्हसी, पर्सनल स्पेस, कम्फर्ट झोन हे तर आजच्या कुटुंबव्यवस्थेत मोलाचे व त्याची गरज आहेच आहे. पण, त्यामध्ये टोकाची भूमिका घेत असंवेदन, कोल्ड इमोशनल क्रूएल्टी वाटावे इतपतचा थंडपणा आणि एकाकीपण येऊन देणे हिताचेच! तेच तर कौटुंबिक लोकशाही अस्तित्वात आणण्याच्या प्रयत्नांचे फलित अपेक्षित आहे.

अहंकाराची धुंदी नको, ज्येष्ठत्वाचा व सत्तेचा तोरा नसावाच, मत भिन्‍नतेचा आदर असावा. मात्र मनभेद होऊ नये, स्त्रीत्वाचे हत्यार उपसून इतरांना तुच्छ लेखणे घडू नये. एक प्रकारचा समझोता व स्वीकृती हवी. पण ती कौटुंबिक लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी.

Back to top button