फायदेशीर डाळिंब शेती | पुढारी

फायदेशीर डाळिंब शेती

फळबाग शेतीमध्ये डाळिंब हे चांगले उत्पन्‍न देणारे फळ म्हणून ओळखले जाते. कमी पाण्यात येणारे हे फळ शेतकर्‍यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. मात्र डाळींबाची लागवड करताना तसेच या पिकाची वाढ होत असताना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली डाळींब बागेची काळजी घेणे आवश्यक असते. वेगवेगळ्या रोगांपासून डाळींबाच्या बागेचा बचाव करण्याकरिता शेतकर्‍याला या फळाची डोळ्यांत तेल घालून काळजी घ्यावी लागते.

गेल्या काही वर्षांत राज्यात फळबागांची लागवड मेाठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. द्राक्ष, आंबा यांच्याबरोबरच डाळिंबाची लागवड करणारे शेतकरीही वाढले आहेत. डाळिंब हे शेतकर्‍याला चांगले उत्पन्‍न मिळवून देणारे फळ आहे. या पिकाच्या वाढीसाठी योजनाबद्ध प्रयत्न केल्यास आणि या फळावर येणारी रोगराई वेळीच दूर केली, तर हे फळ शेतकर्‍याच्या द‍ृष्टीने हमखास उत्पन्‍न देणारे ठरू शकते. डाळिंबाची फळबाग अतिशय कमी पाण्यावर येते. केळी, ऊस यासारखे डाळिंब हे जादा पाणी खाणारे पीक नाही हे लक्षात घ्यावे लागते. कमी पाण्यात येणारे हे फळ सध्या सोलापूर, पुणे, सांगली, नगर, विदर्भातील वाशिम या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने घेतले जाते.

कोणत्याही जमिनीत डाळिंबाचे पीक घेता येते. पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडली, तर या फळाचे मोठे उत्पादन होऊ शकते. अगदी मुरमाड, माळरान, डोंगर उताराच्या जमिनीतही हे फळ येऊ शकते; मात्र या जमिनीत पाण्याचा निचरा होणे अत्यावश्यक आहे. पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात न झाल्यास या फळावर वेगवेगळे रोग पडू शकतात. कोरडे आणि थंड हवामान या फळाच्या वाढीस उपयुक्‍त ठरते. फूल लागल्यानंतर फळ तयार होईपर्यंतच्या काळात कडक ऊन आणि कोरडे हवामान असल्यास या फळांची चव न्यारी लागते.

कमी पावसाच्या सोलापूर, नगर, सांगली या जिल्ह्यांमध्ये म्हणूनच डाळिंबाची शेती करणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. गणेश, मस्कत, भगवा या डाळिंबाच्या सध्याच्या लोकप्रिय जाती आहेत. महाराष्ट्रातील बहुतांश डाळिंब बागांमध्ये गणेश डाळिंबाची लागवड केलेली आढळून येते. गणेश डाळिंबाकरिता आपण जी जमिन लागवडीसाठी निवडलेली असते ती उन्हाळ्याच्या काळात तीन-चार वेळेस उभी आडवी नांगरावी. पावसाळ्यात लागवड करावी. रोपांची लागवड पाच × पाच मी. अंतरावर करावी. डाळिंबाकरिता शेणखताबरोबरच नत्र, स्फूरद, पालाश ही रासायनिक खतेही द्यावी लागतात. डाळिंबावर फळ पोखरणारी अळी तसेच साल पोखरणारी अळी, लाल कोळी, देवी असे रोग पडतात. त्याचबरोबर खवले नावाची कीडही या फळावर येते. डाळिंबाच्या मुळावर फ्युजेरियम रायझोक्टोनिया नावाची बुरशी वाढते. त्यामुळे या फळावर वेगवेगळे रोग पडतात. डाळिंब पिकाला फुले येण्यास प्रारंभ झाल्यानंतर फळे काढण्यापर्यंतच्या काळात नियमित पाणी देणे आवश्यक आहे. पाणी देण्याची वेळ चुकवली गेली, तर फुले गळू शकतात.

फळे वाढत असतानाच्या काळात पाणी दिले गेले नाही, तर त्याचाही परिणाम फळाच्या वाढीवर होतो. काही दिवस अजिबात पाणी दिले नाही आणि त्यानंतर भरपूर पाणी दिले गेले, तर फळांना तडे जाण्याची शक्यता असते. अलीकडे अनेक शेतकरी डाळिंबाच्या पिकाला ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देतात. जुलै ते फेब्रुवारी या काळात पंधरा ते पंचवीस लिटर एवढे पाणी प्रत्येक झाडाला द्यावे लागते. मार्च ते जून या महिन्यात प्रखर ऊन असते. त्यामुळे या तीन महिन्यात प्रत्येक झाडाला दररोज 25 ते 50 लिटर पाणी देणे आवश्यक असते. हे पीक घेण्यापूर्वी मातीचे परीक्षण करून घ्यावे. वाळूने खड्डा भरून डाळिंबाची लागवड करावी. भविष्यकाळात फळावर डाग पडू नयेत याकरिता या खड्ड्यांमध्ये सुरुवातीच्या काळातच ब्लिचिंग पावडर घालावी.

सरकारने मान्यता दिलेल्या रोपवाटिकेतूनच डाळिंबाची रोपे खरेदी करावीत. लागवड करताना माती व पाणी परीक्षण करून रान तयार ठेवावे लागते. रानात खड्डे घेऊन त्यात 50 ग्रॅम फिरोडॉन टाकून ठेवावे, असे तज्ज्ञ सांगतात. 1 हजार झाडांसाठी प्रत्येकी एक किलो याप्रमाणे 500 किलो शेणखतात डॉर्स नामक सेंद्रिय खत, निंबोळी, एरंड, करंजाचे मिश्रखत, पोटॅश टीव्हा, व्हॅम प्‍लस, न्यूट्रिमॅक्स यांचा वापर करून कल्चर तयार करावे लागते. लागवडीच्या आदल्या दिवशी दोन तास ठिबक पद्धतीने पाणी देऊन वाफशावर हे कल्चर खड्ड्यात टाकावे लागते. लागवडीनंतर दोन महिन्यांत रोपांच्या मुळ्या जमिनीत स्थिर होतात. त्यानंतर या झाडाला बुरशीचा मर रोग येण्याची शक्यता असते. त्याकरिता झाडावर बुरशी नाशकाचे कल्चर वापरणे आवश्यक असते.

लागवडीतील चुकांमुळे अनेकदा उत्पादन घटते. त्यामुळे लागवडीचे योग्य नियोजन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केले पाहिजे. पहिली छाटणी लागवडीनंतर साडेतीन महिन्याने करावी. या छाटणीत झाडाच्या प्रत्येक फांदीला वाय आकाराचे येण्यासाठी शेंडे तोडावे लागतात. टिश्यू कल्चर डाळिंबाच्या रोपांची वाढ वेगाने होते असे दिसून आले आहे. पाणी देण्याबरोबर या झाडाच्या बहाराचे नियोजनही योग्य पद्धतीने करावे लागते.
(पूर्वार्ध)

– शैलेश धारकर

Back to top button