Suryakumar Yadav : तळपता सूर्य | पुढारी

Suryakumar Yadav : तळपता सूर्य

एक उत्तम फलंदाज; पण आपल्या भडक माथ्याने वेळोवेळी अडचणीत सापडलेला सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) नंतर आपला स्वभाव बदलत फक्त बॅटने बोलायला लागला. आज तो भारतीय संघाचा एक आधारस्तंभ बनला आहे. या महिन्यात होणार्‍या टी-20 विश्वचषकात भारताची वाटचाल त्याच्या फलंदाजीवर प्रामुख्याने अवलंबून असेल.

जानेवारी 2015. स्थळ : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ऑफिस. मुंबई संघ निवड समितीच्या बैठकीला चक्क असोसिएशनचे उपाध्यक्ष उपस्थित होते. वास्तविक, निवड समितीच्या बैठकीला उपस्थित राहायचे त्यांचे काही कारण नव्हते आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या इतिहासात हे घडले नव्हते; पण तेव्हा तसे कारणच होते. मुंबई संघाच्या मॅनेजरने जो अहवाल सादर केला होता, त्यात मुंबई कर्णधाराच्या बेशिस्तपणावर कडक ताशेरे ओढले होते. सहकार्‍यांना शिवीगाळ, मैदानात असभ्य वर्तन, असे अनेक आरोप या कर्णधारावर होते. अशा आरोपांची या कर्णधाराची काही पहिलीच खेप नव्हती.

अंडर-25 च्या संघाचा कर्णधार असताना त्याने सहकारी सिद्धेश लाडशी धक्काबुक्की केली होती आणि या रागाचे परिवर्तन मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या काचा फोडण्यापर्यंत झाले. मुंबई क्रिकेट असोसिएशनने या कर्णधाराचे वेतन दोन वर्षांकरिता चांगल्या वागणुकीची हमी म्हणून रोखून ठेवण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षांनंतर जेव्हा या खेळाडूला मुंबईच्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या संघातून वगळले गेले, तेव्हा तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचा उपकर्णधार होता.

या वगळण्यासंदर्भात ज्येष्ठ क्रीडा समीक्षकाने केलेले एक ट्विट त्याने री-ट्विट केले म्हणून पुन्हा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सह-कार्यवाहाने शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये यासाठी त्याला ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवली. एक उत्तम फलंदाज; पण आपल्या भडक माथ्याने वेळोवेळी अडचणीत सापडलेला हा खेळाडू नंतर आपला स्वभाव बदलत फक्त बॅटने बोलायला लागला. आज तो भारतीय संघाचा एक आधारस्तंभ बनला आहे. या महिन्यात होणार्‍या टी-20 विश्वचषकात भारताची वाटचाल त्याच्या फलंदाजीवर प्रामुख्याने अवलंबून असेल. हा खेळाडू आहे सूर्यकुमार यादव.

सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) अनेक आयपीएल स्पर्धा गाजवल्या; पण आयपीएल ते भारतीय संघ हा दरवाजा जरी पटकन उघडणारा असला, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकून राहणे हे सर्वस्वी वेगळे आव्हान असते. सूर्यकुमारने आजवर भारतातर्फे खेळताना 34 सामन्यांमध्ये फक्त 591 चेंडूंत तब्बल 1,045 धावा काढल्या आहेत. या धावा काढताना 93 चौकार, 63 षटकार मारत त्याने 176.81 चा स्ट्राईक रेट ठेवला आहे. भारतीय संघ कोरोनानंतरच्या काळात अनेक प्रयोग करत होता. या प्रयोगांमुळे नवनवीन खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर पारखून घेता आले. ही प्रयोगशाळा जरा जास्तच लांबल्याने आता टी-20 विश्वचषक तोंडावर येऊन ठेपला आहे, तेव्हा आपल्याला शाश्वत कामगिरी देऊ शकणारे खेळाडू वेचायची वेळ आली आहे.

रोहित शर्माच्या संघातील फलंदाजीचा विचार केला, तर स्वतः रोहित शर्मा, राहुल, विराट, सूर्यकुमार यादव हे प्रमुख फलंदाज, पंत, दिनेश कार्तिक, पंड्या हे गेमचेंजर किंवा फिनिशर फलंदाज आणि बाकी अक्षर पटेल, दीपक हुडासारखे फलंदाजी करू शकणारे अष्टपैलू संघात आहेत. या सर्वांचा विचार केला, तर आजच्या घडीला सर्वात सातत्य राखणारा फलंदाज एकच आहे तो म्हणजे सूर्यकुमार यादव.

एक उत्तम; पण आक्रस्ताळी खेळाडू ते भारताच्या मर्यादित षटकांच्या संघातील एक अविभाज्य भाग, हा सूर्याचा प्रवास आणि त्या प्रवासाचा वेग बरेच काही सांगून जातो. एक उत्तम गुणवत्ता असलेला खेळाडू नुसता वरच्या पायर्‍या चढू शकत नाही, तर योग्यवेळी योग्य खेळी करणे गरजेचे असते. ही खेळी नुसती मैदानातीलच पुरेशी ठरत नाही, तर एखाद्या कॉर्पोरेट जॉबमध्ये बढतीसाठी जशा आपल्या जागा आणि नोकर्‍या बदलाव्या लागतात तसेच खेळाडूलाही गरजेचे असते. आपण सूर्याबद्दल बोलत असलो, तरी वर लिहिलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईत सूर्याबरोबर ज्या दुसर्‍या खेळाडूवर हा ठपका होता तो म्हणजे सर्फराज खान.

आज तोही दुलीप, इराणी, आयपीएल आणि रणजी गाजवत भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत आहे. सूर्याचे हे तळपणे प्रामुख्याने दिसायला लागले जेव्हा तो कोलकाता नाईट रायडर्समध्ये गेला तेव्हा. मुंबई इंडियन्सच्या संघात होता तेव्हा तो एका संधीसाठी धडपडणारा 18-19 वर्षांचा कोवळा युवा खेळाडू होता; पण त्याला मुंबई इंडियन्सच्या तेव्हाच्या दिग्गज खेळाडूंत संधी मिळत नव्हती. 2014 साली तो ‘केकेआर’मध्ये गेला तेव्हापासून पुढची चार वर्षे त्याने आपली छाप पाडली. सुरुवातीला तो मोठे फटके खेळू शकणारा मधल्या फळीतील फलंदाज म्हणून संघात होता; पण त्या चार वर्षांत त्याने ‘केकेआर’साठी 608 धावा काढल्यावर मुंबई इंडियन्सला त्याची किंमत कळली आणि तो पुन्हा मुंबईकडे आला. तेव्हापासून तो मुंबई इंडियन्सने राखलेला खेळाडू आहे. (Suryakumar Yadav)

आज भारत हा उत्तमोत्तम खेळाडूंच्या रत्नांची खाण झाला आहे. या खाणीतून विश्वचषकासाठी जी रत्ने निवडली आहेत त्यातल्या काहींच्या निवडीबाबत नक्कीच मतांतरे असू शकतात. विशेषतः, गोलंदाजांबाबत; पण कागदावर फलंदाजी आपली नेहमीप्रमाणेच मजबूत आहे. ही फलंदाजीची फळी मजबूत असली, तरी सूर्यकुमार यादवकडून आपल्या विशेष अपेक्षा का आहेत? कर्णधार रोहित शर्मा आणि राहुल ही जोडी आता सलामीची म्हणून स्थिरावली आहे; पण पहिल्या पॉवर प्लेचा फायदा घ्यायला रोहित शर्माचे पहिली सहा षटके टिकून राहणे अत्यंत गरजेचे आहे. याला कारण म्हणजे त्याची नैसर्गिक फटकेबाजी. (Suryakumar Yadav)

ऑस्ट्रेलियातील वेगवान, उसळत्या खेळपट्ट्या, मोठी मैदाने म्हणजे पर्यायाने लांबच्या सीमारेषा यांचा विचार करता रोहित शर्माला त्याच्या आवडत्या पूल किंवा हूकच्या फटक्यात पकडायला प्रतिस्पर्धी सापळा लावतील, हे उघड आहे. आपल्या दुर्दैवाने हा सापळा यशस्वी ठरला; तर पॉवर प्लेचा फायदा आपल्या धडाकेबाज फलंदाजीने घेऊ शकणारा सूर्यकुमार यादवच दुसरा प्रमुख फलंदाज आहे. राहुलकडे फटके असले, तरी तो गोलंदाजांवर आक्रमण करू शकत नाही. विराट कोहलीने नुकतेच राखेतून उठणार्‍या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुनर्जन्म केला आहे. आज तरी तो पुन्हा फॉर्मात आलेला दिसतो. यामुळे सूर्याचे महत्त्व अधोरेखित होते.

2022 या कॅलेंडर वर्षात सूर्याने 23 सामन्यांत 801 धावा काढल्या आहेत. ‘आयसीसी’च्या ताज्या टी-20 क्रमवारीत तो आज 838 गुणांनी दुसर्‍या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानचे गुण 854 आहेत, म्हणजे दोघांत फक्त 16 गुणांचा फरक आहे. या दोघांत प्रत्येक सामान्यानुसार पहिल्या-दुसर्‍या स्थानासाठी चुरस चालूच राहणार आहे. याचाच अर्थ जगातील एक सर्वोत्तम टी-20 फलंदाज म्हणून सूर्यकुमारवर शिक्कामोर्तब झाले आहे. सूर्या असो व रिझवान असो, जगातील उत्तमोत्तम गोलंदाजीचा नुसता सामनाच नाही, तर त्यावर आक्रमण करायची क्षमता दोघांत आहे. सूर्याच्या भात्यात जवळपास सर्वच फटके आहेत आणि मुख्य म्हणजे कुठच्या गोलंदाजाविरुद्ध कधी ते बाहेर काढायचे, आक्रमण आणि प्लेसमेंट करत धावा वसूल करत डाव कसा बांधायचा, याचे सूर्यकुमार यादवचे ज्ञान उत्तम आहे. कोहलीसारख्या फलंदाजाने त्याच्या फलंदाजीला भरमैदानात केलेला कुर्निसात ही त्याची मोठी पावती आहे.

कुठच्याही फलंदाजाच्या उत्तम कामगिरीला अंतिम शिक्का मिळतो तो त्याने इंग्लड, ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिकेच्या मैदानावर उत्तम कामगिरी केल्यावर. जुलैमध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांची पिसे काढत ट्रेंट ब्रिजला 55 चेंडूंत 117 धावा फटकावत सूर्या इंग्लंडची परीक्षा उत्तम गुणांनी पास झाला. आता त्याची परीक्षा आहे ती ऑस्ट्रेलियाच्या वेगवान खेळपट्ट्यांवर. नुकत्याच संपलेल्या ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याने उत्तम कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात तर अंगात ताप असताना त्याने चमकदार 69 धावा काढल्या; पण हे जलदगती गोलंदाज भारतातील खेळपट्ट्यांवर खेळणे आणि ऑस्ट्रेलियात खेळणे यात फरक आहे.

2021 च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी आपण मनीष पांडे, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर यांना घेऊन गेलो; पण तेव्हाही उत्तम कामगिरी करणार्‍या सूर्यकुमार यादवला त्या दौर्‍यासाठी निवडले नव्हते. तेव्हा थोडा दूरदर्शीपणा दाखवला असता, तर ऑस्ट्रेलियात खेळायचा अनुभव असलेला अजून एक खेळाडू आपल्या संघात आज असता. सूर्यकुमार यादवची ‘एस.के.वाय.’ ही आद्याक्षरे घेऊन ‘स्काय’ हे त्याचे टोपणनाव प्रसिद्ध आहे. त्याच्या कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर तो आहे की, असेच सातत्य त्याने राखले तर खरंच ‘स्काय इज लिमिट’ म्हणण्यापेक्षा ‘स्काय हॅज नो लिमिट’ असेच म्हणावे लागेल.

निमिष वा. पाटगावकर

Back to top button