World Water Day 2022 : जलसंपत्तीचा विनाश मानवाच्या मुळावर | पुढारी

World Water Day 2022 : जलसंपत्तीचा विनाश मानवाच्या मुळावर

पाणी हा आधिवास आहे. पृथ्वीवर पाण्यामुळे जीवन विकसित झाले. वाळवंटीकरण, दुष्काळ व पाणी समस्येची कारणे आपल्या पृथ्वीविरोधी वर्तनात आहेत. आपण मानवकेंद्री विचारपद्धती सोडून पृथ्वीवरील एक सजीव म्हणून जीवनकेंद्री, पृथ्वीकेंद्री विचार केला पाहिजे. आज जागतिक जलसंपत्ती दिन. त्यानिमित्त…

दरवर्षी 24 एप्रिल हा दिवस ‘जागतिक जलसंपत्ती दिन’ (World Water Day 2022) म्हणून साजरा केला जातो. जल दिन, जलसंपत्ती दिन या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाकडून पाणी वाचवण्यासाठी आवाहन करण्यात येते. सर्व देशांची सरकारेदेखील त्याबाबत बोलतात. पण पाण्याचा नाश, ज्या यंत्र व रसायनाधारित जीवन पद्धतीपासून सुरू झाला व ज्याला ‘विकास’ म्हटले जाते, ती जीवनशैली थांबवू असे म्हणत नाहीत. पाणी जीवनाचा आधार व पाणी असणारा पृथ्वी हा एकमेव ग्रह. पृथ्वीवर कोट्यवधी वर्षे ‘पाणी तेथे जीवन’ होते.

मात्र आज अल्पकाळात, औद्योगिक युगात, जेथे आम्ही तेथे पाणी हवे (शहरीकरण) व जे आम्ही करू त्यासाठी (औद्योगिकीकरण) पाणी ही पृथ्वीविरोधी भूमिका आली. याला आधुनिक ‘जल व्यवस्थापन’ म्हणतात. पण हे ‘जलविध्वंसन’ आहे. धरणे पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी, पूर नियंत्रणासाठी बांधली गेलीच नाहीत. ती औद्योगिकीकरण, शहरीकरण व अर्थव्यवस्था चालवण्यासाठी बांधली गेली. डहाणूच्या खाडीतील औष्णिक म्हणजे कोळसा जाळून वीजनिर्मिती केंद्र तासाला 66000 घनमीटर पाणी, यंत्रणा थंड ठेवण्यासाठी वापरते. त्यात गरम झालेले पाणी नदी, खाडी, सागरात परत सोडल्याने जीवसृष्टीचा नाश झाला.

असे सुमारे 60000 कोटी लिटर पाणी देशात रोज औष्णिक वीज निर्मितीसाठी लागते. यंत्रणा धुण्यासाठी अजून लाखो लिटर पाणी लागते. अशीच गोष्ट सिमेंटबाबत आहे. एक टन सिमेंट काँक्रीट बनवण्यासाठी 2000 टन पाणी लागते. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पात भट्टी थंड ठेवण्यासाठी रोज 5200 कोटी लिटर पाणी रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या सागरातून घेतले जाईल व किरणोत्साराने दूषित गरम पाणी परत सागरात सोडले जाईल. याबाबत भारतीय सागर विज्ञान संस्थेचा सन 1989 चा 1000 मेगावॅट क्षमतेच्या अणुभट्टी प्रकल्प अयोग्य ठरवणारा अभ्यास अहवाल आहे. मग एकूण 9900 मेगावॅट क्षमतेचे 6 अणुभट्ट्यांचे संकुल सरकार का उभारत आहे?

साखर हा नैसर्गिक पदार्थ वाटतो. पण एक किलो साखरेसाठी 2500 किलो पाणी लागते. उत्पादित साखरेपैकी सुमारे 75 टक्के साखर चॉकलेट, शीतपेये व आईस्क्रीमसाठी म्हणजे औद्योगिक व शहरी जीवनशैलीसाठी वापरली जाते. मद्यासाठी साखर व पाणी जाते. दुष्काळी भागात पिण्याला पाणी नाही तरीही मद्यनिर्मिती कारखाने मोठा पाणीवापर करत आहेत.

एक लहान आकाराची मोटार बनवताना 1,55,000 लिटर पाणी वापरले जाते. ती वापरताना धुण्यासाठी व देखभालीसाठी लागते ते पाणी वेगळे. या पद्धतीने आपल्या आसपास, विश्वामित्राच्या प्रतिसृष्टीप्रमाणे पसरलेले कृत्रिम पदार्थ व वस्तूंचे जग, फक्त जीवनासाठी असलेल्या पाण्याचा, पृथ्वीच्या इतर घटकांचा व क्षमतांचा कल्पनातीत, जीवनविरोधी गैरवापर करत आहे.

आधुनिक म्हणवणार्‍या मानवांनी चालवलेल्या विकासात म्हणजे औद्योगिकीकरण व शहरीकरणात रोज डोंगरांमागे डोंगर तोडले जात आहेत. यात आपोआपच जंगलांचा व झरे, नद्या, तलाव यांचा नाश होत आहे. धरणे बांधणे, नदी जोडणे, यात पृथ्वीने निर्माण केलेली पाण्याची नैसर्गिक व्यवस्था पूर्ण उद्ध्वस्त होत आहे. नवी मुंबई विमानतळाच्या प्रकल्पात 3 नद्या गाडल्या गेल्या. मुंबईच्या मेट्रो-3 भुयारी रेल्वेत मिठी नदीच्या मुखातील माहीमच्या खाडीतील जंगल गाडले. आता वरील डोंगरांमधील पाणलोट क्षेत्रातील जंगल तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

2018 मध्ये नीती आयोगाने गंभीर इशारा दिला की, बारा वर्षांत भारतात सुमारे 50 कोटी लोकांसाठी पाणी नसेल. पण आम्ही सागराच्या खार्‍या पाण्यापासून गोड पाणी तयार करू, हवेतील बाष्पापासून पाणी बनवण्याची यंत्रे आम्ही बनवली आहेत. एवढेच नाही, तर ढगांमध्ये मीठ अथवा अन्य रसायनांचा वापर करून, थंडावा निर्माण करून पाऊस पाडू, असे सांगू लागलो. कोकणातूनच नव्हे, तर सर्वच नद्यांतून समुद्रात जाणारे पाणी वाया जाते, असा समज तंत्रज्ञानाचा प्रभाव व पृथ्वीबाबत अज्ञान असलेल्या शिक्षणामुळे सर्वत्र पसरला आहे.

नद्यांचे पाणी सागरात करोडो वर्षे जात आहे, आणि ते तसेच जाणे हे सागरातील व पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी अत्यंत आवश्यक आहे. पृथ्वी हे जलगृह आहे. त्यावरील सुमारे 71 टक्के पृष्ठभाग पाण्याने व्यापला आहे. त्यातील सागराची क्षारता 35 टक्के आहे. याचा अर्थ, मिठाचे म्हणजे सोडियम आणि क्लोरीनच्या संयुगाचे दर एक हजार भागांत 35 टक्के प्रमाण आहे.

‘सोडियम’ हा पाण्याच्या संपर्कात पेट घेतो आणि क्लोरीन विषारी आहे. तरीही या दोन्हीपासून तयार होणारे मीठ सागराच्या पाण्याचा भाग हे प्रमाण त्याच मर्यादेत राहण्यासाठी सागराच्या ऊध्वर्र्पतन झालेल्या पाण्याचा म्हणजे पावसाचा पुरवठा सागराला होणे अत्यंत आवश्यक असते. कोट्यवधी वर्षे हा पाऊस नद्यांच्या रूपाने वाहून आणला जातो आणि सागरास मिळतो.

नद्या जर सागरास मिळल्या नाहीत, तर क्षारतेचे 35 टक्के प्रमाण झपाट्याने वाढत जाईल. ते 40 ते 42 टक्के झाल्यास सागर मृत होईल. त्यातील जीवन संपुष्टात येईल, मासळी नष्ट होईल, हे रशियातील ‘अमू दर्या’ आणि ‘सिर दर्या’ या नद्या धरणे बांधून अडवण्यामुळे, ‘अरल’ सागराबाबत घडले. ‘अरल’ सागराचे मिठागरात रूपांतर झाले व वार्‍याबरोबर मिठाचे कण पसरून शेकडो किलोमीटर अंतरापर्यंत शेती, पिके नष्ट झाली. जमीन नापीक झाली. दुष्काळ पडून लोक बेदखल झाले. परंतु अज्ञानामुळे विज्ञानाचा पुरस्कार करणारे तज्ज्ञ आणि अभियंते धरणांची आणि नदी जोडणीसारख्या विनाशकारी प्रकल्पांची सातत्याने भलावण करतात.

आज देशात सर्वात जास्त धरणे महाराष्ट्रात आहेत व सर्वात कमी सिंचन येथेच आहे. मराठवाड्याचे उदाहरण घ्या. 1973 सालात अधिकृत आकडेवारीप्रमाणे 17 तालुके दुष्काळग्रस्त होते. 1987 सालात 26 तालुके दुष्काळग्रस्त झाले. 2018 सालात ही संख्या 48 झाली. यात आधीपासूनचे तालुके कायम राहिले. याच काळात मराठवाड्यात व महाराष्ट्रात धरणे वाढत होती. मग दुष्काळ का वाढला? 60 वर्षांपूर्वीपर्यंत भारतभूमी सुजलाम सुफलाम होती. ‘वंदे मातरम’ गीतात तोच उल्लेख आहे. नद्या दुथडी भरून वाहत होत्या. विहिरी, तळी भरलेली होती. भूजल भूपृष्ठालगत होते. ही स्थिती करोडो वर्षे होती. (World Water Day 2022)

स्वातंत्र्य मिळाले तेव्हा साडेसात लाख खेड्यांच्या या देशात, फक्त सुमारे 250 गावांत पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष होते. राजस्थानातील जैसलमेर, जोधपूर, बिकानेर या 100 मि.मी. जेमतेम पाऊस पडणार्‍या वाळवंटी भागातील गावेही पाण्याबाबत स्वयंपूर्ण होती. यात भारतीयांची बुद्धिमत्ता, कल्पकता, शहाणपण, प्रतिभा होती व त्याला संयम, साधेपणाची व पृथ्वीसुसंगत जीवन पद्धतीची जोड होती. औद्योगिकीकरणानंतर आज देशात सुमारे तीन लाख गावांत पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. महाराष्ट्रात 32000 गावांत पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष व दुष्काळ आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टच्या भाषणात म्हटले होते की, देशातील निम्म्या घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा होत नाही. महिलांना कित्येक मैलांची पायपीट करून पाणी मिळवावे लागते. ते म्हणाले की, प्रत्येक घराला 2024 पर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी जलजीवन योजनेत साडेतीन लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

खरी गोष्ट ही आहे की, कुणाला तरी थोड्यांना नळाचे पाणी मिळावेे म्हणून इतर बहुतेकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. या थोड्यांचेही पाणी कधी ना कधी जाणार असते. धरणे बांधून नळाने पाणी आले म्हणून गावकर्‍यांनी आपले खरे आधार असलेल्या गावातील तलाव व विहिरींकडे, आता यांची गरज नाही, यांना नीट कशाला ठेवायचे म्हणून दुर्लक्ष सुरू केले. पैसा कमावण्यासाठी बारमाही पिके घेता यावी म्हणून बोअरवेलने अधिकाधिक पाणी उपसा सुरू झाला.

आता स्थिती अशी आहे की, अनेक भागांत नळाने आठ-पंधरा दिवस किंवा महिन्याने पाणी येते व बोअरवेलमुळे भूजल पातळी शेकडो फूट खोल गेली आहे. नद्यांना धरणांनी अडवल्याने त्या आटल्या. विहिरी व तळी गाळाने भरली आहेत. त्याचवेळी सरकारनेही आदर्श ठरवलेल्या, नव्या शहरात दिसणार्‍या जीवनशैलीसाठी पैसे हवे म्हणून किंवा नगदी पिकांच्या लागवडीसाठी झाडे व जंगल तोडून विकणे चालू राहिले.

पाणी हा आधिवास आहे. पृथ्वीवर पाण्यामुळे जीवन विकसित झाले, हा खरा विकास आहे. ‘पाणी वाचवा’ असे म्हणताना त्याचा विनाश करणार्‍या मोटार, वीज आणि सिमेंटलाही कवटाळून राहायचे असे चालणार नाही. 94 टक्के कार्बन डायऑक्साईड वायूचे उत्सर्जन या तीन गोष्टींमुळे होत आहे. हे उत्सर्जन व ‘पाणी आणि हरितद्रव्याचा नाश’ या एकत्र घडणार्‍या गोष्टी आहेत. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. (World Water Day 2022)

वाळवंटीकरण, दुष्काळ व पाण्याची समस्या आपल्या 55 – 60 वर्षांतील पृथ्वीविरोधी वर्तनात आहे. त्यालाच ‘विकास’ नाव आहे. आज जागतिक तापमान वाढ अपरिवर्तनीय झाली आहे आणि पॅरिस करारातील मानवजात वाचवण्याची मर्यादा असलेली पृथ्वीच्या सरासरी तापमानातील 2 अंशाची वाढ ऑगस्ट 2020 मध्ये झाली आहे, तरी मानसिक भ्रमातून आधुनिक माणूस बाहेर पडू इच्छित नाही. त्यामुळे जागतिक जल, वन, पर्यावरण, हवामान, वसुंधरा असे वेगवेगळे दिन साजरे करण्यात काही अर्थ नाही. आजघडीला आपण मानवकेंद्री विचारपद्धती सोडून पृथ्वीवरील एक सजीव म्हणून जीवनकेंद्री, पृथ्वीकेंद्री विचार केला पाहिजे. तरच मानवजात योग्य आकलन व निष्कर्षाप्रत येऊन स्वतःची फसवणूक व त्यातून पृथ्वीवरून होणारे आपले उच्चाटन थांबवेल, अशी आशा करू.

अ‍ॅड. गिरीश राऊत, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ

Back to top button