व्यवस्थापन : अंड्यांवर बसणार्‍या कोंबड्यांची ‘अशी’ घ्या काळजी | पुढारी

व्यवस्थापन : अंड्यांवर बसणार्‍या कोंबड्यांची 'अशी' घ्या काळजी

अंड्यांवर बसणार्‍या कोंबड्यांची काळजी कोणती आणि कशी घ्यावी, कोंबडीला कोणत्या सवयी लावाव्यात, किती अंड्यांसाठी ही पद्धत उपयुक्त आहे, याबाबत थोडक्यात माहिती प्रस्तुत लेखात मांडली आहे. अंड्यांवर बसण्यासाठी एखाद्या अंधार्‍या जागी बांबूची टोपली ठेवावी आणि त्यात धान्याचे तण किंवा गवत घालावे. मधला भाग थोडासा खोलगट करावा म्हणजे अंडी एकत्र राहण्यास मदत होते.
कोंबडीच्या बसण्याच्या जागेवर डीडीटीचा फवारा मारावा. तणावर डीडीटी टाकू नये. कारण ही पावडर अंड्यांच्या छिद्रात जाण्याची शक्यता असते आणि आतील लहान जीवाच्या शोषणावर परिणाम होऊन पिले मरण्याची शक्यता असते.

कोंबडी अंड्यांवर बसण्याअगोदर तिच्या नखांवर सुद्धा किटकनाशक पावडर चोळावी. जर तिच्या अंगावरील उवांचा नायनाट केला नाही तर कोंबडीला स्वस्थपणे अंड्यांवर बसता येणार नाही आणि हालचालीमुळे तिच्या खालील अंडी फुटण्याची शक्यता वाढेल. यात एक जरी अंडे फुटले तर त्यामधील बलक चांगल्या अंड्यांवर पडण्याची शक्यता असते. त्यामुळे अंड्यांची छिद्रे बंद होऊन छोट्या जीवाच्या मरण्याचे प्रमाण वाढू शकते.

कोंबडी खुडूक आहे किंवा नाही याची खात्री प्रथम करून घ्यावी. असफल अंडी दोन-तीन दिवस कोंबडीखाली ठेवावेत. जेव्हा आपले समाधान होईल की ही कोंबडी खरोखरच खुडूक आहे, तेव्हाच तिच्या खाली सफल अंडी ठेवावीत. एका कोंबडीखाली जास्तीत जास्त 10 ते 15 अंडी ठेवावीत. कोंबडी खाली तिचीच अंडी ठेवली पाहिजे, असे नाही. तिच्याखाली सुधारित जातींच्या कोंबड्यांची अंडी सुद्धा ठेवता येतात, पण ही क्रिया रात्रीच्या वेळी करावी. अंड्यांना सारखी उष्णता लागावी याकरिता कोंबडी आपल्या पंखाच्या साह्याने तसेच स्वत:च्या हालचालीने आतील अंडी बाहेर आणि बाहेरील अंडी आत आणत असते. जास्त अंडी उगवण्यासाठी ठेवल्यास फारच थोडी पिले निघतात. कारण बाहेरील अंड्यांवर थंडीचा परिणाम होऊन आतील जीव मरण्याची शक्यता असते.

अंड्यांवर बसलेली कोंबडी 21 दिवस सतत बसून राहते. खायला-प्यायला देखील ती आपण स्वत:हून उठत नाही. यासाठी तिला खाद्य आणि पाणी घेण्यास दिवसातून दोनदा उठण्याची सवय लावावी. फार सकाळी थंडीत उठू नये. जरा ऊन वर आल्यावर उठवावी. संध्याकाळी दिवस मावळण्या अगोदर उठवावे. ठराविक वेळी उठण्याची सवय कोंबडीला लावल्यास जास्त चांगले म्हणजे तिची विष्टा अंड्यावर पडत नाही आणि अंडी घाण होत नाहीत. सातव्या दिवशी बॅटरीच्या साह्याने अंडी तपासून पहावेत.

अंड्यात जीव असल्यास मध्ये एक काळा ठिपका दिसतो आणि त्यातून तांबड्या शिरा सर्वदूर गेलेल्या दिसतात. आत जीव नसल्यास फक्त मधला पिवळ्या बलकाची छाया दिसते. अशी निर्जीव अंडी काढावीत. विसाव्या दिवशीच्या रात्री किंवा एकविसाव्या दिवशी पिल्ले बाहेर पडतात. थंडीच्या दिवसात एखादा दिवस जास्त लागतो. त्याकरता बाविसाव्या दिवसाच्या सकाळपर्यंत वाट पाहावी. नैसर्गिकरित्या अंडी उबविण्यास खर्च कमी येतो. 100 पेक्षा कमी अंडी उबवण्यासाठी हीच पद्धत फायदेशीर ठरते. देशी कोंबडी अंडी उबून त्यावर निघालेल्या पिलांचाही सांभाळ चांगल्या प्रकारे करते.

– सतीश जाधव

Back to top button