Development Skills : दहावीनंतर कौशल्य विकसित करा | पुढारी

Development Skills : दहावीनंतर कौशल्य विकसित करा

माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो, असे म्हणतात. सतत शिकत राहिले पाहिजे. त्याशिवाय जगातील नवीन गोष्टींचे आकलन कसे होणार? स्वतःचा विकास करण्याबरोबरच स्पर्धेत टिकण्यासाठी कौशल्य विकास ही काळाची गरज बनली आहे. ( Development Skills )

औपचारिक शिक्षणाबरोबरच अनौपचारिक शिक्षणही तितकेच आवश्यक पचारिक बनले आहे. कौशल्य शिक्षण किंवा विकासासाठी वयाचे बंधन नाही. शाळा असो किंवा निवृत्तीनंतरचे जीवन, यात आपण स्वत:ला अपडेट करत राहणे अत्यावश्यक बनले आहे. दहावीची परीक्षा झाल्यानंतर मुलांकडे बराच फावला वेळ असतो. अर्थात, काही मुले क्रीडा शिबिर लावतात, कोणी पर्यटनाला जातात, तर काही जण मोबाईल, व्हिडीओ गेम्स यामध्ये वेळ घालवतात; परंतु आपण चोवीस तासांतील दोन-तीन तास कौशल्य विकासासाठी दिल्यास ही बाब भविष्यासाठी निश्चितच फायद्याची ठरू शकते.

संवाद कौशल्य विकसित करणे

अन्य मंडळींशी आपण संवाद कसा साधतो, त्यांच्याशी कसे बोलतो, यावर आपले व्यक्तिमत्त्व ठरत असते. समोरील व्यक्तीवर प्रभाव पाडण्यासाठी उत्तम संवाद महत्त्वाचा आहे. दहावीनंतर कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल्स, पब्लिक स्पीकिंग स्किल्स विकसित करण्यासाठी क्लास सुरू करावा. काही मुले अन्य मंडळींशी बोलताना लाजतात किंवा ओशाळतात. त्यामुळे अशा वर्गाच्या मदतीने आत्मविश्वास निर्माण केला जातो आणि त्यातून मुलांमध्ये बोलण्याचे धाडस तयार होते. याशिवाय ऑनलाईनवरही संवाद कौशल्य वाढविणारे अभ्यासक्रम, टिप्स उपलब्ध आहेत. त्याचीही मदत विद्यार्थी घेऊ शकतो.

इंग्रजीबरोबरच परकी भाषेचे शिक्षण

बहुतांशी मुले इंग्रजी माध्यमातून शिकत असल्याने त्याचे प्राथमिक ज्ञान अवगत असतेच; परंतु दहावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रम निवडताना, परदेशात शिक्षणासाठी जाताना इंग्रजीवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे. यासाठी दहावीतील इंग्रजी शिक्षण पुरेसे नाही. त्यामुळे इंग्रजी स्पीकिंग कोर्स लावावा. ऑनलाईन किंवा ऑफलाईन अभ्यासक्रमाच्या मदतीने इंग्रजीचे ज्ञान आणखी वाढवावे.

इंग्रजीबरोबर अन्य भाषा शिकण्याचाही प्रयत्न करावा. उन्हाळी शिबिरात अशा प्रकारचे परकी भाषा शिक्षण अनेक ठिकाणी शिकवण्यात येते. फ्रेंच, जर्मन, जपानी या भाषांचे ज्ञान प्राप्त केल्यास भविष्यात करिअर आणखीच सुकर होईल. कालांतराने परकी भाषा अभ्यासक्रमातही उच्च शिक्षण घेण्याचाही विचार करता येतो. इंग्रजी किंवा अन्य भाषांचे शिक्षण घेतल्याने शब्दसंग्रह वाढतो. याशिवाय इंग्रजी वर्तमानपत्र, मासिक वाचणे, इंग्रजी बातम्या ऐकण्यातूनही इंग्रजीची भीती कमी होत जाते. ( Development Skills )

Back to top button