स्वप्न श्रीमंतीचे | पुढारी | पुढारी

स्वप्न श्रीमंतीचे | पुढारी

उत्तम कदम, आष्टा

श्रीमंत होण्याचे स्वप्न बाळगणे हा काही अपराध नाही. मात्र, आपले श्रीमंतीचे स्वप्न साकार करण्यासाठी वाकडी-तिकडी वाट निवडली तर ती वाट मात्र थेट पोलिस कोठडीच्या दिशेने जाते. श्रीमंतीचे स्वप्न पाहणार्‍या चार मित्रांनी अशाच पद्धतीने श्रीमंत होण्यासाठी निवडलेला शॉर्टकट त्यांना थेट कारागृहात घेऊन गेला, त्याची ही हकीकत…

मुंबई-आग्रा मार्गावर नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथे चोपडा नावाच्या एका सराफाची पेढी आहे. 2 सप्टेंबर 2017 रोजी रात्री या पेढीतून थोडेथोडके नव्हे तर तब्बल सात किलो सोन्याचे दागिने चोरीला गेले आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खळबळ माजली. नाशिक ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक करपे हे आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले आणि घटनास्थळाची नुसती पाहणी करूनच त्यांनी हेरले की चोर कोण आहेत आणि चोरी कशी झाली असावी.

या पेढीमध्ये एकूण आठ कामगार होते. यापैकी वयाने सर्वात छोट्या असलेल्या एका अल्पवयीन मुलावर सकाळी दुकान उघडून झाडलोट करणे आणि संध्याकाळी दुकान बंद झाल्यावर सर्व दारांना कुलुपे लावून किल्ल्यांचा जुडगा चोपडा यांच्या बेडरूममध्ये नेवून ठेवण्याची जबाबदारी होती. या मुलाचे आणि पेढी मालकाच्या मुलाचे काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते आणि मालकाच्या मुलाने या मुलाला मारहाण केली होती. त्यामुळे त्याच्या मनात राग धुमसत होता.

याच दुकानात संजय वाघ हा सेल्समन होता. मालकाचा तो अत्यंत विश्‍वासू समजला जात होता. दुकानातील सगळ्या दागिन्यांच्या आणि दररोज विक्री होणार्‍या दागिन्यांच्या नोंदी ठेवण्याचे काम या संजयकडे होते. मात्र, हा संजय मालकाचा विश्‍वासघात करून वारंवार थोडे थोडे दागिने लंपास करीत होता. मात्र, दागिन्यांच्या नोंदी ठेवण्याचे काम त्याच्याकडेच असल्यामुळे या नोंदींमध्ये फेरफार करून त्याने आपली चोरी उघड होऊ दिली नव्हती. मात्र, एक ना एक दिवस आपली भानगड चव्हाट्यावर येणार याची त्याला खात्री होती, त्यामुळे या भानगडीतून बाहेर पडण्यासाठी तो काहीतरी मार्ग शोधत होता.सफाई कामगाराचे आणि मालकाच्या मुलाचे भांडण झाल्यानंतर संजयने या मुलाला फितवून आपल्या बाजूला वळवून घेतले आणि त्याला झटपट श्रीमंतीचे स्वप्न दाखविले. संजयने केलेल्या प्लॅननुसार सफाई कामगार मुलाने घटनेच्या दिवशी रात्री दुकान बंद करताना दुकानाचा मागील दरवाजा मुद्दाम उघडा ठेवला. त्याचप्रमाणे किल्ल्यांचा जुडगा मालकाच्या बेडरूममध्ये ठेवण्याचे नाटक करून त्याने त्या किल्ल्या संजयच्या हवाली केल्या. प्लॅनप्रमाणे मध्यरात्रीनंतर संजय वाघ आणि त्याचे दोन मित्र गोपीनाथ बरकाले व संतोष शिंदे हे दुकानात शिरले. आपल्याकडील किल्ल्यांचा वापर करून त्यांनी स्ट्राँगरूममधील तब्बल सात किलो सोन्याचे दागिने लंपास केले. रातोरात हे दागिने त्यांनी आपल्या गावानजीक असलेल्या एका ओढ्याच्या पात्रात पुरून ठेवले. यावेळी आरोपी इतक्या सराईतपणे वागले की यदाकदाचित आपण पकडले गेलो तर वकिलांची फी द्यायची तजवीज असावी म्हणून त्यांनी काही दागिने वेगळ्या ठिकाणी पुरून ठेवले होते.

सकाळी पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम पेढी मालकाची चौकशी केली असता पेढीच्या किल्ल्या सकाळी नेहमीच्या जागेवर नव्हत्या, ही बाब निष्पन्‍न झाली. पेढीच्या किल्ल्या जाग्यावर ठेवायची जबाबदारी कुणावर असते, याची चौकशी केल्यावर संबंधित अल्पवयीन सफाई कामगाराचे नाव पुढे आले. त्यामुळे संशयाची पहिली सुई त्याच्याकडेच फिरली. हा सफाई कामगार काही सराईत गुन्हेगार नव्हता, तर भोळाभाबडा लहान मुलगा होता; पण सेल्समन संजयच्या नादाला लागून आणि श्रीमंतीची स्वप्ने बघून तो या कटात सामील झाला होता. 

पोलिसांनी या सफाई कामगार मुलाकडे जरा दरडावून चौकशी करताच त्याने सगळे काही खरे सांगून टाकले. त्यामुळे लागलीच पोलिसांनी संजय, गोपीनाथ आणि संतोष यांना ताब्यात घेऊन त्यांनी चोरलेले सात किलो दागिनेही जप्‍त केले. अवघ्या चोवीस तासांच्या आत पोलिसांनी या चोरीचा छडा लावला आणि श्रीमंतीच्या स्वप्नांच्या मागे धावता धावता वाममार्गाला लागलेल्या एका टोळीला गजाआड केले.

Back to top button