दक्षता : क्रेडिट हिस्ट्रीचे महत्त्व… | पुढारी

दक्षता : क्रेडिट हिस्ट्रीचे महत्त्व...

अपर्णा देवकर :  कोरोनाच्या काळात बहुतांश लोकांचे रोजगार हिरावले गेले आणि व्यवसाय ठप्प पडला. मोठ्या संख्येने कर्जखाते बुडीत झाले. परिणामी, बँकांच्या एनपीएत वाढ झाली म्हणून बुडीत कर्जापासून बँकेचे संरक्षण व्हावे यासाठी क्रेडिट हिस्ट्री चांगली असणार्‍या लोकांना बँकांकडून कर्ज देण्यात प्राधान्य दिले जात आहे. यामुळे कर्जवसुली नियमित आणि वेळेवर होईल, अशी बँकेला अपेक्षा आहे. आपल्यालाही कर्ज हवे असेल, तर ‘क्रेडिट हिस्ट्री’ चांगली राहण्याबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे.

कर्ज व संबंधिताची क्रेडिट हिस्ट्री

बँकेकडून ग्राहकांना कर्ज देण्यापूर्वी संबंधिताची क्रेडिट हिस्ट्री उपलब्ध करून देण्याचे काम सिबीलकडून केले जाते. याशिवाय काही वर्षांपूर्वी आरबीआयच्या परवानगीनंतर एक्स्पेरियन, हायमार्क आणि इक्‍विफॅक्स यांसह अन्य संस्थांनी क्रेडिट स्कोअर देण्याची सेवा सुरू केली. अर्थात, या संस्थांनी सेवा देऊनही डिफॉल्टर कर्जदाराची संख्या मात्र वाढत गेली आणि एनपीएचा धोकाही बळावला. या संस्था प्रत्येक खातेधारकाची आणि पॅनधारकांची संपूर्ण क्रेडिट हिस्ट्री बाळगतात आणि एखाद्या बँकेने त्याची मागणी केल्यास ती माहिती उपलब्ध करून देतात. या प्रक्रियेचा बँकांना थोडाफार फायदा झाला आहे.

आर्थिक ताळेबंद चांगला ठेवा

क्रेडिट स्कोअर उपलब्ध करून देणार्‍या संस्थांकडून वाहन कर्ज, गृहकर्ज, वैयक्‍तिक कर्ज आणि क्रेडिट कार्डच्या आधारे मिळणारे कर्ज यावर लक्ष ठेवले जाते. या आधारावर ग्राहकाच्या आर्थिक वर्तनाचे आकलन होते. आतापर्यंत केवळ कर्जाच्या व्यवहारावर या संस्थांचे लक्ष असायचे; परंतु आता मोबाईल बिल, अन्य बिल, भाडे भरणा आदींच्या व्यवहारावरदेखील लक्ष ठेवले जाते. अनेक मोबाईल सेवा कंपन्यांदेखील या संस्थांची मदत घेत आहेत.

क्रेडिट हिस्ट्रीत काय असते?

क्रेडिट हिस्ट्रीत कोणत्याही व्यक्‍तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, वय, पॅन, पासपोर्ट आदींचा उल्लेख असतो. क्रेडिट स्कोअर तपासणार्‍या संस्था या बँकेच्या शाखेत जाऊन व्यवहार किंवा ऑनलाईन ट्रान्झेक्शन करणार्‍या ग्राहकांचा आर्थिक स्वभाव जाणून घेतात. या आधारावर संबंधित बँकांना कोणत्या व्यक्‍तीला कर्ज द्यावे आणि कोणत्या व्यक्‍तीला नाही, याबाबतचा निर्णय घेणे सोयीचे जाते.

चांगल्या क्रेडिट स्कोअरचे लाभ

क्रेडिट स्कोअरच्या आधारे कर्ज दिले जात असल्याने बँकेतून कोणतेही कर्ज मिळणे तुलनेने सोपे राहिलेले नाही. एखाद्या व्यक्‍तीचा क्रेडिट स्कोअर चांगला नसेल, तर त्याला भविष्यात कर्ज मिळवताना अडचणी येऊ शकतात. दुसरीकडे, एखाद्याची क्रेडिट हिस्ट्री चांगली असेल तर बँकांकडून अशा मंडळींना कर्ज देताना प्राधान्य दिले जाते.

क्रेडिट स्कोअर चांगला नसला तरी कर्ज मिळते

क्रेडिट स्कोअर चांगला नसेल तर कर्ज मिळणार नाही, असा काही नियम नाही. अनेकांचा क्रेडिट स्कोअर कोणत्या ना कोणत्या कारणाने खराब राहू शकतो. अशा प्रकरणात बँका लिक्‍विड गॅरंटी जसे की इन्श्युरन्स पॉलिसी, बाँड या कागदपत्रांची हमी म्हणून मागणी करतात.

काही गोष्टी लक्षात ठेवा

क्रेडिट स्कोअर चांगला राहण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आर्थिक व्यवहार चांगले राहणे गरजेचे आहे. ऑनलाईन व्यवहार आणि हप्‍ता भरणा यात कोणताही विलंब नसावा. यात अडचणी आल्यास क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकते. त्याचबरोबर कर्ज
फेडल्यानंतर क्रेडिट हिस्ट्री बाळगणार्‍या संकेतस्थळावर आपले रेकॉर्ड अपडेट झाले आहे की नाही, हे तपासून पाहिले पाहिजे. अनेकदा बँकांकडून कर्जफेडीची माहिती वेळेत दिली जात नाही. म्हणून बँकेकडून कर्जफेडीची माहिती क्रेडिट स्कोअरची सेवा देणार्‍या संस्थांना दिली गेली नसेल, तर ती माहिती संबंधित संस्थेला पुरवण्याबाबत तुम्ही बँकेला मागणी करू शकता.

Back to top button