आत्महत्या रोखणार कशा? | पुढारी

आत्महत्या रोखणार कशा?

समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. पण, काही लोकांना आत्महत्या का करावीशी वाटते? आत्महत्येची जी कारणे असतात, ती बहुतेक तात्कालिक असतात. पण, आत्महत्या ही काही क्षणार्धात घडणारी घटना नाही. आत्महत्येला जैविक, सामाजिक, मानसिक कारणे असतात.

आत्महत्येच्या अनेक घटना आपण दररोज माध्यमातून वाचत असतो. अगदी किशोरवयीन मुलांपासून ते वृद्धांपर्यंत, गरीब-श्रीमंत, यशस्वी-अयशस्वी, विकसित-अविकसित देशांतील लोक असा कोणताच भेद या आत्महत्या करणार्‍या व्यक्तींमध्ये करता येणार नाही. मात्र, आत्महत्या करताना सगळ्यांची मानसिक स्थिती मात्र जवळपास सगळीकडे सारखी दिसते. साधारणपणे जगभरात दरवर्षी जवळजवळ आठ लाख लोक आत्महत्या करतात. म्हणजे दर 40 सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करून जीवन संपवते.

भारतात दरवर्षी साधारणपणे दीड लाखापेक्षा जास्त लोक आत्महत्या करतात. 2012 साली ‘लॅन्सेट’मध्ये भारतातील आत्महत्यांवर प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, देशात दरवर्षी होणार्‍या आत्महत्यांमध्ये 40 टक्के पुरुष आणि 59 टक्के महिला या 15 ते 29 या वयोगटातील आहेत. ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो’च्या रिपोर्टनुसार, 2006 पासून भारतातील आत्महत्यांची संख्या दरवर्षी 2.5 टक्क्यांनी वाढते आहे.

संबंधित बातम्या

समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. पण, काही लोकांना आत्महत्या का करावीशी वाटते? आत्महत्येची जी कारणे असतात, ती बहुतेक तात्कालिक असतात. पण, आत्महत्या ही काही क्षणार्धात घडणारी घटना नाही. आत्महत्येला जैविक, सामाजिक, मानसिक कारणे असतात. आणि हे शास्त्रीय संशोधनातून सिद्ध झाले आहे की, आत्महत्येचे विचार मनात येणार्‍या व्यक्तीच्या मेंदूमध्ये ‘सिरोटोनिन’ या घटकाची कमतरता असते. त्याचबरोबर अनुवंशिकता हेदेखील एक कारण असू शकते.

मानसिक कारणांमध्ये व्यक्तीचे मानसिक आजारपण महत्त्वाचे आहे. डिप्रेशन, बायपोलार डिसऑर्डर्स, व्यसन, चंचल स्वभाव, हट्टीपणा, टोकाचे परफेक्शन, असह्य होणारा ताण हे व्यक्तीला आत्महत्येकडे घेऊन जाऊ शकतात. ‘डब्ल्यूएचओ’ने जगातील पहिल्या पाच आजारांत नैराश्याला स्थान दिले आहे. जेव्हा उदासी, नैराश्य हे काही कारणाशिवाय दीर्घकाळ टिकते तेव्हा त्याला नैराश्याचा आजार किंवा डिप्रेशन म्हणू शकतो.

पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ मन:स्थिती दुःखी किंवा उदास असते, त्याचा दैनंदिन आयुष्यावर परिणाम होत असतो. पश्चात्तापाची, अपराधीपणाची भावना, भविष्याविषयी विनाकारण काळजी, भूक मंदावणे, झोप न लागणे; पण झोपून रहावे असे वाटणे, एकाग्रता कमी होणे, ही डिप्रेशनची काही लक्षणे आहेत. डिप्रेशन वाढत गेले तर आत्महत्येचे विचार व्यक्तीच्या मनामध्ये येतात आणि प्रबळ होत राहतात. 70 टक्के आत्महत्या डिप्रेशनमुळे घडून येतात. तीव्र मानसिक यातना देणारा हा आजार आहे. डिप्रेशनमुळे माणसाचे वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक मोठे नुकसान होते.

डिप्रेशन हा आजार औषध उपचारानंतर पूर्णपणे बरा होणारा आजार असल्याने वेळीच औषध उपचार मिळणे आवश्यक आहे. डिप्रेशनमुळे व्यसनंसुद्धा वाढतात. नैराश्यग्रस्त व्यक्ती हिंसक वर्तनाकडे वळते, सारासार विचार करू शकत नाही. शिवाय व्यसनाच्या आड आपले दोष लपवण्याचा प्रयत्न नैराश्यग्रस्त व्यक्ती करत असते. त्यातून घरगुती हिंसाचारासारख्या घटना घडून येतात. प्रत्येक व्यसनी व्यक्ती नैराश्यग्रस्त असते, असं नाही. पण, नैराश्यग्रस्त व्यक्तींपैकी 30 टक्क्यांपेक्षा जास्त व्यक्ती व्यसनांकडे वळलेल्या दिसतात.

आत्महत्येच्या सामाजिक कारणांमध्ये कुटुंब व्यवस्था, बदलती जीवनशैली, यश-अपयशाचे बदललेले द़ृष्टिकोन यांचा समावेश होतो. कुटुंबातल्या व्यक्तींमध्ये असणारे टोकाचे मतभेद व्यक्तीच्या मनामध्ये नकारात्मक विचार निर्माण करत असतात. आई-वडिलांमधील मतभेदांचा मुलांवर येणारा ताण प्रचंड असतो. ज्याच्याजवळ मन मोकळं करावं, अशी व्यक्ती घरात उपलब्ध नसते; त्यामुळे हा ताण दडपला जातो. मित्र-मैत्रिणींसमोरसुद्धा स्वतःची आभासी प्रतिमा जपत राहिल्यामुळे ताण वाढत जातो आणि तो कधी डिप्रेशनचं रूप घेतो, हे त्या व्यक्तीलाही कळत नाही. शैक्षणिक क्षेत्रातील ताण हा किशोरवयीन मुलांमधील आत्महत्यांचं मोठं कारण ठरत आहे.

सगळ्याच क्षेत्रांमध्ये वाढत चाललेली स्पर्धा आणि त्या स्पर्धांमध्ये टिकून राहण्याचा पालकांचा आग्रह, यामुळे मुलांवर ताण येतो. हा ताण हाताळण्यासाठीचं कौशल्य त्यांच्याकडे नसतं. याशिवाय मुलांच्या हातामध्ये अगदी लहान वयातच मोबाईल, इंटरनेट आलेलं आहे. इंटरनेटमुळे मुलांचं एक आभासी भावविश्व आणि आभासी ‘स्व’प्रतिमा तयार होते आहे. ती जपता आली नाही, तर तातणाव निर्माण होतात. त्यातून अगदी छोट्या छोट्या कारणांसाठी आत्महत्येचे पाऊल उचलले जाते. अशा कमकुवत मानसिक स्थितीसाठी काही वेळा भावनिक बुद्ध्यांकसुद्धा जबाबदार असतो.

बदलत्या कुटुंब व्यवस्थेत शिकवला जाणारा प्रॅक्टिकल कोरडेपणा, विचार न करता मुलांना स्पर्धेमध्ये धावत राहायला लावणं, अपयश न स्वीकारणं, पालकांना वेळ नाही म्हणून ती कसर भरून काढण्यासाठी मुलांना मागील ती वस्तू उपलब्ध करून देणे, मुलांनी चुका केल्या तरी त्यांना वाईट वाटेल म्हणून काहीच न बोलण्याची पालकांचे वृत्ती; यामुळे मुलं ताणतणावांना सामोरे जाणं शिकतच नाहीत. त्यामुळे भविष्यामध्ये नकार पचवताना, अपयशाचा सामना करताना, संघर्षमय प्रसंगांना तोंड देताना त्यांना अडचणी येतात. सततचे अपयश, भावना योग्य प्रकारे व्यक्त न करता येणे, कुटुंबातील बिघडलेले नातेसंबंध हे मग त्यांना नैराश्येकडे आणि पर्यायाने आत्महत्येकडे घेऊन जातात.

पण, ही सगळी प्रक्रिया होत असताना काही लक्षणे आत्महत्या करणार्‍या व्यक्तींमध्ये आपल्याला दिसू शकतात. या व्यक्ती स्वतःहून इतरांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. ज्या गोष्टी करण्यात पूर्वी आनंद मिळत होता, त्या गोष्टी करणेही टाळले जाते. भविष्याबद्दल, वर्तमानाबद्दल प्रचंड नकारात्मकता त्यांच्या मनामध्ये भरलेली असते. स्वतःविषयी अपराधीपणाची किंवा स्वतःला नालायक समजण्याची भावना बळावलेली असते. क्षणाक्षणाला बदलणारे मुड्स, मृत्यूविषयी बोलणे, आत्महत्येसाठी आवश्यक असणार्‍या साहित्याची जमवाजमव करणे, आत्महत्येसाठी स्वतःला तयार करणे अशी लक्षणे या व्यक्तींमध्ये दिसून येतात.

अशा नकारात्मक विचारांमुळे रोजच्या जगण्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा या व्यक्तींना गंभीर समस्या वाटायला लागतात. त्यातून आत्महत्येची ऊर्मी किंवा उन्मादावस्था येते. ही अवस्था साधारणतः पाच ते सहा तास टिकते आणि या उन्मादावस्थेतच आपल्याकडे मरण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाही, असा विचार करून व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करते. एखादी व्यक्ती काही वेळापूर्वी सगळ्यांशी सहजपणे बोलून भेटून गेलेली आहे. पण, थोड्यावेळाने त्या व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असं काही वेळा घडतं. अगदी क्षुल्लक वाटणारी कारणे आत्महत्येला जबाबदार ठरतात. किशोरवयीन मुलांमध्ये अशा कारणांमुळे होणार्‍या आत्महत्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. टोकाचे मूळ स्विंग्स किंवा इंपल्सेस याला कारणीभूत ठरतात.

अशा व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतील किंवा असे विचार आपल्या मनात येत असतील, तर त्वरित मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अशा व्यक्तींना एकटं न सोडता, त्यांना आधार देणे गरजेचे आहे. याप्रमाणे ऐकून घेणे खूप महत्त्वाचे आहे. शाळांमध्ये मुलांसाठी समुपदेशक असायला हवा, अशा चर्चा सुरू आहेत ही नक्कीच एक स्वागतार्ह बाब आहे. किशोरवयीन आणि कॉलेजमधील मुलांसाठीसुद्धा त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी सहकार्य अपेक्षित आहे. कुटुंबातील ताणतणाव कमी करण्यासाठी संवाद वाढवणे गरजेचे आहे. कुटुंबाबरोबर-मुलांबरोबर वेळ घालवणे, विचारांची देवाण-घेवाण करणे गरजेचे आहे. मुलांना ताणतणाव, अपयश, अपमान यांचा सामना करायला मदत केली पाहिजे. यामुळे मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा निकोप विकास होईल.

एका व्यक्तीच्या आत्महत्या करण्यामुळे सरासरी सहा जणांच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होत असतो. आत्महत्या केलेल्या व्यक्तीला विम्याची रक्कम मिळत नाही, त्यामुळे त्याचे कुटुंबीय आर्थिक संकटात सापडू शकतात. त्याचबरोबर आत्महत्या केलेल्या व्यक्तीला कमकुवत, बेजबाबदार, भित्रा मानलं जातं. आत्महत्येचा प्रयत्न करून एखादी व्यक्ती बचावली, तर तिला आधार देण्याऐवजी तिच्याविषयी अफवा पसरवल्या जातात. पूर्वी आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या व्यक्तीवर गुन्हा नोंद केला जायचा. पण, आता मात्र बचावलेल्या व्यक्तीला मानसोपचार उपलब्ध करून दिले जातात. अँटी डिप्रेसंट्स औषधांचा वापरही केला जातो. या औषधांचा कोर्स मानसोपचार घेणार्‍या व्यक्तीने पूर्ण करणे आवश्यक आहे. याशिवाय समुपदेशकांच्या सल्ल्यानुसार, जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणले पाहिजेत.

मानसोपचार घेणार्‍या व्यक्तीने स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आपणहून काही प्रयत्न करणं आवश्यक आहे. व्यायाम, मित्र, कुटुंबाबरोबर वेळ घालवणे; खेळ, कला, छंद या सगळ्यांचा रोजच्या जीवनात समावेश करत स्वतःच्या नकारात्मक विचारांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आत्महत्येचे विचार हे खूप दीर्घकाळ टिकत नाहीत. फक्त आपण आत्महत्येच्या विचाराची उन्मादावस्था टाळायला हवी. संकटं, दुःख, अपयश, एकाकीपणा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. पण, महत्त्वाचं असतं ते ‘तग धरून राहणं.’ आयुष्याने दिलेल्या सगळ्या चांगल्या-वाईट अनुभवांचा खुल्या मनाने स्वीकार करणं आवश्यक आहे.

डॉ. निखिल चौगुले,
मानसोपचारतज्ज्ञ

Back to top button