काकडी उत्पादन, अधिक उत्पादन देणाऱ्या फल शुभांगी जाती विषयी जाणून घ्या | पुढारी

काकडी उत्पादन, अधिक उत्पादन देणाऱ्या फल शुभांगी जाती विषयी जाणून घ्या

काकडी या पिकाला बाजारात बाराही महिने मागणी असते. काकडीच्या प्रामुख्याने चार जाती आहेत. पुन्हा खिरा, फल शुभांगी, शीतल आणि हिमांगी अशा या जाती आहेत. महाराष्ट्रात पुन्हा खिरा या जातीची काकडी लागवड मोठ्या प्रमाणावर होते. पुन्हा खिरा जातीच्या जातीचे फळ लहान असते. फळांचा रंग हिरवट आणि पांढरा असतो. जर काही कारणांमुळे फळ काढण्यास उशीर झाला तर फळाचा रंग पिवळसर तपकिरी होतो. लागवडीनंतर दीड मिहिन्याने फळ काढणीस येते.

फल शुभांगी ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तयार केली आहे. या जातीपासून अधिक उत्पादन मिळते. या फळाचा रंग हिरवा असतो. खरीप आणि रब्बी हंगामात या जातीची लागवड करता येते. या जातीपासून हेमांगी जातीपेक्षा 20 टक्के अधिक उपन्न मिळते. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शीतल ही जात विकसित केली आहे.

कोकण प्रांतात जास्त पाऊस पडतो, त्यामुळे ही जात तयार करण्यात आली आहे. या जातीची फळे मध्यम आकाराची असतात. खरीप हंगामात जून-जुलै महिन्यांत याची लागवड केली जाते. या जातीपासून हेक्टरी 35-40 टन उत्पन्न मिळते. हेमांगी या जातीचे पुन्हा खिरा या जातीपेक्षा अधिक उत्पादन मिळते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ही जात तयार केली आहे.

खरीप आणि उन्हाळी हंगामात या जातीची लागवड करावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. या जातीची फळे पांढर्‍या रंगाची असतात. या जातीच्या फळांना बाजारात चांगला भाव मिळतो. याखेरीज काकडीच्या जिप्सी, मालिनी शिवनेरी या संकरित जाती बाजारात उपलब्ध आहेत. जिप्सी हे वाण नामदेव उमाजी प्रा. लि. या कंपनीने तयार केले आहे. या जातीच्या फळाची लांबी 16 ते 18 मीटर एवढी आहे. 200 ते 250 ग्रॅम एवढ्या वजनाची फळे या जातीच्या पिकाला लागतात.

काकडीची लागवड जून-जुलै आणि जानेवारी फेबु्रवारीदरम्यान करावी. लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण करून घ्यावे. त्यानुसार 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश अशी खतांची मात्र द्यावी. काकडी या पिकापासून चांगले उत्पन्न घेण्याकरीता जमीनही या पिकाला अनुकूल अशीच घ्यावी लागते.

हलकी ते मध्यम आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक असते. हलक्या जमिनीत लागवड केल्यास पीक लवकर तयार होते. जमीन निवडताना त्यात पावसाळ्याच्या हंगामात पाणी साचू नये आणि उन्हाळ्यात जमीन तडकू देऊ नये, याकडे लक्ष देणे आवश्यक असते. या पिकाला उष्ण हवामान चांगलेच मानवतेे. अधिक आर्द्रता आणि कमी तापमान असेल तर काकडीची वाढ चांगली होत नाही.

थंडीमध्ये काकडीचे बी लवकर उगवत नाही. म्हणून सुमारे अर्धा लिटर कोमट पाण्यात 25-30 मिलीमिटर एवढ्या प्रमाणात जर्मनेटर मिसळावे. त्या मिश्रणात काकडीचे बी चार तास भिजत घालावे आणि सावलीत सुकवावे. हे बी झीगझॅग पद्धतीने म्हणजे काडफेक लावावे. साधारणत: आठवडाभरात बी उगवते. नोव्हेंबरच्या 1 ते 15 तारखेपर्यंत पूर्व-पश्चिम सरी काढू नये.

याचे कारण या काळात सूर्याचे दक्षिणायन चालू असते. त्यामुळे उत्तरेकडे टाकलेले बी उगवताना घट येते. कारण, त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळू शकत नाही. म्हणूनच थंडीत काकडीची लागवड करत असाल तर दक्षिण-उत्तर सरी काढली पाहिजे. काकडीकरिता एकरी 6 ते 8 टन एवढ्या प्रमाणात शेणखत द्यावे. त्याचबरोबर कल्पतरू सेेंंद्रीय खत 150 किलो या प्रमाणात द्यावे.

खत देताना ते बांगडी पद्धतीने द्यावे. खताची मात्रा दिल्यानंतरच पिकाला पाणी द्या. उन्हाळी हंगामात काकडीचे पीक घेताना पाण्याची अधिक काळजी घ्यावी लागते. लागवड करण्यापूर्वी सर्‍या ओलावून घ्याव्यात आणि त्यानंतर लागवड करावी. लागवड केल्या केल्या पाण्याची पाळी द्यावी. उन्हाळ्यात 5 ते 7 दिवसांच्या अंतराने पिकाची वाढ आणि हवामान तसेच जमिनीचा मगदूर पाहून पाणी द्यावे.

सामान्यतः बी टाकल्यानंतर 30 ते 40 दिवसांतच फळे येण्यास सुरुवात होते. दर दोन दिवसांनी फळाची तोडणी करणे आवश्यक असते. त्यानंतर काकडी वाकडी आणि पिवळी पडते. उन्हाळ्यात काकडी पिवळी पडण्याचे प्रमाण वाढते. त्याकरिता कामफॅशनर या औषधाची फवारणी करावी.

– जगदीश काळे

Back to top button