ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक सुविधा आहेत का? | पुढारी

ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक सुविधा आहेत का?

सध्या कोविड १९च्या परिस्थितीमध्ये ऑनलाईन शिक्षण हा पर्वणीचा घटक बनला आहे. परंतु या स्थितीमध्ये विद्यार्थी, पालक व शिक्षक हे शिक्षणास आवश्यक असणारे तिन्हीही घटक मोठ्या प्रमाणात गोंधळून गेल्याचे दिसत आहे. आजही देशातील निम्म्यांहून जास्त जनता ग्रामीण भागात राहत आहे. ग्रामीण भागामध्ये ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत का, याचा विचार होणे गरजेचे आहे. एका कुटुंबातील एकपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असतील तर त्या दोघांसाठी स्वतंत्र स्मार्ट फोन पालक घेऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत पाल्यांना अपुरे शिक्षण किंवा पाल्यांपैकी एकजण त्या शिक्षणापासून वंचित असे चित्र दिसत आहे. घरातील मोबाईल पालक कामावर जाताना घेऊन जात असेल तर अशा परिस्थितीत मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहेत.

अगोदरच हाताला काम नाही, दैनंदिन खर्चासाठी पैसे हातात नाही. यामध्ये मोबाईलला अत्यावश्यक बाब बनली आहे. याचा फायदा मोबाईलला कंपन्या घेत आहेत. मोबाईल डेटा पॅकच्या किमती वाढल्या आहेत. या सर्वांमध्ये पालक हतबल होत आहेत. या परिस्थितीमध्ये आपण शिक्षणाचा अविभाज्य भाग म्हणजे विद्यार्थ्यांचा विचार करणे गरजेचे आहे. प्रौढ व्यक्ती ७ ते ८ मिनिटांपेक्षा एकाग्र होऊन मोबाईलमध्ये लक्ष देऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी रोज तीन ते चार तास मोबाईलला समोर बसून एकाग्र होऊन लक्ष द्यावे ही अपेक्षा करणे अवघड वाटते. विद्यार्थ्यांचे स्क्रीन टाईम वाढल्यामुळे डोळे व कान यांच्यावर विपरीत परिणाम होत आहे.

शिक्षकांची स्थिती ही काहीशा फरकाने अशीच आहे असे दिसते आहे. आपल्याजवळील उपलब्ध साधन सामुग्री व तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ज्ञानदानाचे प्रयत्न करत आहेत. तेही ऑनलाईन लेक्चर घ्यावे की व्हिडिओ तयार करून पाठवावा यामध्ये गोंधळले आहेत. ऑनलाईन लेक्चरसाठी वापरलेली प्रणाली सुरक्षित आहे का? ती मुलांना वापराने शक्य आहे का? याबाबत साशंक दिसत आहेत. यामध्ये ते किती यशस्वी झालेत हे येणारा काळच सांगेल. तरीही या सर्वातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी त्यांची धडपड दिसते आहे. शेवटी हेही दिवस बदलतील ही अपेक्षा ठेवून परिस्थितीशी तोंड दिले जात आहे.

 

Back to top button