झेपावे चंद्राकडे… | पुढारी

झेपावे चंद्राकडे...

श्रीराम शिधये,
ज्येष्ठ पत्रकार आणि विज्ञान लेखक 

‘झेपावे चंद्राकडे’चा ध्यास पुन्हा एकदा माणसाने घेतला आहे.चंद्रावरच्या मातीमध्ये अनेक मूलद्रव्ये आहेत. माणसाच्या द‍ृष्टीने ती अमोल आहेत. चंद्राचा अधिक अभ्यास करून आपल्या सौरमालेबद्दलच्या माहितीतही भर पडू शकणार आहे. मात्र, या सार्‍याला एक आणखीन पदर आहे, तो चीनच्या आक्रमक संशोधनाचा.

अनेकांच्या भावजीवनाचा हळवा भाग असलेल्या चंद्रावर माणसाने पुन्हा एकदा स्वारी करण्याचे निश्‍चित केले आहे. ‘झेपावे चंद्राकडे’चा ध्यास पुन्हा एकदा माणसाने घेतला आहे. सर्व गोष्टी सुरळीतपणे पार पडल्या, कोणतीही तांत्रिक अडचण ऐनवेळी उभी राहिली नाही, तर अमेरिकेच्या नासाचे ‘स्पेस लाँच सिस्टीम’ (एसएलएस) रॉकेट यशस्वीपणे अवकाशात झेपावले असल्याचे वृत्त एव्हाना सर्वांपर्यंत पोहोचले असेल. या रॉकेटने आपल्याबरोबर ‘ओरायन’ नावाची अवकाशकुपी (स्पेस कॅप्सूल) घेऊनच आपला प्रवास चंद्राच्या दिशेने सुरू केला असेल. 1972 सालामध्ये ‘अपोलो 17’ यानाने अमेरिकेच्या अवकाशवीरांना चंद्रावर नेऊन परत आणले होते.

1969 सालामध्ये ‘अपोलो 11’तून नील आर्मस्ट्राँग, मायकेल कॉलन्स आणि एडविन आल्ड्रिन चंद्रावरच्या स्वारीवर गेले होते. पैकी आर्मस्ट्राँग आणि आल्ड्रिन चंद्रावर उतरले होते. या यशस्वी मोहिमेनंतर अमेरिकेने लागोपाठ सहावेळा ‘अपोलो’ यानाच्या मदतीने चंद्रावर स्वारी केली. त्यातील ‘अपोलो 13’ची मोहीम अपयशी झाली. मात्र ऐनवेळी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर काय करावे लागते, याचे ज्ञान या मोहिमेमुळे शास्त्रज्ञांना मिळाले. त्याद‍ृष्टीने विचार केला, तर ही मोहीमसुद्धा यशस्वी झाली, असे म्हणावे लागते.

या अपयशानंतरसुद्धा ‘अपोलो’ मोहीम सुरूच राहिली. 1972 च्या ‘अपोलो 17’च्या यशानंतर मात्र अमेरिकेने पुन्हा चंद्रावर माणूस पाठविण्याचा प्रयत्न केला नाही. उलट 2010 मध्ये त्यावेळचे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या एका भाषणात म्हटले होते की, ‘आता अमेरिकेने चंद्राच्या पल्याड आपली द‍ृष्टी वळवणे आवश्यक आहे. लघुग्रहांवर जाऊन त्यांचा अभ्यास करणे आणि मंगळावर स्वारी करणे याला आता अमेरिकेने प्राधान्य द्यायला हवे.’ परंतु, बराक ओबामा यांचे सांगणे मनावर न घेता चंद्रावर जाण्याच्या मोहिमा आखण्याचा विचार बळावत गेला. आता ज्या मोहिमेची सुरुवात झाली आहे आणि 2025 सालामध्ये चंद्रावर आपल्या अंतराळवीरांना उतरविण्याचे अमेरिकेने नक्‍की केले आहे, त्या मोहिमेचे ‘आर्टेमिस मोहीम’ असे नामकरण ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत करण्यात आले.

या योजनेचा पहिला टप्पा आता सुरू झाला आहे. ‘एसएलएस’ या रॉकेटबरोबर ‘ओरायन’ ही अवकाशकुपी चंद्राच्या दिशेने पाठविण्यात आली आहे. यापुढच्या आर्टिमिसच्या मोहिमांमध्ये अंतराळवीर याच अवकाशकुपीमध्ये बसून चंद्रावर जाणार आहेत आणि हीच अवकाशकुपी नंतर त्यांना पृथ्वीवर घेऊन येणार आहे. आताच्या मोहिमेमध्ये मात्र चंद्राच्या जवळ पोहोचल्यानंतर ‘एसएलएस’ रॉकेट ही अवकाशकुपी चंद्रभूमीच्या दिशेने पाठवेल. ही कुपी चंद्राच्या भूमीवर नियोजित ठिकाणी उतरेल. तिथे ती सहा दिवस राहील आणि परत पृथ्वीवर येईल. एका परीने ही भविष्यातील मोहिमांची रंगीत तालीम आहे.

सन 2024 मध्ये ‘आर्टेमिस’ मोहिमांतर्गत चार अंतराळ वीरांगनांना ‘ओरायन’ या अवकाशकुपीतून ‘एसएलएस’ रॉकेटमधूनच अवकाशात पाठविण्यात येईल. मात्र हे अंतराळवीर चंद्राच्या भूमीवर उतरणार नाहीत. पृथ्वी भोवतालच्या वातावरणातच ‘ओरायन’ या अवकाशकुपीच्या कसून चाचण्या घेण्यात येतील. त्या संपल्या की, ती कुपी चंद्राच्या भोवती प्रदक्षिणा घालेल आणि मग पृथ्वीवर परत येईल. आपल्या अंतराळवीरांना घेऊन ही कुपी चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे जाण्याची, तिथे काही काळ व्यतीत करण्याची आणि परत पृथ्वीवर सुखरूपपणे येण्याची ती तालीम असेल.

त्यानंतर सन 2025 मध्ये आर्टेमिस मोहिमेच्या अंतर्गत चार अंतराळवीरांना चंद्रावर पाठवणार आहे. ही मोहीम गुंतागुंतीची आहे. तिचा पुरेसा तपशील अजून प्रसिद्ध झालेला नाही. मात्र जी माहिती उपलब्ध आहे, त्यावरून असे दिसते की, या ‘आर्टेमिस 3’ मोहिमेमध्ये पहिल्यांदाच गोरेतर अंतराळवीरांगना असणार आहे. ती चंद्रावर उतरणार आहे. चंद्रावर पाय ठेवणारी ती पहिलीच महिला आणि तीसुद्धा गोरेतर स्त्री असणार आहे. त्या द‍ृष्टीने ही मोहीम महत्त्वाची आहे, यात शंकाच नाही. या मोहिमेपूर्वी एक वेगळी मोहीम हाती घेण्यात येईल.

त्यामध्ये चंद्राजवळच्या छशरी – ठशलींळश्रळपशरी करश्रे जीलळीं (एनआरएचओ) कक्षेमध्ये ह्यूमन लँडिंग सिस्टीम (एचएलएस) स्थापित करण्यात येईल. तशी ती यशस्वीपणे स्थापित झाली की, त्यानंतर ‘ओरायन’ या अवकाशकुपीला घेऊन जाणारे ‘एसएलएस’ रॉकेट अवकाशात झेप घेईल आणि ‘एचएलएस’शी जोडले जाईल. ‘ओरायन’मधील दोन अंतराळवीर ‘एचएलएस’मध्ये जातील. नंतर ‘एचएलएस’ चंद्राच्या भूमीवर उतरेल. पृथ्वीवरील कालमापनाच्या हिशेबात अंतराळवीर तिथे साडेसहा दिवस राहतील. आणि नंतर ‘ओरायन’ या कुपीतून पृथ्वीवर येतील. यानंतर आणखीन दोनवेळा चंद्रावर स्वारी करण्याची योजना आखण्यात आली आहे. शेवटची स्वारी 2027 मध्ये असणार आहे.

चंद्रावरच्या या मोहिमांचा उद्देश काय आहे? अधिकृतपणे सांगण्यात येते की वैज्ञानिक संशोधन, आर्थिक फायदे आणि नवीन पिढीला अवकाश संशोधन करण्यास स्फूर्ती मिळावी, हेच आमचे ध्येय आहे. शिवाय या मोहिमांमुळे नवीन उद्योग उभारले जातील, रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील, कुशल कामगारांना आणि तंत्रज्ञांना भरपूर वाव मिळेल, याची आम्हाला पूर्णपणे खात्री वाटते. महत्त्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय सहकार्‍यांच्या मदतीने आणि व्यावसायिकांच्या साहाय्याने आम्हाला चंद्राच्या भूमीचे अधिक संशोधन करता येईल.

चंद्रावरच्या मातीमध्ये अनेक मूलद्रव्ये आहेत. माणसाच्या द‍ृष्टीने ती अमोल आहेत. शिवाय चंद्राचा अधिक अभ्यास करून आपल्या सौरमालेबद्दलच्या माहितीतही भर पडू शकणार आहे. आपल्या सौरमालेतील ग्रहांची उत्पत्ती कशी झाली आणि त्यांचा आजवरचा प्रवास कसकसा घडत गेला, यावरही त्यातून प्रकाश पडू शकणार आहे. हे सर्व खरेच आहे. मात्र या सार्‍याला एक आणखीन पदर आहे. आणि तो आहे, चीनच्या आक्रमक संशोधनाचा.

अवकाशविषयक संशोधनातही चीन आता मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे. त्याने आतापर्यंत तीन चंद्रमोहिमा यशस्वी करून दाखवल्या आहेत. भारत आणि इस्राईल यांनीसुद्धा चंद्रमोहिमांचा ध्यास घेतला आहे. चीन तर 2030 च्या दशकात चंद्रावर आपला तळ उभारण्याच्या तयारीत आहे. त्यामध्ये जर तो यशस्वी झाला, तर ‘चंद्रावरचा हा भूभाग फक्‍त आमचा आहे,’ अशी भूमिका तो घेईल की काय, अशी भीती आता अमेरिकेला वाटू लागली आहे. त्या द‍ृष्टीने विचार केला, तर अमेरिकेच्या ‘आर्टेमिस चंद्रमोहिमा’ हा, अवकाशावर वर्चस्व कोणाचं? हे सिद्ध करण्याचाच एक भाग आहे.

1960 च्या दशकात अमेरिका आणि त्यावेळच्या सोव्हिएत युनियन यांच्यामध्ये अशी स्पर्धा होती. सुरुवातीच्या काळात तरी या स्पर्धेत सोव्हिएत युनिनयने अमेरिकेला मागे टाकले होते. पण नंतर अमेरिकेने ‘अपोलो’ मोहिमा यशस्वी करून चंद्रावर आपले अंतराळवीर उतरवले. त्यानंतर गोर्बाचेव्ह सत्तेवर येईपर्यंत आणि सोव्हिएत युनियनचे रूप पालटेपर्यंत या दोन देशांमध्ये अवकाशविषयक संशोधनाबाबत, अण्वस्त्रांबाबत तीव्रतम स्वरूपाची स्पर्धा होती.

आता सोव्हिएत युनियन अस्तित्वात नाही; पण चीनच्या रूपाने एक नवीन प्रतिस्पर्धी अमेरिकेसमोर उभा ठाकला आहे. शिवाय जपान, इस्रायल, भारत हे देशसुद्धा अवकाशविषयक संशोधनात भरारी घेत आहेत. साहजिकच, अवकाशविषयक संशोधनामध्ये आपलेच नाणे कसे आणि किती खणखणीत आहे, हे सार्‍या जगाला दाखवून देण्याची गरज अमेरिकेला अतिशय तीव्रतेने वाटू लागली आहे. ‘आर्टेमिस चंद्रमोहिमां’ना या स्पर्धात्मक भावनेतून येणार्‍या अनिश्‍चिततेचीसुद्धा एक किनार आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. ‘आर्टेमिस’ मोहिमा यशस्वी झाल्या, तर चंद्राबद्दलच्या आणि आपल्या सौरमालेतील अन्य ग्रहांबाबतच्या माहितीत मोलाची भर पडेल, यात शंकाच नाही. त्यामुळेच या मोहिमांना सुयश चिंतूया आणि आपल्यासाठी माहितीची नवीन दालने या मोहिमा उघडतील, अशी सार्थ आशा बाळगूया.

श्रीमंत चांद्रभूमी

चंद्रावरील मातीमध्ये असलेली मूलद्रव्ये महत्त्वाची आहेत. या मूलद्रव्यांमध्ये अ‍ॅल्युमिनियम (7.3 टक्के), कॅल्शियम (8.5 टक्के), क्रोमियम (0.2 टक्के), लोह (12.1), मॅग्‍नेशियम (4.8), मँगेनिज (0.2), ऑक्सिजन (40.8), पोटॅशियम (0.1), सिलिकॉन (1906), सोडियम (0.3) आणि टिटॅनियम (4.5) यांचा समावेश होतो. याशिवाय चंद्रावर हिलियम-3 आहे. अणुभट्ट्यांसाठी हिलियम-3 अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळेच ते चंद्रावरून पृथ्वीवर आणण्यामध्ये चीन, रशिया आणि भारत या तीनही देशांना विलक्षण रस आहे. अर्थात अमेरिकासुद्धा यामध्ये मागे नाही. याशिवाय ‘रेअर अर्थ मटेरिअल्स’सुद्धा (आरईएम) चंद्राच्या भूमीमध्ये आहेत. अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स, बॅटर्‍या, इलेक्ट्रिक मोटर्स यासाठी ‘आरईएम’ अतिशय मोलाची आहेत. सध्या या क्षेत्रात चीनची मक्‍तेदारी निर्माण झाल्याचे चित्र आहे आणि ते अमेरिकेसह अन्य देशांच्या डोळ्यात खुपत आहे. या आरईएमसाठीसुद्धा चंद्रावर जाणे आवश्यक आहे, याची जाणीव आता होऊ लागली आहे.

Back to top button