फॅशन डिझायनिंग  व इंटीरियर डिझायनिंग क्षेत्रातील करिअर | पुढारी

फॅशन डिझायनिंग  व इंटीरियर डिझायनिंग क्षेत्रातील करिअर

जागतिकीकरणामुळे ठराविक क्षेत्रात करिअर करण्याच्या सीमारेषा पुसल्या गेल्या असून, करिअरचे क्षितीज विस्तारले आहे. आपल्या आवडत्या कलेतून छंद करण्यासंदर्भातील अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. आजच्या युगातील बदलत्या जीवनशैलीमुळे फॅशन डिझायनिंग व इंटेरिअर डिझायनिंग शिकण्याकडे कल वाढला आहे. कलेची आवड असणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी, युवक-युवती, गृहिणी या क्षेत्रात करिअर बनवू शकतात.

फॅशन डिझायनिंग – फॅशन आणि स्टाईल या बाबतीत आजकाल सगळ्याच वयोगटातील लोक जागृत आहेत. फॅशन क्षेत्रातील झगमगत्या जगाचे आकर्षण अनेकांना असते. बर्‍याचदा टी.व्ही., रॅम्पवर आकर्षक पोशाखासाहित चालणारे मान्यवर आपण पाहतो. या सगळ्या नावीन्यपूर्ण आणि आकर्षक कपड्यांची डिझायनिंग डिझायनरने केलेली असते. टाके, टीपा, डिझाईन, प्रत्यक्ष शिवणकाम, रंगसंगती, कपड्यावरील जरीकाम, आकर्षक कलाकुसर या बाबींचा त्यात समावेश असतो. जुन्या काळातील वेशभूषा नवे रूप, नवं रुपडं धारण करून पुन्हा बाजारात येत आहेत. या क्षेत्रात नव्या कल्पनांना, सर्जनशीलतेला वाव आहे. अनेक नामांकित व्यक्‍ती, नेते, अभिनेते, अभिनेत्री, उद्योजक, तरुणाई हे सर्वच आपल्या दिसण्याबद्दल जागरूक असतात. आजकाल अनेक कंपन्या आपल्याला हवा तसा पेहराव डिझाईनही करून देतात. भारतीय पेहराव, पाश्‍चिमात्य पेहराव काळानुसार बदलत राहतात आणि तशा मागणीनुसार फॅशन डिझायनरला काम करून द्यावे लागते. आजकाल भारतीय फॅशन डिझायनर हॉलीवूडपटातही नावलौकिक मिळवत आहेत. रचनात्मक कल्पनेला वाव असणारे हे क्षेत्र असून या क्षेत्रात देशातच न्हवे तर लंडन, पॅरिस, मिलान, न्यू यॉर्क येथे ही अमाप संधी आहेत. देशातील फॅशन जगताची उलाढाल केवळ 200 ते 300 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून या क्षेत्रातील संधी विस्तारत आहेत.

पात्रता : या क्षेत्रातील अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेतून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच या विषयात पदवीही संपादित करता येते. या क्षेत्रात येण्याआधी चित्रकला, होम सायन्स, कॉम्प्युटर ग्राफिक्स याचे मूलभूत ज्ञान असल्यास ते फायद्याचे ठरते. पण हे आवश्यकच आहे, असे नाही. शिवाय वयाची कोणतीही मर्यादा नाही.

आवश्यक गुण : एक यशस्वी फॅशन डिझायनर होण्यासाठी चित्रकलेची, रेखाटनाची आवड तसेच रंगसंगतीचा अंदाज बांधता यायला हवा. वेगवेगळ्या रंगांची समजही असायला हवी. तसेच निर्मिती, तंत्रज्ञान, नितीमूल्ये, संवाद कौशल्यही आणि व्यवसायाचे ज्ञानही असल्यास फायद्याचे ठरते.

संधी : नवनिर्मितीचा ध्यास असणार्‍यांना या क्षेत्रात संधींची कमी नाही. प्रोडक्शन, मार्केटिंग, फॅशन रिटेल कंपनी, ब्युटिक्स, एक्स्पोर्ट हाऊस, मॅन्युफॅक्चरिंग युनिट या ठिकाणी संधी मिळतील. फॅशन मीडिया क्वालिटी कंट्रोल, फॅशन एक्ससेरीज डिझायन आणि ब्रँड प्रमोशन, कॉश्च्युम डिझायनर, फॅशन कन्सल्टंट, टेक्निकल डिझायनर, ग्राफिक डिझायनर, प्रोडक्शन पॅटर्न मेकर, फॅशन कोऑर्डिनेटर आदी क्षेत्रांत नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. अनुभवानंतर स्वत:चे ब्युटीक किवा फॅशन हाऊस सुरू करता येते.

कोर्स : यामध्ये एक वर्षाचे, दोन वर्षांचे आणि तीन वर्षांचे असे कोर्सेस उपलब्ध आहेत. पहिल्या वर्षी अभ्यासक्रमात फाऊंडेशन कोर्स, एलिमेंटस् ऑफ फॅशन डिझायनिंग, फंडामेंटल्स ऑफ टेक्सटाईल, पॅटर्न मेकिंग अँड गारमेंट कन्स्ट्रक्शन, फॅशन इलस्ट्रेशन, इंडियन आर्ट अँड कॉस्ट्यूम ऍप्रिसिएशन, एम्ब्रॉयडरी अँड सर्फेस ऑर्नामेंटेशन याचा समावेश असतो. दुसर्‍या वर्षी अभ्यासक्रमात स्टडी ऑफ अपारेल मार्केटिंग, टेक्निकल फॅशन स्केचिंग, डिजाईन प्रोसेस, पॅटर्न मेकिंग अँड कन्स्ट्रक्शन, ट्रॅडिशनल टेक्स्टाईल अँड एम्ब्रॉयडरी, टेक्सटाईल स्टडी अँड अप्लिकेशन टू फॅशन आर्ट   इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझायनिंग याचा समावेश असतो. तिसर्‍या वर्षी अभ्यासक्रमात प्रोमोशनल डेव्हलपमेंट, पॅटर्न मेकिंग ग्रेडिंग अँड ड्रेपिंग, आर्ट पोर्टफोलिओ अँड डिझाईन कंसेप्टस्, प्रोजेक्ट वर्क, केअर रेनॉव्हशन अँड फिनिशेस ऑफ टेक्स्टाईल, वर्ल्ड आर्ट अँड कॉस्ट्यूम ऍप्रिसिएशन, रिटेल मार्केटिंग अँड व्हिजुअल मर्कंडाईसिंग, अपारेल मॅन्युफॅक्चरिंग याचा समावेश असतो. 

वेतन : या क्षेत्रात वेतनाच्या संधी चांगल्या आहेत. अनुभवानंतर आकर्षक पॅकेजही मिळते. एकदा यातील कौशल्य आणि कलेत प्रावीण्य मिळविल्यास अगदी लाखातही कमाई करू शकता.

इंटिरियर डिझायनिंग – आपलं एक छान घर असावं, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. आपआपल्या आवडीनिवडीनुसार घर कसं असावं याचा आराखडा मनात असतो. त्यानुसार घरातील अंतरंगही आपण ठरवतो. घर अत्यंत आकर्षक सजविण्यावर लोक भर देत असतात. घराचे नूतनीकरण, सजावट या सगळ्या बाबींचा माणसाच्या भावनेशी संबंध असतो. व्यावसायिकरीत्या इंटिरियर डिझायनर्स हे काम करवून देतात. गृह सजावटीचे असंख्य प्रकार त्याला ज्ञात असतात त्यानुसार आपल्याला हवे तसे स्वप्नातले घर प्रत्यक्षात उतरविण्यासाठी तो मदत करतो. आजकाल या क्षेत्रात करिअरच्या चांगल्या संधी निर्माण होत आहेत. 

पात्रता : या क्षेत्रातील अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेतून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच या विषयात पदवीही संपादित करता येते. या क्षेत्रात येण्याआधी चित्रकला, होम सायन्स, कॉम्प्युटर ग्राफिक्स याचे मूलभूत ज्ञान असल्यास ते फायद्याचे ठरते. पण हे आवश्यकच आहे, असे नाही. शिवाय वयाची कोणतीही मर्यादा नाही.

कामाचे स्वरूप- इंटिरियर डिझायनरचे मुख्य काम हे कलात्मक असते. ग्राहकाच्या आर्थिक कुवतीनुसार त्याच्या घराला सुंदर रूप देण्याचे काम तो करतो. घराच्या रचनेनुसार संगणकावर तो नकाशा आणि नियोजन बनवितो त्यानुसार ग्राहकाला ते पसंद पडल्यास पुढील कार्यवाही केली जाते. घराचे रंगकाम, फर्निचर, टाईल्स लावून घेणे, प्रकाशयोजना, किचन ट्रॉलीज, फ्लोरिंग, गृहोपयोगी वस्तू, नैसर्गिक वातावरण आदींबाबतची कामे तो व्यावसायिकरीत्या करून देतो.

विविध कार्यक्षेत्रांमधील ऑफिसेस, हॉस्पिटल्स, शॉपिंग सेंटर्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स, स्पेशालिटी स्टोअर्स, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट, क्लिनिक्स, लॅब्ज आदी अनेक जागा आकर्षक व योग्य पद्धतीने सजवण्याची जबाबदारी इंटेरिअर डिझायनरवर असते. पब्लिक सेक्टरमध्ये प्रशिक्षीत आणि कौशल्य असणार्‍या व्यक्‍तीची मागणी जास्त आहे. उदा. टाऊन प्लॅनिंग ब्युरो, मेट्रोपोलिटीन आणि क्षेत्रीय विकास डिपार्टमेंट इथेही काम मिळेल. व्यवसायाची आवड आणि धाडसाची तयारी असल्यास स्वतःचा व्यवसाय देखील वाढवता येईल.

कोर्स – यामध्ये एक वर्षाचे, दोन वर्षाचे आणि तीन वर्षाचे असे कोर्सेस उपलब्ध आहेत. पहिल्या वर्षी अभ्यासक्रमात फंडामेंटल्स ऑफ डिझाईन, ग्राफिक कम्युनिकेशन अँड व्हिजुअल प्रेझेंटेशन, डिझाईन सोर्सेस अँड मटेरियल्स, रेसिडेन्शिअल स्पेस डिझाईन, इंटेरिअर कंस्ट्रक्शन अँड डिटेलिंग, कॅड-ऑटो कॅड, आर्ट अँड आर्किटेक्चर हिस्टरी याचा समावेश असतो. दुसर्‍या वर्षी अभ्यासक्रमात स्टुडिओ फॉर वर्क स्पेस (ऑफिस), स्टुडिओ फॉर रिटेल अँड स्टोअर, इंटेरिअर सर्व्हिस सिस्टीम, फर्निचर डिझाईन, व्हिजुअल मर्कंडाईसिंग अँड डिस्प्ले, कॅड 2, आर्ट अँड आर्किटेक्चर हिस्ट्री 2 याचा समावेश असतो. तिसर्‍या वर्षी अभ्यासक्रमात प्रोफेशनल प्रॅक्टिस, एस्टिमेटिंग अँड बजेटिंग, स्टुडियो फॉर रेस्टोरेंट्स अँड कॅफे, लँडस्केप अँड डिजाईन, ट्रान्स्फॉर्मेबल सिस्टम्स अँड स्पेस, लक्जरी बाथ अँड किचेन, कॅड 3, पोर्टफोलिओ डेव्हलपमेंट अँड प्रेझेन्टेशन, अप्लिकेशन ऑफ वास्तुशास्त्र अँड फेंगशुई याचा समावेश असतो. 

वेतन – अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित कंपनीत चांगल्या पगाराच्या संधी आहेत. सध्या पॅकेज देण्यावरही भर राहतो. या क्षेत्रात कल्पनाशक्‍तीला विशेष वाव असल्याने त्यावरही तुमच्या वेतनाचे आकडे ठरू शकतात. फॅशन डिझायनिंग व इंटेरिअर डिझायनिंग हे कोर्सेस कोणत्याही वयोगटातील व्यक्‍ती करू शकतात तसेच या क्षेत्रात संधी दिवसेंदिवस वाढतच आहेत. 

Back to top button