ई-कॉमर्समधील नव्या संधी | पुढारी

ई-कॉमर्समधील नव्या संधी

सध्याचे युग हे इंटरनेटचे आहे. इंटरनेटमुळे तंत्रज्ञानातील अनेक बदल अनुभवत आपण सध्या जगत आहोत. इंटरनेटमुळे झालेल्या बदलांना चमत्कार असेच संबोधले जाते. आपण ज्या कल्पनासुद्धा करू शकलो नसतो अशा गोष्टी इंटरनेटमुळे साध्य झाल्या आहेत. त्याबरोबरच इंटरनेटमुळे नोकरी आणि व्यवसायाच्या अनेक नव्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत. या संधींचा तरुण वर्गाला योग्य प्रकारे लाभ करून घेता येईल.

इंटरनेटमुळे ऑनलाईन जगतातील उपलब्ध झालेल्या करिअरच्या नव्या संधीचा मागोवा घेताना असे लक्षात येते की, ऑनलाईन जगतात वेगवेगळ्या नोकर्‍यांचे विश्‍व उघडले गेले आहे. केवळ नोकर्‍याच नव्हे तर या क्षेत्रात व्यवसाय करण्याच्याही अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत.

केवळ तांत्रिक कौशल्य नव्हे तर मार्केटिंग तंत्र अवगत असणार्‍यांनाही या क्षेत्रात मोठा वाव उपलब्ध होतो आहे. याचबरोबर आर्टिस्टिक व्ह्युजअलायझेशन, ई-कॉमर्स या क्षेत्राचे ज्ञान असणार्‍यांनाही नोकरी आणि व्यवसायात अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत.

स्ट्रॅटेजी अ‍ॅनालिस्ट :

एखाद्या कंपनीत त्या कंपनीचे उत्पादन बाजारात अधिकाधिक खपवण्यासाठी धोरण आखले जाते. कमी कालावधीत कंपनीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात खपावे यासाठी जे मार्केटिंगचे धोरण आखले जाते त्याला ‘स्ट्रॅटेजी अ‍ॅनालिस्ट’ असे म्हणतात. हा स्ट्रॅटेजी अ‍ॅनालिस्ट कोणत्या पद्धतीने उत्पादन बाजारात आणायचे, त्याची जाहिरात कशी करायची, त्याची किंमत किती ठेवायची, वेळ पडल्यास या किमतीवर सवलत किती द्यायची, अशी सर्व धोरणे हा स्ट्रॅटेजी अ‍ॅनालिस्ट ठरवतो. तसेच त्या उत्पादनासाठी वितरक कोण नेमायचे, विक्रेते कोण नेमायचे याचीही योजना हा स्ट्रॅटेजी अ‍ॅनालिस्ट ठरवतो.

यासाठी या पदावरील व्यक्‍तीला ग्राहकांच्या गरजांचे ज्ञान लागते. तसेच कोणत्या पद्धतीने मार्केटिंग केले तर त्या वस्तूचे अथवा उत्पादनाचे महत्त्व ग्राहकांपर्यंत चांगल्या पद्धतीने जाऊ शकेल, हे ओळखण्याची कला स्ट्रॅटेजी अ‍ॅनालिस्टकडे असायला हवी. बाजारात सध्या कोणत्या वस्तूला मागणी आहे, तसेच आगामी काळात कोणत्या वस्तूला मागणी निर्माण होऊ शकते, याची पूर्वकल्पना या अ‍ॅनालिस्टकडे असायला हवी.

मीडिया प्लॅनर :
मीडिया प्‍लॅनर म्हणजे एखाद्या वस्तूची अथवा उत्पादनाची कोणत्या माध्यमातून जाहिरात केली तर ती अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचू शकेल, याचा विचार करून त्याप्रमाणे जाहिरातीचे माध्यम वापरणे. सध्या वृत्तपत्रे, साप्‍ताहिके, दूरचित्रवाणी वाहिन्या, सोशल मीडिया, डिजिटल मीडिया या माध्यमातून वस्तूंची आणि उत्पादनांची जाहिरात केली जाते.

याखेरीज होर्डिंग्ज, भित्तीपत्रके याद्वारेही वस्तूची आणि उत्पादनांची जाहिरात केली जाते. तुम्ही ज्या जाहिरात कंपनीत कामाला आहात, त्या कंपनीकडे एखाद्या वस्तूच्या अथवा उत्पादनाच्या जाहिरातीची जबाबदारी सोपवली गेली तर ती जाहिरात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणते माध्यम वापरावे याचा निर्णय या पदावरील व्यक्‍तीने घ्यावयाचा असतो.

केवळ निर्णय घेऊन चालत नाही तर त्यासाठीचे अर्थकारण, त्या जाहिराती अधिक प्रभावी होण्यासाठी काय करायला हवे आदी अनेक गोष्टींचा अंदाज घेऊन तसा अहवाल कंपनीला सादर करावा लागतो. यासाठी बदलत्या काळातील जनमानसाचा, लोकांच्या अभिरुचीचा, माध्यमांमधील बदलांचा अभ्यास असणे आवश्यक ठरते.

शरयू वर्तक

Back to top button