गणित आवडत नाही ? | पुढारी | पुढारी

गणित आवडत नाही ? | पुढारी

शालेयदशेत अनेकांना गणिताची भीती वाटत असते. गणितातील आकडेमोड काहींच्या आकलनाबाहेर असू शकते. त्यामुळे अन्य विषयात चांगले गुण असताना गणितात मात्र काही विद्यार्थी कच्चे राहतात. मात्र करिअरसाठी गणितही हा तितकाच महत्त्वाचा विषय मानला जातो. शास्त्र असो किंवा बँकिंग सेक्टर असो, गणिताशिवाय पर्याय नसतो. मात्र काहींना गणितच समजत नसेल तर अशा मुलांनी काय करावे? असा प्रश्‍न पालकांना पडतो. अर्थात आजकाल करिअरचे इतके पर्याय उपलब्ध झाले असून त्यासाठी गणित असणे गरजेचे नाही. दहावी किंवा बारावीपर्यंत गणित विषय घेऊन अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक वाटा असतात. त्याचबरोबर गणिताशिवाय असणार्‍या वाटादेखील विद्यार्थ्यांना उपयुक्‍त ठरत आहेत. ड्रेस डिझायनर, पत्रकारिता, आर्किटेक्चर, फॅशन डिझायनर, फूड टेक्नॉलॉजी यामध्ये करिअरच्या असंख्य  संधी आहेत. त्याची निवड करून विद्यार्थी करिअरचा मार्ग निवडू शकतो. 

आर्किटेक्चर : जर बारावीपर्यंत विद्यार्थ्याला गणितात चांगले गुण नसले तरी आर्किटेक्चर क्षेत्राची निवड करू शकतो. त्यासाठी नॅशनल अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट देणे गरजेचे आहे. त्यासाठी किमान 50 टक्के गुण असणे गरजेचे आहे. या परीक्षेत आर्किटेक्चरसंबंधीच्या ज्ञानाची माहिती विचारली जाते. तेथे खूप आकडेमोड असतेच असे नाही. ज्यांना आर्किटेक्टमध्ये करिअरच करायचे आहे, त्यांनी या पर्यायाचा विचार करायला हरकत नाही. आर्किटेक्चरला आज बांधकाम क्षेत्रात खूप मागणी असून सरकारी आणि खासगी क्षेत्रातही रोजगाराची मोठी संधी आहे. 

इंटेरियर डिझायनर : गेल्या काही वर्षात राहणीमानात आमूलाग्र बदल झाले आहेत. प्रत्येक व्यक्‍तीला आपले घर एखाद्या पंचताराकिंत हॉटेलमधील असणार्‍या रूमप्रमाणे असावेसे वाटते. त्यामुळे इंटेरियर डेकोरेशनला खूप महत्त्व आले आहे. बारावीनंतर इंटेरियर डिझायनरचा अभ्यासक्रम पूर्ण करून आपण इंटेरियर डिझायनर होऊ शकतो. बांधकामाशी संलग्न विविध कंपन्यात रोजगाराची संधी मिळते. तसेच स्वत:ची फर्मही सुरू करू शकतो. बेडरूम, हॉल, किचन आदींना सजवण्याचे काम इंटेरियरचे असते. 

पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशन : पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना गणिताची गरज नाही. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संबंधित अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो. पत्रकारितेत सामान्य ज्ञान आणि संवाद कौशल्याची गरज भासते. त्यामुळे या दोन्ही गोष्टीच्या जोरावर करिअरचा मार्ग निवडू शकतो. 

ग्रंथालयशास्त्र : ग्रंथालयशास्त्र अभ्यासक्रमदेखील गणिताशिवाय निवडता येतो. ज्यांना पुस्तकाची आवड आहे, ज्यांना नवनवीन गोष्टी शिकण्याची इच्छा आहे, त्यांनी ग्रंथालयशास्त्राची पदवी प्राप्त करून ग्रंथपाल म्हणून रोजगार निवडू शकता. नामांकित ग्रंथालय, शाळा, विद्यापीठ, कॉलेज आदी ठिकाणी ग्रंथालय असतात. अशा ठिकाणी ग्रंथपालाची गरज भासते. बारावी किंवा पदवीनंतर प्रवेश परीक्षा घेऊन ग्रंथालय अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. याशिवाय चित्रकलेत रमणार्‍या विद्यार्थ्यांना फाइन आर्टसारख्या अभ्यासक्रमाची निवड करून करिअर करता येते. याशिवाय शिल्पकला, हस्तकलेची आवड बाळगणार्‍या मुलांना या क्षेत्रातील उच्च ज्ञान मिळवून करिअर करता येते. एकंदरीत शालेय किंवा कॉलेज दक्षेत गणित आले नाही तर करिअर होणार नाही, अशी भीती बाळगण्याची गरज नाही. करिअरचे असंख्य पर्याय असून आपल्या आवडीनुसार त्याची निवड करून भविष्याला आकार देता येईल.

Back to top button