मणिरत्नमचा ड्रीम प्रोजेक्ट

मणिरत्नमचा ड्रीम प्रोजेक्ट
Published on
Updated on

प्रथमेश हळंदे सप्टेंबरअखेर प्रख्यात दिग्दर्शक मणिरत्नमचा 'पोन्नियीन सेल्वन' प्रदर्शित होणार आहे. आपला 'ड्रीम प्रोजेक्ट' म्हणून घोषित केलेल्या या सिनेमातून मणिरत्नम चोल साम्राज्याचा वैभवशाली इतिहास मोठ्या पडद्यावर आणतो आहे. ए. आर. रेहमान यांचे संगीत आणि चियान विक्रम-ऐश्वर्या राय यांच्या अभिनयाची जुगलबंदी हे 'पोन्नियीन सेल्वन' बघण्यामागचे विशेष कारण ठरणार आहे.

एखाद्या मराठी माणसाला, 'त्याच्या इतिहासाबद्दल थोडक्यात सांग,' असे विचारले, तर आपसूकच त्याची गाडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जाऊन थांबते. अर्थात, मराठ्यांचा आणि महाराष्ट्राचा इतिहास हा फक्त शिवकालाशी संबंधित नसला तरी जे आकर्षण मराठी माणसाला शिवकालीन इतिहासाबद्दल आहे, ते इतर कशाबद्दल दिसत नाही. तमिळ जनसमुदायालाही असेच आकर्षण चोल-चेरा-पांड्या साम्राज्यांबद्दल आहे. त्यातही चोल साम्राज्याबद्दल तमिळी जनतेला विशेष आकर्षण असल्याचे दिसून येते. याचे प्रमुख उदाहरण म्हणजे सुप्रसिद्ध कादंबरीकार कल्की कृष्णमूर्ती लिखित 'पोन्नियीन सेल्वन' ही लोकप्रिय कादंबरी. तमिळ साहित्यात या कादंबरीला मानाचे पान आहे. कल्की कृष्णमूर्ती यांनी आपल्या 'कल्की' नावाच्या साप्ताहिकात ही कादंबरी एका लेखमालेच्या स्वरूपात छापायला सुरू केली होती. या लेखमालेला वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिला. 29 ऑक्टोबर 1950 ते 16 मे 1954 या साडेतीन वर्षांच्या काळात अव्याहतपणे सुरू असलेल्या या लेखमालेची वाचक आवर्जून वाट बघायचे. या लेखमालेमुळे साप्ताहिकाचा खप इतका वाढला होता की, आठवड्याला सत्तर हजारांहून अधिक प्रतींची विक्री अगदी सहज व्हायची.

निव्वळ संशोधनासाठी श्रीलंकेच्या असंख्य वार्‍या करून कृष्णमूर्ती यांनी हा ऐतिहासिक काळ आपल्या कल्पनाशक्तीने कागदावर उभा केला होता. तब्बल पन्नासहून अधिक पात्रांचा भरणा असलेल्या या कादंबरीत चोल साम्राज्यातले लोकजीवन अगदी बारकाईने लिहिले गेले होते. एकेका पात्रावर वेगळी कादंबरी निघावी इतका मोठा तिचा आवाका आहे. आजही तमिळ वाचक चोल साम्राज्याकडे पाहताना 'पोन्नियीन सेल्वन'च्या चष्म्यातूनच पाहतात.

'पोन्नियीन सेल्वन'चा अर्थ होतो, पोन्नीचा मुलगा. प्राचीन तमिळ साहित्यानुसार, पोन्नी हे कावेरी नदीचेच दुसरे नाव आहे. पोन्नी म्हणजेच कावेरी नदी ही चोल साम्राज्याची जीवनदायिनी होती. या नदीच्या कुशीत वाढलेल्या चोल राजपुत्र अरुलमोळी वर्मन म्हणजेच पहिला राजराजा चोल याची ही कथा आहे. मध्ययुगीन इतिहासात चोल राजगादीसाठी चाललेल्या संघर्षाचे वर्णन 'पोन्नियीन सेल्वन'मध्ये आहे.

विजयालय आणि पहिला आदित्य चोल यांच्या आधिपत्याखाली राष्ट्रकुट, पल्लव राजघराण्यांचा पराभव करून वैभवाच्या शिखरावर चढलेले चोल साम्राज्य पहिला राजराजा चोल याने सामर्थ्यशाली आरमाराच्या जोरावर पराक्रमाची शर्थ करत आणखी बळकट केले. दक्षिण भारतातला सर्वाधिक शक्तिशाली राजा म्हणून तो लोकप्रिय होता.

कादंबरीची सुरुवात चोल साम्राज्याची राजधानी पळयारैमध्ये होते. चोल राजगादीसाठी सुरू असलेल्या कटकारस्थानांची चाहूल लागताच, अंथरुणाला खिळलेला चोल राजा दुसरा परांतक म्हणजेच सुंदर चोल हा कांचीत राहणार्‍या आपल्या मोठ्या मुलाला म्हणजेच दुसरा आदित्य चोल याला साम्राज्याची जबाबदारी घेण्यासाठी बोलवून घेतो. त्याचा दुसरा मुलगा अरुलमोळी वर्मन तेव्हा श्रीलंकेत एका युद्धात व्यस्त असतो. त्यावेळी दुसर्‍या परांतकाची मुलगी कुंदवै पिराटी ही आपल्या भावाला म्हणजेच अरुलमोळीला निरोप देण्यासाठी वल्लवरायन वंदीयदेवन या शूर आणि धाडसी योद्ध्याची निवड करते. वंदीयदेवन अरुलमोळीला भेटून त्याला बहिणीचा निरोप देतो. यात पुढे राजगादीसाठी होणारा रक्तरंजित संघर्ष, त्यातून अरुलमोळीचा राजराजा चोल बनण्यापर्यंतचा प्रवास आपल्याला 'पोन्नियीन सेल्वन'मध्ये वाचायला मिळतो.

'पुदू वेल्लम', 'सुलरकाट्र', 'कोलई वाल', 'मणिमकुटम' आणि 'त्याग शिकरम' या पाच खंडांमध्ये विभागल्या गेलेल्या 'पोन्नियीन सेल्वन'चे नाटकात रूपांतर करणे अवघडच काम होते. याआधीही कादंबरीतले विशिष्ट प्रसंग नाट्यरूपात सादर केले गेले होते. पण, पूर्ण कादंबरीलाच नाटकात बसवण्याचे हे शिवधनुष्य मॅजिक लँटर्न या नाट्यसंस्थेने लीलया पेलले आणि 1999 मध्ये चेन्नईतल्या वायएमसीए मैदानावर चार तासांचे नाट्य रूपांतरण सादर केले गेले. त्याहीआधी, 'पोन्नियीन सेल्वन'वर सिनेमा बनवायच्या चर्चेला जोर आला होता. यात प्रमुख नाव होते 'मक्कल तिलकम.' एम. जी. रामचंद्रन म्हणजेच एम. जी. आर. यांचे. या सिनेमात एम. जी, आर. वंदीयदेवनच्या भूमिकेत दिसणार होते. त्याचबरोबर जेमिनी गणेशन, सावित्री, पद्मिनी, नंबियार, वैजयंतीमाला, वी. नागय्या, टी. एस. बालय्या अशी मोठी नावेही या सिनेमासोबत जोडली गेली होती. पण एम. जी. आर. यांच्या अपघातामुळे हा सिनेमा कधी आलाच नाही.

त्यानंतर काही वर्षांनी अभिनेता कमल हसनने आपण 'पोन्नियीन सेल्वन'वर सिनेमा बनवत असल्याची घोषणा केली. त्यासाठी त्याने या कादंबरीचे आवश्यक हक्कही विकत घेतले. पण कलाकारांची जुळवाजुळव करण्यातच चारेक वर्षं निघून गेली. त्यानंतर या सिनेमासाठी लागणार्‍या एकंदर खर्चाचा आवाका बघता, त्याने हा प्रोजेक्ट गुंडाळण्यातच धन्यता मानली.

बहुतांश तमिळ दिग्दर्शकांना चोल साम्राज्य आणि त्यातही 'पोन्नियीन सेल्वन'वर सिनेमा काढायची इच्छा होतीच. याला मणिरत्नम तरी कसा अपवाद असेल. 1994 मध्येच मणीने आपण 'पोन्नियीन सेल्वन'वर सिनेमा काढत असल्याची घोषणा केली. त्यानंतर कमल हसनची एका प्रमुख भूमिकेसाठी निवडही करण्यात आली. पण तेव्हाही बजेटअभावी हा सिनेमा रखडला. त्यानंतर 2010 मध्ये मणीने पुन्हा एकदा नव्याने 'पोन्नियीन सेल्वन' सुरू करत असल्याची घोषणा केली.

यावेळी तमिळ अभिनेता 'दलपती' विजयसोबत तेलुगू सिनेसृष्टीचा 'प्रिन्स' महेशबाबूही यात झळकणार होता. त्याचबरोबर आर्या, सत्यराज, सूर्या तसेच प्रियांका चोप्रा, अनुष्का शेट्टी, ज्योतिका अशा मोठमोठ्या नावांचाही विचार केला गेला होता. 100 कोटींचे बजेटही यासाठी ठरवण्यात आले होते. पण, नंतर मूळ ऐतिहासिक स्थळांवर चित्रीकरणाची परवानगी न मिळाल्याने सेट उभारणी आणि व्हीएफएक्ससाठी वाढत जाणारा खर्च बघून मणिरत्नमने प्रोजेक्ट रद्द केला.

जानेवारी 2019 मध्येे लायका प्रॉडक्शनने पैसे लावायची तयारी दाखवली आणि मणिरत्नमच्या या 'ड्रीम प्रोजेक्ट'ला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली. यावेळी चियान विक्रम दुसर्‍या आदित्यच्या, जयम रवी अरुलमोळीच्या, तर कार्ती वंदीयदेवनच्या भूमिकेत झळकणार आहे. त्रिशा कुंदवैची भूमिका साकारत असून, ऐश्वर्या राय यात नंदिनी आणि नंदिनीची आई या दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर दुसर्‍या परांतकाच्या भूमिकेत अभिनेता प्रकाश राजची निवड केली गेली आहे.

संगीतकार ए. आर. रेहमान आणि मणिरत्नम ही जोडी एकत्र आली, तर काय कमाल होते हे सिनेरसिकांनी आधीही बर्‍याचदा अनुभवले आहे. आणि याहीवेळी रेहमानच्या जादुई स्वरांनी सजलेल्या 'पोन्नियीन सेल्वन'च्या अल्बमने कसलीही निराशा केली नाही. त्याचबरोबर 'रावणन'नंतर पुन्हा एकदा चियान विक्रम आणि ऐश्वर्या आमनेसामने येत असल्याने या सिनेमाला वेगळेच महत्त्व प्राप्त झालेय.

'बाहुबली'नंतर आलेल्या इतिहासपट आणि पिरीयड ड्रामा सिनेमांच्या लाटेवर स्वार होऊन 'पोन्नियीन सेल्वन'ही तमिळ सिनेसृष्टीत मोठा इतिहास घडवण्याच्या मार्गावर आहे. 'बाहुबली'च्या यशाने प्रेरित होऊन गेल्या काही वर्षांत बरेच हिट आणि फ्लॉप सिनेमे येऊन गेलेत. त्यात 'पुली'पासून ते आतापर्यंतच्या 'बिंबीसार'पर्यंतचा समावेश आहे. बॉलीवूडमधेही 'तान्हाजी', 'पद्मावत', 'पानिपत'सारखे हिट-फ्लॉप सिनेमे येऊन गेलेत.

वास्तवाला कल्पनेची जोड लाभलेल्या या सिनेमांच्या आडून इतिहासाचे केले जाणारे सोयीस्कर गौरवीकरण प्रेक्षकांना आवडते, यात आता कसलीही शंका नाही. मराठीतही हा प्रयोग सध्या शिवकालीन इतिहासाला हाताशी धरून केला जातोय आणि काही सिनेमांचा अपवाद वगळता, प्रेक्षकांनीही ते डोक्यावर उचलूनही घेतलेत. प्रवीण तरडेंचा 'हंबीरराव', दिग्पाल लांजेकर यांचे 'शिवराज अष्टक', नागराज-रितेश देशमुख यांची आगामी 'शिव'त्रयी याचेच उदाहरण आहे.

तमिळ सिनेसृष्टीत आधीही चोलांचा इतिहास मांडला गेलाय. 'राजराजा चोलन', 'अंबिकापती', 'पुंपुकार' आणि 'मदुरै मित्त सुंदरपांडियन'चा त्यात समावेश होतो. सेल्वा राघवन दिग्दर्शित आणि कार्तीची प्रमुख भूमिका असलेला 2010 चा 'आयिरातील ओरुवन' हा या प्रकारातला वेगळा; पण कल्ट सिनेमा होता. लवकरच याचा दुसरा भागही येतोय. आता यात मणिरत्नमच्या बहुप्रतीक्षित 'पोन्नियीन सेल्वन'ची भर पडतेय. हा सिनेमा 'बाहुबली'सारखाच दोन भागांमध्ये विभागला जाणार असून, त्याचा पहिला भाग येत्या सप्टेंबरमध्ये थिएटरमध्ये येतो आहे. 'पोन्नियीन सेल्वन' मोठ्या पडद्यावर येणे हे तमिळ सिनेरसिकांचे जुने; पण अपूर्ण स्वप्न असल्याने तमिळ सिनेसृष्टीसाठी हा फार महत्त्वाचा सिनेमा असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news