अर्थवार्ता | पुढारी

अर्थवार्ता

गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकामध्ये अनुक्रमे एकूण 15.20 अंक व 167.22 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक अनुक्रमे 19653.5 अंक व 65995.63 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 0.08 टक्क्यांची तर सेन्सेक्समध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली. सर्वाधिक वाढ होणार्‍या समभागांमध्ये वेदांता (6.56 टक्के), बजाज फिनसर्व्ह (4.40 टक्के), लार्सन अँड टुब्रो (4.34 टक्के), बजाज फायनान्स (4.22 टक्के), टायटन (2.96 टक्के) यांचा समावेश होतो. सर्वाधिक घट होणार्‍या समभागामध्ये इंडियाबुल्स हौसिंग (-8.56 टक्के) टेक महिंद्रा (-5.57 टक्के), मारुती सुझुकी (-3.55 टक्के), एशियन पेंटस् (-3.21 टक्के), ओएनजीसी (-3.00 टक्के) या कंपन्यांच्या समावेश होतो. या सप्ताहात बाजारावर प्रामुख्याने रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा बैठकीचा प्रभाव पाहायला मिळाला. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट स्थिर ठेवण्याची घोषणा होताच अखेरच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी निफ्टी 110 अंक (0.55 टक्के) तसेच सेन्सेक्स 360 अंक (0.55 टक्के) वधारला. रेपो रेट कायम राहिल्याने गृह कर्जाचे दर स्थिर राहून घरांची विक्री वाढेल, या आशेने या क्षेत्राची संलग्न निफ्टी रियालिटी ‘इंडेक्स’ सर्वाधिक म्हणजे 3.08 टक्के वधारला. सलग तिसर्‍या वेळेस रिझर्व्ह बँकेने रेपो रेट 6.5 टक्क्यांवर स्थिर ठेवले आहेत.

डिस्ने हॉटस्टार, ‘वॉल्ट डिस्ने’ची भारतातील उपकंपनी भारतातील आपला उद्योग विक्री करण्यासाठी प्रयत्नशील. यासाठी अदानी उद्योग समूह तसेच सन टीव्हीचे दयानिधी मारन यांच्यासोबत चर्चा सुरू. व्यवसाय संपूर्ण विक्री करण्यासोबतच भागिदारी करण्याच्या पर्यायाची चाचणीदेखील डिस्ने हॉटस्टारकडून करण्यात येत आहे.

चालू आर्थिक वर्षात भारतातील किरकोळ महागाई दर 5.4 टक्क्यांवर राहण्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज. चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या सहामाहीत आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर सरासरी 85 डॉलर प्रतिबॅरलवर राहण्याचे भाकित.

सप्टेंबर महिन्यात सरकारला जीएसटीद्वारे 1 लाख 63 हजार कोटींचा महसूल प्राप्त झाला. मागील वर्षाची तुलना करता महसुलात 10 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली. आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या सहामाहीत दरमहा सरासरी 1 लाख 65 हजार कोटींप्रमाणे 6 महिन्यात एकूण 9 लाख 93 हजार कोटी जीएसटी सरकार जमा झाला. मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीची तुलना करता जीएसटी महसुलात 11 टक्क्यांची वाढ झाली.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारतीय कंपन्यांनी एकूण 26 हजार कोटींचा निधी आयपीओच्या माध्यमातून उभा केला. मागील वर्षी याच कालावधीत 36 हजार कोटींचे आयपीओ भारतीय भांडवल बाजारात आले होते. यावर्षी आलेल्या 26 हजार कोटींच्या आयपीओमध्ये सप्टेंबर या केवळ एका महिन्यात 12 हजार कोटींच्या आयपीओंची नोंदणी झाली.

वेदांता कंपनी आपल्या पोलाद उत्पादन क्षेत्रातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नशील. 2018 मध्ये इएसएल स्टील नावाची कंपनी वेदांताने 5230 कोटींना विकत घेतली होती. वेदांता कंपनीवर सुमारे 6.4 अब्ज डॉलर्सने कर्ज आहे. यापैकी 1 अब्ज डॉलर्स (सुमारे 8,300 कोटी) कर्जाची परतफेड रोखेधारकांना पुढील वर्षी जानेवारीत करायची आहे. त्यानंतर आठच महिन्यात पुन्हा 500 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 4200 कोटी) परतफेड करणे आहे. या सर्व कारणांमुळे कर्जभार कमी करण्याच्या द़ृष्टीने आणि रोखेधारकांना वेळेत परतावा देण्यासाठी वेदांता आपली स्टील उद्योगाची मालमत्ता विकत आहे.

टाटा उद्योगसमूह टाटा प्ले नावाच्या आपल्या उपकंपनीतील हिस्सा पूनर्खरेदीसाठी प्रयत्नशील. टाटा प्ले कंपनीमध्ये सिंगापूरच्या ‘टेमसेक’ या गुंतणूकदार कंपनीचा 20 टक्के हिस्सा असून या हिस्सा खरेदीसाठी टाटा समूह उत्सुक आहे. टाटा प्लेचे सध्याचे बाजार मूल्य 1 अब्ज डॉलर्सपर्यंत असल्याचे तज्ज्ञांचे मत. यापूर्वी मे महिन्यात टाटा प्ले कंपनीला आयपीओद्वारे भांडवलबाजारात उतरण्याची ‘सेबी’कडून संमतीदेखील मिळाली आहे. म्हणूनच आयपीओ हिस्सा स्वतः जवळ असावा, यासाठी प्रयत्न करत आहे.

‘ जेपी मॉर्गन इमर्जिंग मार्केट इंडेक्स’ फंडमध्ये भारताच्या रोख्यांचा (बाँडस्) समावेश झाल्याने भारतात सुमारे 23 अब्ज डॉलर्स (सुमारे 1 लाख 90 हजार कोटी रुपये) परदेशी गुंतवणूक निधी येण्याचा अंदाज असल्याचे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. सरकारच्या रोख्यांमध्ये हा अधिकचा निधी आल्यास सरकारला चालू खात्यातील तूट (करंट अकाऊंट डेफिसिट) कमी करण्यास मदत होईल.

भारत आणि ब्रिटन लवकरच मुक्त व्यापार करार अमलात आणण्याची शक्यता. या करारामधील दोन्ही बाजूंचे आक्षेप व शंका यांचे समाधान झाल्याने या करारावर ऑक्टोबरअखेर उद्योगांना ब्रिटनची बाजारपेठ खुली होणार असून ब्रिटनदेखील भारताच्या पायाभूत क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची शक्यता निर्माण होणार आहे.

दावा न केलेल्या ठेवींच्या शोधासाठी रिझर्व्ह बँकेकडून UDGAM (Unclaimed Deposits Gateway to Access Information) या पोर्टलची सुविधा कार्यरत. 17 ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या या पोर्टलवर सुरुवातीला 7 बँका होत्या. टप्प्याटप्प्यांनी यात वाढ होऊन 28 सप्टेंबरपर्यंत एकूण 30 बँकांना या पोर्टलशी जोडण्यात आले. यामध्ये एकूण 35 हजार कोटींच्या दावा न केलेल्या ठेवी बँकांकडे असून त्या रिझर्व्ह बँकेकडे हस्तांतरित झाल्या.

ईशा अंबानी यांची कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचरमध्ये ‘अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अ‍ॅथॉरिटी’ 4966.80 कोटींची गुंतवणूक करणार. यामुळे रिलायन्स रिटेलचा 0.59 टक्के हिस्सा ‘अबुधाबी इन्हेंस्टमेंट अ‍ॅथॉरिटी’ खरेदी करणार असल्याचे समजते. या व्यवहारानुसार रिलायन्स रिटेलचे सध्याचे बाजारमूल्य 8 लाख 38 हजार कोटी आहे. (इक्विटी व्हॅल्यू) भांडवलबाजार मूल्यानुसार रिलायन्स रिटेल देशातील सर्वात मोठी चौथ्या क्रमांकांची कंपनी बनली.

अबुधाबीचा गुंतवणूकदार उद्योग समूह ‘इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी’ (आयएचसी) अदानी एंटरप्राईझेस कंपनीमध्ये 14 हजार कोटींच्या गुंतवणुकीद्वारे हिस्सा वाढवणार. यामुळे इंटरनॅशनल होल्डिंगचा अदानी एंटरप्राईझेसमधील हिस्सा 5 टक्क्यांपेक्षा अधिक होणार.

अमेरिकेची ‘एक्सॉन मोबिल’ ही तेलशुद्धीकरण व नैसर्गिक वायूसंबंधित क्षेत्रातील कार्यरत कंपनी प्रतिस्पर्धी कंपनी ‘पायोनियर नॅचरल रिर्सोसेस’ला 60 अब्ज डॉलर्सला (सुमारे 5 लाख कोटी रुपये) खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील. एक्सॉन मोबिलचे सध्याचे बाजारमूल्य 436 अब्ज डॉलर्स आहे. एक्सॉन मोबिल अमेरिकेतील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी आहे.

29 सप्टेंबर रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी 3.794 अब्ज डॉलर्सने घटून 586.908 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.

Back to top button