भविष्यातले इंटरनेट | पुढारी

भविष्यातले इंटरनेट

भविष्यामध्ये इंटरनेटचे जाळे जगभर पसरलेले आढळेल. इंटरनेटच्या प्रसाराचे प्रत्यक्ष, सामाजिक, व्यापारी तसेच मानसिक पातळीवर थेट तसेच छुपे परिणाम होतील आणि त्यांचे प्रमाणही वाढते राहील. इंटरनेट फार सहजतेने बहुभाषिक बनेल. स्थानिक विचार आणि गरजांना प्राधान्य मिळेल. पारंपरिक मार्ग सोडून वेगळा विचार मांडणार्‍या आभासी गटांना या गोष्टीचे आकर्षण वाटेल आणि ते वाढेल.

वैयक्तिक संगणक व पीसी संस्कृतीच्या क्रांतीनंतर घरोघरी मातीच्या चुलींची जागा आता संगणकाने घेतली आहे. इंटरनेट ही चैनीची बाब राहिली नसून, एक अत्यावश्यक घटक बनली आहे. नॉर्वेसारख्या विकसित देशात इंटरनेट हा मानवी हक्क म्हणून गणला आहे. हेच लोण 2025 नंतर भारतातही येईल. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला अन्न, वस्त्र व निवाराबरोबरच वीज व इंटरनेट देणे हे सरकारवर बंधनकारक असेल. इंटरनेट हे हवेसारखे असेल. म्हणजे चकटफू व शक्तिशाली. बहुतेक सर्वांनाच इंटरनेट हा शब्द नक्कीच माहीत आहे; मग ती व्यक्ती आधुनिक (पहिल्या) जगातली असो, भारतासारख्या विकसनशील देशांच्या (दुसर्‍या) जगातली असो की, अर्धविकसित किंवा अविकसित तिसर्‍या जगातील. इंटरनेट अ‍ॅक्सेस ही सुविधा मिळणे आजघडीला सगळीकडे सहजशक्य नसले, तरी तिचा प्रसार वेगाने होतो आहे. मात्र, आजही या जगातील भरपूर, म्हणजे तब्बल 300 कोटी लोकांनी प्रत्यक्ष ऑनलाईन सर्फिंग (इंटरनेटची चक्कर म्हणजेच इंटरनेटवरील विविध साईटस् उघडून पाहणे, वाचणे, तेथील माहितीचा वापर करणे इत्यादी) केलेलेच नाही. अगदी नियमितपणे इंटरनेटचा वापर करणार्‍यांपैकीदेखील 20 टक्के नियमितपणे सर्फिंग करत नाहीत.

या परिस्थितीमुळे येत्या काही वर्षांत इंटरनेटच्या होणार्‍या संभाव्य विकास व विस्ताराचे थेट चित्र उभे करणे जरा अवघड आहे. जागतिक लोकसंख्येपैकी कितीजणांना कधी, कसा, कोणाकडून, किती किमतीला तसेच कितपत सहजपणे व थेट अ‍ॅक्सेस मिळेल, हे सांगणेही कठीण आहे. नवनिर्मितीच्या सर्जनशील प्रक्रियेमध्ये आणि व्यावसायिक, सामाजिक तसेच मानवी मूल्यांच्या निर्मितीमध्ये इंटरनेटचा सहभाग किती प्रमाणात राहील, हे सध्या तरी थोडे अनिश्चित आहे. उद्योजक, वापरकर्ते, नियोजक इत्यादींमार्फत या मुद्द्यांवर घेतले जाणारे निर्णय व ठरवली जाणारी धोरणे, यावरच पुढील 5 वर्षांतली इंटरनेटची उत्क्रांती अवलंबून राहील.

इंटरनेटची वाढ आजच्या विकसित व श्रीमंत देशांमधील नागरिकांकडून नाही, तर विकसनशील देशांतील रहिवाशांद्वारे होईल. इंटरनेटच्या विकासात आणि वाढीत अर्ध्यापेक्षा जास्त वाटा विकसनशील लोकसंख्येचा असेल.

इंटरनेटचे नियंत्रण आणि नियमन कसे व कितपत करावे, यावर मतभिन्नता असू शकते. पद्धत कोणतीही असो, इंटरनेटची एकंदर रचना सर्वसाधारणपणे कायम ठेवली जाईल. कोणत्याही कारणाने; विशेषतः समाजद्वेष्ट्या शक्तीद्वारे या सेवेत खंड पडू नये अथवा अडथळे येऊ नयेत, यासाठी अधिकाधिक नियंत्रण ठेवण्याचीही मागणी कदाचित केली जाईल. परंतु, याबाबत जागतिक पातळीवर स्पष्ट एकमत होणे अशक्यच असल्याने सन 2025 पर्यंत सध्या रूढ असलेली नियंत्रण पद्धतीच अंमलात राहील, असे दिसते.

आज प्रौढ वयात संगणक अथवा इंटरनेटशी संबंध आलेली पिढी आणि जन्मापासून संगणकीय युगातच वावरणारी म्हणजे साधारणत: 1995 नंतर जन्मलेली मुले-मुली यांच्या इंटरनेटकडे पाहण्याच्या द़ृष्टिकोनात मूलभूत फरक असणार आहेच. आजच्या मुलांना डिजिटल नागरिक म्हणतात. त्यांच्या संभाषणाच्या, गप्पा मारायच्या, संवादाच्या कल्पना पूर्णपणे वेगळ्या आहेत. अशा व्यक्ती इंटरनेटला आपल्या मानसिक व बौद्धिक क्षमतांचे एक एकात्मिक, विस्तारित अंगच मानतात. आभासी (व्हर्च्युअल) अनुभवांच्या विश्वाचे तर इंटरनेट हे प्रवेशद्वारच आहे.

आभासी अनुभव घेण्याच्या शक्यतेमुळे, काही काळाने मानवी मेंदूच्या काम करण्याच्या पद्धतीमध्येच विलक्षण फरक पडू शकेल. नवी पिढी इंटरनेटला आसपासच्या वातावरणातून वेगळे काढूच शकणार नाही आणि विचार करण्याइतक्या किंवा बोलण्याइतक्याच सहजपणे त्यांच्याकडून इंटरनेटचा वापर केला जाईल. इंटरनेट हे त्यांच्या भावविश्वाचेच एक अंग आहे. अतिरेकामुळे काही इंटरनेट व्यसनीही बनतात. इंटरनेटवर जसे गुन्हेगार वावरत असतात, तसे अतिरेकी मनोप्रवृत्तीचे लोकही वावरत असतात. मात्र, हे लोक तुम्हाला फसवायचा प्रयत्न न करता आपलेसे करण्याचा प्रयत्न करत असल्याने या प्रकारच्या लोकांनी चालवलेल्या संकेतस्थळांची सफर करताना सावधपणा अंगी बाळगणे जरुरीचे असते.

आज ‘क्वर्टी’ (QWERTY) हा इंग्रजी कळफलक (keyboard) सगळीकडे वापरला जातो. परंतु, कालांतराने इंटरनेटवर लिहिण्यासाठी तेवढा एकच मार्ग राहणार नाही, तर वापरकर्त्याचा आवाज (व्हॉईस रेकग्निशन), हालचाली व हावभाव किंवा इतर शारीरिक वैशिष्ट्ये (बायो-सेन्सिंग) तसेच स्पर्श पद्धती (टच-स्क्रीन) अशांसारख्या आणि इतरही नवनवीन तर्‍हांनी कळफलक न वापरता माहिती व आज्ञा संगणक अथवा इंटरनेटपर्यंत पोहोचवता येतील आणि यामुळे इंटरनेट वापरणार्‍यांच्या संख्येत विलक्षण वेगाने वाढ होईल.

इंटरनेटची सुविधा वापरण्यासाठी ग्राहकांना पैसे द्यावे लागतील किंवा कदाचित लागणारही नाहीत! जास्त बँडविड्थवर चालणारी अ‍ॅप्लिकेशन्स अतिशय मोठ्या प्रमाणात मिळू लागल्याने मुळात उपलब्ध असलेली नेटवर्कची कार्यक्षमता नेमक्या वेळेत जास्त वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवणे हेच खरे आव्हान असणार आहे. नेटवर्कचा वापर करण्यासाठी ग्राहकाला द्यावी लागणारी किंमत मुख्यतः वायरलेस कनेक्टिव्हिटी ऊर्फ बिनतारी जोडणी क्षमतेवर अवलंबून राहील. अनेक प्रकारची कामे करणारी एकच सर्वसमावेशक बँडविड्थ असणे आज फारसे सहजशक्य वाटत नसले, तरी भावी काळात हाच मार्ग सर्रास वापरला जाईल.

नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यामधला मोठा अडथळा म्हणजे देशी उद्योजक किंवा सेवा-पुरवठादारांना संरक्षण देण्याचे राष्ट्रीय धोरण किंवा इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (आयसीटी) क्लस्टर्स ऊर्फ माहिती व दळणवळण तंत्रज्ञान संकुलांची निर्मिती. नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या वेगावर याचा विपरीत परिणाम काही काळापुरता का होईना होणारच. 2025 सालातील भावी इंटरनेट वापरकर्त्यांची एकंदर संख्या पाहता किंमत कमी करणार्‍या तंत्रज्ञानाचे जोरदार स्वागत आणि स्वीकार होईल आणि त्यानुसार इंटरनेटची एकंदर रचना ठरवली जाईल, यात शंकाच नाही. नेटवर्क्सची आणि वायरलेसची क्षमता, सुरक्षितता अशा काही क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानातली प्रगती (आणि काही अडचणीसुद्धा) स्पष्ट दिसून येतील.

कुठलीही स्पर्धा ही चांगलीच असते व अंतिमतः ग्राहक त्यामुळे लाभ मिळवतो, हे त्रिकालाबाधित सत्य इंटरनेटच्या बाबतीत लागू पडणार आहे. त्यामुळे देशांतर्गत स्पर्धेचे धोरण सरकारने आखणे अत्यावश्यक आहे.

या परिवर्तनाचा परिणाम 2025 सालातल्या इंटरनेटच्या स्वरूपावर होईल. इंटरनेटचे स्वरूप बंधमुक्त आणि विश्वव्यापी होईल. कोठेही जा, तिथे या ना त्याप्रकारे इंटरनेट आढळणारच. प्रगत तंत्रज्ञानामुळे कनेक्टिव्हिटी आणि साधनसामग्रीच्या किमती परवडण्याजोग्या पातळीवर राहतील. जागतिक पातळीवरचे व्यापार-व्यवहार आणि पुरवठादारांतली जबरदस्त स्पर्धा, यामुळे ग्राहकांच्या मागण्या आणि गरजा, विविध स्रोतांच्या वापराने तसेच विविध ठिकाणांहून, तातडीने पुरवल्या जातील. भविष्यामध्ये इंटरनेटचे जाळे जगभर पसरलेले आढळेल आणि समाजावर त्याचा परिणाम झालेला स्पष्ट जाणवेल. मोठ्या शहरांप्रमाणेच विकसनशील देशांतल्या खेड्यांपर्यंत इंटरनेट पोहोचेल. इंटरनेटच्या प्रसाराचे प्रत्यक्ष, सामाजिक, व्यापारी तसेच मानसिक पातळीवरील थेट तसेच छुपे परिणाम होतील आणि त्यांचे प्रमाणही वाढते राहील. इंटरनेटवरील संवादमाध्यमे (इंटरफेस) अत्यंत लवचिक राहून भाषेसारख्या अडथळ्यांच्या पलीकडे गेल्याने इंटरनेट फार सहजतेने बहुभाषिक बनेल. स्थानिक विचार आणि गरजांना प्राधान्य मिळेल. इंटरनेट तसेच ब्रॉडबँडचा योग्यरीतीने वापर करून त्यांना आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टे परिणामकारकरीत्या साध्य करता येतील.

डॉ. दीपक शिकारपूर

Back to top button