गहू लागवड तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन | पुढारी

गहू लागवड तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन

महाराष्ट्रात घेतल्या जाणार्‍या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक आहे. गहू हा जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारे घेतला जातो. महाराष्ट्रातील गव्हाचे सरासरी उत्पादन 1,558 किलो प्रतिहेक्टरी आहे.

भारताच्या सरासरी गहू उत्पादकतेशी (31.72 क्विं./हेक्टर) तुलना करता राज्याची उत्पादकता फारच कमी आहे. महाराष्ट्रातील गव्हाचे कमी उत्पादन येण्याची कारणे म्हणजे कोरडवाहू गव्हाची लागवड, पाणीपुरवठा पीक अवस्थेनुसार न करणे, सुधारित वाणांचा वापर न करणे, पीक संरक्षणाचा अभाव, मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब न करणे आणि गव्हाची उशिरा पेरणी करणे ही आहेत.

जमीन : मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा असणारी जमीन गहू पिकास मानवते. बागायती गव्हासाठी भारी व खोल जमीन निवडावी. मध्यम प्रकारच्या जमिनीत रासायनिक खतांसोबत भरखते जमिनीत मिसळल्यास गव्हाचे चांगले उत्पादन घेता येते. जिरायत गहू घेत असताना तो भारी जमिनीतच घ्यावा, म्हणजे पावसाच्या पाण्याचा ओलावा जास्तीत जास्त काळ टिकून राहतो व अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते.

पूर्व मशागत : गहू पिकाच्या मुळ्या जमिनीत खोलवर जातात. म्हणून या पिकासाठी चांगली भुसभुसीत जमिनीची निवड करावी. त्यासाठी जमिनीची योग्य व पुरेशी मशागत करणे अत्यंत आवश्यक असते. महाराष्ट्रात गव्हाची लागवड खरीप हंगामातील पीक निघाल्यानंतर करतात. खरीप हंगामातील पीक निघाल्यानंतर जमीन लोखंडी नांगराने नांगरावी. त्यानंतर कुळवाच्या 3-4 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीच्या अगोदर 10 ते 12 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत/कंपोस्ट खत पसरवून टाकावे. तसेच पूर्वीच्या पिकांची धसकटे व इतर काडी-कचरा वेचून शेत स्वच्छ करावे.

सुधारित वाण : पेरणीसाठी गव्हाच्या सुधारित वाणांचा वापर झाल्यामुळे तसेच मशागतीच्या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे महाराष्ट्राचे गव्हाचे सरासरी प्रतिहेक्टरी उत्पादन 482 किलोवरून 1,292 किलोपर्यंत वाढले आहे. महाराष्ट्र राज्याच्या काही भागात भात पिकानंतर गव्हाची पेरणी करतात. अशा पीक पद्धतीत गहू घ्यावयाचा असल्यास आणि 2-3 पाण्याच्या पाळ्यांची सुविधा असल्यास निफाड-34 हे उशिरा पेरणीसाठी फार चांगले वाण आहे. त्यामुळे या वाणाची शिफारस बागायती उशिरा पेरणीसाठी करण्यात आलेली आहे. एनआयएडब्ल्यू-301 (त्र्यंबक), एनआयएडब्ल्यू-917 (तपोवन), एमएसीएस-6222 हे सरबती वाण व एनआयडीडब्ल्यू-295 (गोदावरी) हे बक्षी वाण बागायती वेळेवर पेरणी करण्यासाठी वापरावे. बागायती उशिरा पेरणीसाठी एनआयएडब्ल्यू-34 आणि एकेएडब्ल्यू-4627 या वाणांप्रमाणेच जिरायत पेरणीसाठी एनआयडीडब्ल्यू-15 (पंचवटी) एकेडीडब्ल्यू-2997-16 (शरद) ही वाणे उपयुक्त आहेत. पाण्याची उपलब्धता कमी प्रमाणात असल्यास एनआयएडब्ल्यू-1415 (नेत्रावती) व एचडी 2987 (पुसा बहार) या सरबती वाणांची लागवड करावी. वरीलप्रमाणे पेरणीच्या वेळेनुसार सुधारित वाणांचा अवलंब केल्यास निश्चित उत्पादनात वाढ होईल.

पेरणीची वेळ : जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसर्‍या पंधरवड्यात करावी. बागायती गव्हाची वेळेवर पेरणीची योग्य वेळ म्हणजे नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा होय. या कालावधीत पेरणी केल्यास गव्हाचे उत्पादन चांगले येते. बागायती गव्हाची पेरणीसुद्धा उशिरा करता येते. परंतु, वेळेवर पेरणी केलेल्या गव्हापेक्षा उत्पादन कमी येते. बागायती गव्हाची पेरणी 15 नोव्हेंबरनंतर उशिरा केल्यास प्रत्येक पंधरवड्यास हेक्टरी 2.5 क्विंटल उत्पादन कमी येते व त्यामुळे 15 डिसेंबरनंतर पेरलेले गव्हाचे पीक फायदेशीर ठरत नाही.

बियाणे : गव्हाच्या अधिक उत्पादनाकरिता दर हेक्टरी 20 ते 22 लाख रोपांची संख्या शेतात असणे आवश्यक आहे. ही संख्या मिळविण्यासाठी दर हेक्टरी 100 ते 125 किलो बियाणे वापरावे. उशिरा पेरणीसाठी दर हेक्टरी 125 ते 150 किलो बियाणे वापरावे. जिरायत गव्हासाठी हेक्टरी 75 ते 100 किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे.

बीज प्रक्रिया : पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम 75 टक्के डब्ल्यूएस या बुरशीनाशकाची 3 ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी तसेच प्रति 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम अ‍ॅझोटोबॅक्टर व 250 ग्रॅम पीएसबी या जीवाणूसंवर्धन खताची बीज प्रक्रिया करावी, यामुळे उत्पादनात 10 ते 15 टक्के वाढ होते.

गहू बियाण्याचे साठवणुकीच्या कालावधीमध्ये नऊ महिन्यांपर्यंत कीड (दाण्यातील भुंगेरे) नियंत्रण होऊन उगवण क्षमता प्रमाणीकरण माणकापेक्षा (85 टक्के) अधिक राखण्यासाठी बियाण्यास डेल्टामेथ्रीन 2.8 टक्के प्रवाही 4 मि.लि. किंवा ल्युफेन्यूरॉन 5 टक्के प्रवाही 10 मि.लि. किंवा ईमामेक्टिन बेन्झोएट 5 टक्के विद्राव्य दाणेदार 4 ग्रॅम 500 मि.लि. पाण्यात मिसळून किंवा डायटोमॅसीयस अर्थ अधिक मॅग्नेशियम सल्फेट प्रत्येकी 500 ग्रॅम प्रति 100 किलो या प्रमाणात बीज प्रक्रिया करण्याची शिफारस केली आहे. गहू पिकावरील मावा, तुडतुडे आणि खोडमाशी या किडींच्या नियंत्रणासाठी गहू बियाण्याला थायोमिथोक्झाम 30 टक्के एफएस 7.50 मि.लि. प्रति 10 किलो बियाण्यांप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बीज प्रक्रिया करावी.

पेरणी : पेरणीच्या वेळी जमिनीत पुरेशी ओल असावी. योग्य ओल नसल्यास प्रथम जमीन ओलवावी व वापसा आल्यावर जमीन कुळवावी. बागायत गव्हाची वेळेवर पेरणी दोन ओळीत 20 सें.मी. व उशिरा पेरणी 18 सें.मी. अंतर ठेवून करावी. पेरणी उथळ म्हणजे 5 ते 6 सें.मी. खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते. जिरायत गव्हाची पेरणी दोन ओळीत 20 सें.मी. अंतर ठेवून करावी. पेरणी उभी-आडवी अशी दोन्ही बाजूने न करता ती एकेरी करावी म्हणजे आंतरमशागत करणे सोयीचे होते. बियाणे झाकण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा म्हणजे बी व्यवस्थित दबून झाकले जाते. जमिनीचा उतार लक्षात घेत गव्हासाठी 2.5 ते 4 मीटर रुंदीचे व 7 ते 25 मीटर लांब या आकाराचे सारे पाडावेत. (पूर्वार्ध)

– डॉ. दादासाहेब खोगरे

Back to top button