निर्दोष प्राप्तिकर विवरणपत्र फाईल करण्यासाठी टिप्स | पुढारी

निर्दोष प्राप्तिकर विवरणपत्र फाईल करण्यासाठी टिप्स

अर्चित गुप्ता

आर्थिक वर्ष 2017-18 साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अधिसूचना या महिन्याच्या सुरुवातीलाच जारी झाली आहे. आयटीआर एकसाठी योजना जाहीर झाली आहे आणि अन्य आयटीआरसाठीही लवकरच योजना जाहीर होणे अपेक्षित आहे. एकूण काय, तर प्राप्तिकर रिटर्न्स फाईल करण्याचा हंगाम आला आहे.

बहुतेक व्यक्तींसाठी आर्थिक वर्ष 2017-2018 साठी प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्याची मुदत आता 31 ऑगस्ट 2018 ही आहे आणि एकूण उत्पन्न 2.50 लाखांहून अधिक असलेल्या सर्वांना विवरणपत्र भरणे सक्तीचे आहे. ही मर्यादा ज्येष्ठ नागरिकांसाठी (वय 60 आणि अधिक) 3 लाख, तर अति ज्येष्ठ नागरिकांसाठी (वय 80 आणि अधिक) 5 लाख आहे.

नेहमीप्रमाणे विवरणपत्रे ही अचूक आणि निर्दोष भरली गेली पाहिजेत. प्राप्तिकर विभागाच्या बेंगळुरू येथील सीपीसीने अर्थात मध्यवर्ती प्रक्रिया केंद्राने करदात्यांसाठी  सावधगिरीचा सल्ला जारी केला आहे. हा विशेषत: वेतनदार वर्गासाठी असून प्राप्तिकर विवरणपत्रात चुकीची माहिती दिल्यास शिक्षात्मक परिणामांचा इशारा त्यांना देण्यात आला आहे. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, चुकीची माहिती दिल्याबद्दल असलेल्या दंडाच्या कायद्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही; पण तरीही असे निर्देश आल्यामुळे विवरणपत्र भरताना कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला परवडणारे नाही, याचा आढावा घेणे अत्यावश्यक झाले आहे. तुम्ही उत्पन्नाचे विवरणपत्र वेळेत भरली काय, याची खात्री करा. यापूर्वीच चर्चा केल्याप्रमाणे तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या मूलभूत मर्यादेहून अधिक असेल, तर तुम्ही प्राप्तिकर विवरणपत्र निश्‍चित भरले पाहिजे. विवरणपत्र भरण्यात विलंब झाल्यास कलम 234 एफ खाली 10,000 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.

फॉर्म 16 चा वापर

आयटीआर वनने अलीकडे आर्थिक वर्ष 2017-18साठी अधिसूचित केले आहे की, तुमच्या वेतनाद्वारे प्राप्त उत्पन्नाची फोड द्यावी लागणार आहे. त्यामुळे सर्व तपशील पुरवण्यासाठी तुम्हाला फॉर्म 16 वर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागेल, अशी शक्यता आहे. खरे तर कर भरण्याच्या प्लॅटफॉर्म्समध्ये एक पर्याय असा आहे, जेथे तुम्ही तुमचा फॉर्म 16 अपलोड करू शकता आणि त्यातील विवरणपत्रासाठी आवश्यक असलेले सर्व तपशील स्वयंचलितरित्या विवरणपत्रात भरले जातात. यामुळे चुकांची शक्यता कमीत कमी होते किंवा नाहीशीही होते. शिवाय, तुम्हाला टॅन किंवा एम्प्लॉयरचे अन्य तपशील अचूक भरण्याचा ताणही राहत नाही. कारण, हे सर्व तपशील आपणहूनच भरले जातात.

फॉर्म 26 एएसचा वापर प्राप्तिकराच्या पोर्टलवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असलेला फॉर्म 26 एएस हेही विवरणपत्र फाइल करताना तुम्हाला मदत करेल, असे महत्त्वाचे कागदपत्र आहे. या फॉर्ममध्ये तुमच्या उत्पन्नाच्या स्रोतांमधून कापल्या गेलेल्या कराचे तपशील दिलेले असतात. मग, ते वेतन असो, व्याज असो किंवा व्यावसायिक पावत्या असोत. त्यामुळे एकीकडे तुम्ही तुमच्या फॉर्म 16 मध्ये दिसणारा टीडीएस फॉर्म 26 एएसच्या मदतीने पडताळून बघू शकता. शिवाय, हा फॉर्म तुम्हाला तुम्ही विवरणपत्रात उल्लेख करणे आवश्यक आहे अशा अन्य उत्पन्नाचेही तपशील मिळवण्यात मदत करतो आणि त्यावरील टीडीएसच्या जमा रकमेवर दावा सांगण्यातही मदत करतो. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवा की, टीडीएस कापला जातो तो बचत खात्यातील रकमेवर मिळणार्‍या व्याजातून आणि म्हणून तुम्ही हे उत्पन्न तुमच्या विवरणपत्रात उघड केले आहे याची खात्री करण्यास विसरू नका. 80 टीटीए कलमानुसार तुम्हाला उपलब्ध असलेल्या 10,000 रुपयापर्यंतच्या वजावटीवर तुम्ही दावा केला असल्याने, त्यावर काहीच कर देय नसला तरीही कर विवरणपत्र भरताना तुम्ही त्याचा उल्लेख केला पाहिजे.

विवरणपत्रात योग्य त्या करमाफीवर दावा करणे

आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये तुम्ही कदाचित कर वाचवणार्‍या काही साधनांमध्ये गुंतवणूक केली असेल आणि त्यामुळे तुम्हाला कलम 80 सी अंतर्गत करकपातीचा दावा करण्याची मुभा मिळाली असेल. केलेल्या गुंतवणुकीच्या प्रमाणातच वजावटीवर दावा सांगितला जात आहे, याची खातरजमा करा आणि या गुंतवणुकींचा पुरावाही तयार ठेवा. प्राप्तिकर अधिकार्‍यांनी नंतर विचारणा केली, तर तुमच्याजवळ तो पुरावा असणे आवश्यक आहे. लक्षात घेण्याजोगी आणखी एक बाब म्हणजे लीव्ह ट्रॅव्हल अलाउन्स आणि मेडिकल अलाउन्सखालील वजावटीला तुमच्या एम्प्लॉयरने फॉर्म 16 मध्ये परवानगी दिली नसेल, तर तुम्हाला विवरणपत्र भरताना त्याखाली वजावटीचा दावा करता येणार नाही.

तुमचे सर्व उत्पन्न उघड करा

तुम्ही फाइल करत असलेल्या प्राप्तिकर विवरणपत्रात तुमचे सर्व उत्पन्न उघड केले आहे, याची खात्री करा. तुम्ही वेतनदार व्यक्ती असाल आणि तुम्हाला अन्य व्यवसाय किंवा पेशापासून उत्पन्न असेल, तर तुमचे विवरणपत्र भरण्यासाठी योग्य तो फॉर्म निवडा. उदाहरणार्थ, आयटीआर 3 किंवा आयटीआर 4 (तुम्ही अग्रीम कराचा पर्याय निवडला असल्यास). जर तुम्ही आयटीआर 1 फॉर्मची निवड केली आणि अन्य व्यवसाय किंवा पेशातून तुम्हाला मिळणारे उत्पन्न उघड केले नाही, तर हे कायद्याच्या विरोधातील वर्तन आहे आणि यासाठी दंड होऊ शकतो.

तुम्हाला करमाफी मिळाली असेल, तरीही करमाफी मिळालेले उत्पन्नही उघड केले पाहिजे हे कायम डोक्यात ठेवा. भांडवली नफ्याबाबतही, व्यक्तीने ते उत्पन्न उघड केले पाहिजे आणि त्याच विवरणपत्रात माफीवर दावाही केला पाहिजे. उदाहरणार्थ, तुम्ही मालमत्तेची विक्री करत असाल आणि संपूर्ण उत्पन्न पुन्हा गुंतवून करमाफीवर दावा करत असाल, तर हेही विवरणपत्रात नमूद करा. म्हणजे तुम्हाला मालमत्तेच्या विक्रीमुळे टीडीएसवर केलेल्या दाव्याचे समर्थन करण्यातही मदत होईल.

बँक खात्याचे तपशील अचूक नमूद करा

तुम्हाला परतावा वेळेवर मिळायला हवा असेल, तर बँक खात्याचे तपशील म्हणजे आयएफएससी कोड, बँकेचे नाव, बँकेतील खाते क्रमांक अचूक देणे अत्यावश्यक आहे. आता, आयटीआर फॉर्म्समध्ये अनिवासी व्यक्तींनाही भारताबाहेरील बँक खात्यांचे तपशील देण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये आयबीएएन किंवा बँकेचा स्विफ्ट कोड दिला जातो. म्हणजे त्यांना थेट बँक खात्याद्वारे परतावा मिळू शकतो.

थोडक्यात सांगायचे तर, प्राप्तिकर खात्याने चुकीची माहिती विवरणपत्रात भरणार्‍या करदात्यांना गंभीर स्वरुपाच्या शिक्षात्मक परिणामांचा इशारा देणारा सल्ला जारी केला असला, तरी हा इशारा खर्‍या अर्थाने हेतूत: आकड्यांचा गोंधळ करणार्‍या, सत्य लपवणार्‍या, कर बुडवण्यासाठी गुंतवणूक व खर्च फुगवून सांगणार्‍या लोकांसाठी आहे.

विवरणपत्र भरण्यासाठी आवश्यक सर्व तपशील, कागदपत्रे जमवून स्वत:ला सज्ज ठेवा. म्हणजे, विवरणपत्र सादर करण्याचा अनुभव सोपा ठरेल आणि विवरणपत्र अचूक सादर होईल.

(संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी क्लीअर टॅक्स )

Back to top button