पन्नाशीनंतरचे आर्थिक नियोजन | पुढारी

पन्नाशीनंतरचे आर्थिक नियोजन

आपण कुटुंबप्रमुख फक्त कुटुंबाच्या गरजा पुरविण्यात, त्यांना आनंदी ठेवण्यासाठी धडपडत आलो. आज पन्नाशीच्या उंबरठ्यावर आल्यावर वृद्धापकाळ येण्याचे संकेत मिळत आहेत. मग रिटायरमेंटसाठी तरतूद करण्याचा विचार मनात सुरू होत आहे, अशा वेळी काय नियोजन असावे? किंवा रिटायरमेंटनंतर किती पैसा हवा, याची आकडेमोड करण्याची गरज भासत असते.

आपण सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केलात, ही फार मोठी आनंदाची बाब आहे. तरुणाईची संध्याकाळ अन् वृद्धापकाळाची चाहूल अशा आयुष्याचा महत्त्वाच्या टप्प्यावर तुम्ही पोहोचला आहात, ही फार मोठी गोष्ट आहे. आयुष्याच्या या टप्प्यावरून मागे वळून पाहिले असता, एकेकाळी आपण स्वतंत्र होता. हातात लग्नाची बेडी पडली, दोन हाताचे चार हात झाले. त्याचे रूपांतर त्रिकोणी-चौकोनी-पंचकोनी-षट्कोनी अशा वेगवेगळ्या कोनांत कुटुंबाची निर्मिती झाली. आपण कुटुंबप्रमुख फक्त कुटुंबाच्या गरजा पुरविण्यात, त्यांना आनंदी ठेवण्यासाठी धडपडत आलो. आज पन्नाशीच्या उंबरठ्यावर आल्यावर वृद्धापकाळ येण्याचे संकेत मिळत आहेत. मग रिटायरमेंटसाठी तरतूद करण्याचा विचार मनात सुरू होत आहे, अशा वेळी काय नियोजन असावे? किंवा रिटायरमेंटनंतर किती पैसा हवा, याची आकडेमोड करण्याची गरज भासत असते.

आज पन्नाशीच्या आसपास आलेले जे लोक आहेत, त्यांची करिअरची सुरुवात 25 ते 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. यामध्ये तीन प्रकारच्या वृत्तीचे लोक दिसतात. खालील तिन्ही वृत्तीच्या लोकांची आर्थिक अवस्था वेगवेगळी पाहावयास मिळते.

1) बचतीला महत्त्व न दिलेले लोक : या वृत्तीचे लोक आजच मिळवा अन् आजच खर्च करा, कशाला उद्याची बात, या विचाराने जातात. ही वृत्ती जोपासल्याने बचतीला महत्त्व दिले जात नाही. पैसा शिल्लक राहत नाही. मोठे खर्च आले की, ‘तहान लागली की आता काढ विहीर’ अशी अवस्था असते. ज्यावेळी मोठे खर्च आलेत, त्यावेळी त्या कुटुंबप्रमुखांना कर्ज, उधारी, उसनवारी घेऊन पैशाची गरज भागवावी लागते. अशा वृत्तीच्या लोकांची आयुष्याच्या शेवटपर्यंत कर्जातून सुटका होत नाही. सतत पैशासाठी काम करावे लागते. मरेपर्यंत काम करावे लागते आणि काम करूनही कधीच पैसा शिल्लक राहत नसतो. यामुळे वृद्धापकाळातही काही ना काही काम करावेच लागत आहे. किंवा दुसर्‍याच्या उत्पन्नावर अवलंबून राहावे लागते.

2) बचतीला महत्त्व दिलेले लोक : करिअर सुरू झाल्यापासून बचतीला महत्त्व दिले आहे. त्याच्या आयुष्यातील 25 वर्षांचा आढावा घेतला, तर अनेकांनी पारंपरिक पद्धतीने गुंतवणूक केले आहेत. बचत खाते, बँक मुदतठेव, दरमहा रिकरिंग, पोस्ट, एनएससी, किसान विकासपत्र, इन्डोमेंट विमा योजनामधून केलेली आढळते. पूर्वी नोकरी लागली की, जवळची मंडळी पहिल्यांदा आयुर्विम्याची पॅालिसी घ्यायला सांगत असत. अशा योजनांची सध्या मुदत संपत आहे. वीस-पंचवीस वर्षे हप्ते भरून मुदतीनंतर बोनससहित रक्कम मिळते. या योजनेचा परतावा अवघे पाच ते सहा टक्के इतका मिळाला आहे. जिथे महागाई आठ-दहा टक्क्यांनी वाढलेली दिसते आहे अन् पैसा पाच-सहा टक्क्यांनी वाढला आहे. हे शहाणपण वीस वर्षे हप्ते भरल्यानंतर मिळाले आहे.

अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून, बचतीच्या माध्यमातून छोटीसी पुंजी पन्नाशीला जमा झालेली दिसते. अशा व्यक्तींना 20 ते 25 वर्षे बचत करूनही वाढलेल्या खर्चाला पैसा कमी पडत असल्याचे आपणास चित्र पाहावयास मिळते. याचे मूळ कारण आहे, वाढणारी महागाई; जी कधीच थकली नाही. अन् पैसा माझा कधी महागाईवर मात करत नाही. पुरेसा पैसा कधीच या लोकांकडे नसतो.

3) गुंतवणुकीत शहाणपण दाखविलेले लोक : मागील वीस-पंचवीस वर्षांत ज्यांनी करिअरच्या सुरुवातीपासून बचत आणि गुंतवणूक याची माहिती घेऊन, भांडवली बाजाराचा अभ्यास करून सातत्याने गुंतवणूक केली आहे, त्यांच्याकडे फार मोठा पैसा जमा झाला आहे, असे लोक गुंतवणुकीची समज असणारे ज्ञानी असतात आर्थिक नियोजनाला महत्त्व देतात. कारण मागील पंचवीस वर्षांत आपल्या देशाचा भांडवली बाजाराने 16% अधिक परतावा दिला आहे. जरी महागाई सात-आठ टक्क्यांनी वाढलेली असली, तरी त्यावर मात करून आठ-दहा टक्क्यांनी त्यांचा पैसा वाढलेला पाहावयास मिळतो. पन्नाशीनंतर पुरेसा फंड तयार होतो, अशा लोकांचा रिटायरमेंटसाठी पुरेसा पैसा उभा राहतो. आणि भांडवली बाजारामध्ये गुंतवणूक केल्याने त्यांचा पैसा त्यांच्यासाठी काम करीत असतो. पैशासाठी त्यांना काम करावे लागत नाही.

आपण कोणत्या वृत्तीमध्ये आहात, ते निरीक्षण करा. गुंतवणुकीचे शहाणपण घ्या व आपल्या वृद्धापकाळाचे नियोजन करा. हीच वेळ आहे… आपल्या रिटायरमेंटचे योग्य नियोजन करण्याची. भविष्यातील वृद्धापकाळातील खर्चाचा अंदाज घ्या. रिटायरमेंटकाळ किमान वीस ते पंचवीस वर्षे आनंदात जाण्यासाठी वेळीच जागे झालो नाही, तर वृद्धापकाळी आर्थिक परिस्थिती गंभीर निर्माण होऊ शकते. खालील मुद्द्यांची वेळीच दखल घेऊन उपाययोजना केली पाहिजे.

गरजेपुरती बँक खाती ठेवा : अनेक वेळा वेगवेगळ्या कारणांनी अनेक ठिकाणी बँकेत खाती उघडली जातात. त्याची नोंद कुठेच नसते. आपल्या गरजेपुरती बँक खाती ठेवावीत. बाकीची खाती बंद करावीत. जी खाती कायमस्वरूपी हवी असतील, ती खाती पती अन् पत्नीच्या नावाने संयुक्त असावीत. आपल्या पश्चात आपली रक्कम त्यांना सहजपणे मिळाली पाहिजे, याची काळजी वेळीच घेतली पाहिजे.

संपत्तीचे नियोजन करा : काहीवेळा आपली संपत्ती वाडवडलार्जित असते. ती रीतसर आपल्या नावाने करून घेतली पाहिजे व काहीवेळा अनेकजण भागीदारीमध्ये गुंतवणूक करतात, त्याबाबत स्पष्टता हवी. आपली एकूण संपत्ती किती आहे? अचल संपत्ती आणि चलसंपत्ती किती आहे? त्याचा आराखडा तयार केला पाहिजे आणि आपल्या पश्चात कोणती संपत्ती कोणाला हस्तांतरित करायची आहे, त्याबाबत इच्छापत्र केले पाहिजे. चलसंपत्ती म्हणजे कागदावरील गुंतवणूक असते. अशा ठिकाणी वारसदारांची नोंद करणे गरजेचे असते. आणि वारसांना आपली गुंतवणूक माहिती असणे गरजेचे आहे. राहते घर आणि रोखीची संपत्ती शक्यतो आपल्या पत्नीला मिळाली पाहिजे, याची काळजी घ्यावी.

शैक्षणिक कर्जाचा आधार घ्या : पन्नाशीच्या उंबरठ्यावर मुलांचे शिक्षण आणि लग्न या दोन्ही गोष्टींसाठी मोठा पैसा लागतो. अशा वेळी भावनिक होऊन आपल्याजवळची बचत खर्च करतो आणि रिटायरमेंटसाठी रिकामे राहतो. मुले शिक्षण घेऊन नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी जातात. नोकरीनंतर मुले एकटी असतात, तेव्हा आई-वडिलांना पैसे देतात. नंतर लग्न झाले की त्यांचा संसार चालू होतो. मग त्यांच्या गरजा वाढत जातात. होम लोन, कार लोन, पर्सनल लोन असे ईएमआय चालू होतात. नेमके त्याचवेळी आई-वडिलांचे वय वाढल्याने वैद्यकीय खर्च वाढलेला असतो. आणि आई-वडील वृद्धापकाळी रिकामे बसलेले आम्ही पाहतो आहोत. पैशाचा ताळमेळ बसत नाही, मग आई-वडिलांच्याकडे दुर्लक्ष होते.

ज्या मुलांच्यासाठी आयुष्यभरासाठी झटलो, तीच आपणास पाहत नाहीत अन् स्वतःकडे काही नाही, ही खंत वाटून हतबल होऊन जगावे लागते. असे प्रसंग आपल्यावर येऊ नयेत म्हणून मुलांना शिक्षणासाठी शैक्षणिक कर्जाचा आधार घ्या. जेणेकरून नोकरीनंतर ते स्वतः कर्जाची जबाबदारी स्वीकारून त्याच्यासाठी केलेला खर्च स्वतः फेड करतील. आणि आपला पैसा वृद्धापकाळासाठी शिल्लक राहील.

आपला पोर्टफोलिओ तयार करा : रिटायरमेंटसाठी अजून दहा वर्षे वेळ आहे, तर तुम्ही चांगले शेअर्स म्युच्युअल फंडामध्ये जोखीमयुक्त पोर्टफोलिओ तयार करावे. जेणेकरून आपल्या गुंतवणुकीने वाढत्या महागाईवर मात करता येईल आणि पुढच्या दहा वर्षांत चांगला फंड निर्माण होईल.

अनेक मार्गांनी उत्पन्न निर्माण करा : आलेल्या पैशाच्या गुंतवणुकीचे नियोजन करा. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड स्थावर मालमत्तांमध्ये गुंतवणूक करून व्याज, लाभांश, भाडे, भांडवली उत्पन्न अशा अनेक मार्गांनी गुंतवणुकीवरील उत्पन्न कसे येईल याची तरतूद करा. जेणेकरून साठ वर्षांनंतर रिटायरमेंटनंतरही आपले उत्पन्न नियमितपणे येत राहील, तरच आपल्या चांगले राहणीमान जगता येईल. वाढत्या महागाईनुसार खर्च कसा वाढत राहणार आहे. तसाच आपले उत्पन्नही वाढले पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी आपणास वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करून वेगवेगळ्या मार्गाने कसे उत्पन्न मिळेल याचे नियोजन करणे गरजेचे आहे.

रिटायरमेंटसाठी पूर्वतयारी करण्यासाठी अजून दहा-पंधरा वर्षे अवधी शिल्लक आहे. आपणास मोठी तयारी का करावी लागणार आहे, याची कारणे खालीलप्रमाणे आहेत.

एकत्र कुटुंब पद्धतीचा र्‍हास : सध्याच्या कुटुंब व्यवस्थेमध्ये बदल होत आहेत. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आई- वडिलांची वृद्धापकाळाची जबाबदारी मुले घेत होती. सध्या एकत्र कुटुंब पद्धतीचा र्‍हास होत असून, आपली मुले दूरवर नोकरीला असल्याने आपली पालन-पोषणाची जबाबदारी ती घेऊ शकत नाहीत. अजून दहा वर्षांनी मुलगा एका देशात, सून दुसर्‍या देशात, नातू तिसर्‍या ठिकाणी असे चित्र पाहावयास मिळणार आहे. त्यामुळे स्वत:च्या रिटायरमेंटनंतरच्या जबाबदारीचे स्वतःच नियोजन करणे गरजेचे आहे.

वाढती महागाई : आपला देश विकसनशील देशातून विकसित देशाकडे वाटचाल करत असताना महागाई प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, आणि यावर मात करण्यासाठी आपल्याकडे गुंतवणुकीचे नियोजन असणे गरजेचे आहे. त्यासाठी पुरेसा पैसा असणे गरजेचे आहे. वाढती महागाई ही फार मोठी गंभीर बाब आहे. आणि राहणीमानातील महागाई, शिक्षण क्षेत्रातील महागाई अन् वैद्यकीय क्षेत्रातील महागाई ही प्रचंड प्रमाणात वाढत आहे. याचा आढावा आपण घेतला पाहिजे.

कमी होणारे व्याजदर : पंधरा-वीस वर्षांपूर्वी आपल्या देशात 10% ते 12% व्याजदर मिळत होता. आता तो 5 ते 6% टक्क्यांवर आलेला आहे. जे पंधरा वर्षांपूर्वीच्या व्याजावर जगत आहेत, त्यांची फार मोठी पंचायत झालेली पाहावयास मिळत आहे. वीस वर्षांत खर्च तीन पटीने वाढला आहे अन् उत्पन्न निम्म्यावर आले आहे. भविष्यातही असेच व्याजदर कमी होणार आहेत, त्यामुळे आपल्या गुंतवणुकीवर व्याजाचे उत्पन्न कमी प्रमाणात मिळणार आहे, याची जाणीव ठेवून मोठा फंड निर्माण करण्याची गरज आहे

वैद्यकीय क्षेत्रातील वाढता खर्च : आयुष्याच्या संध्याकाळी शरीराची झीज झाल्याने शरीर साथ देत नसते. अनेक प्रकारच्या छोट्यामोठ्या आजारपणांना सोबत घेऊन जगावे लागत आहे. दैनंदिन जीवनामध्ये औषध उपचाराचा खर्च वाढत असतो. नियमितपणे तपासणी आणि मोठ्या आजारपणावर मोठ्या प्रमाणात खर्च होताना दिसतो. त्यासाठी आपल्याकडे पुरेशी आर्थिक तरतूद असायला हवी, ज्याचा आपण कधी विचार केलेला नसतो. काही वेळा आजारपणामध्ये आपली सेवा करण्यासाठी केअर टेकर ठेवावा लागतो. अशा वेळी मोठा पैसा लागतो. जर तुम्हाला आयुष्याची संध्याकाळ निवांत हवी असेल, तर आताच जागरूक राहून पन्नाशीच्या उंबरठ्यावर वरील गोष्टींचा विचार करून आर्थिक नियोजन करण्याची गरज आहे. चांगल्या सल्लागारासोबत बसून आर्थिक नियोजन करावे. आपल्या सध्याच्या खर्चानुसार किती रिटायरमेंट फंडाची गरज भासेल, याची आकडेमोड पुढील भागात आपण पाहणार आहोत.

अनिल पाटील
प्रवर्तक, एस. पी. वेल्थ, कोल्हापूर

Back to top button