ज्येष्ठांना अधिक परतावा देणार्‍या योजना | पुढारी

ज्येष्ठांना अधिक परतावा देणार्‍या योजना

बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना जादा परतावा देणार्‍या अनेक गुंतवणूक योजना आहेत. मुदत ठेवी, रिकरिंग योजना यांचा समावेश आहे. याशिवाय केंद्र सरकारने ज्येष्ठांना अधिक लाभ देणार्‍या काही योजना लाँच केल्या आहेत. त्याचाही परतावा फायदेशीर ठरत आहे. यात सीनियर सिटीझन सेव्हिंग्ज स्कीम (एससीएसएस) आणि पंतप्रधान वयवंदन योजना (पीएमव्हीव्हीवाय) या योजनांचा प्रामुख्याने इथे उल्लेख करावा लागेल. आपणही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर 8.60 टक्क्यांपर्यंतचा परतावा गुंतवणूकदारांना मिळत आहे. अर्थात या दोन्ही योजनेत गुंतवणुकीसाठी केवळ ज्येष्ठ नागरिकच पात्र आहेत.

आरबीआयने 2019 मध्ये रेपो रेट दरात 1.35 टक्क्यांपर्यंत घट केली. त्यामुळे कर्ज स्वस्त झाले, परंतु दुसरीकडे गुंतवणुकीवर मिळणारा परतावा कमी झाला. त्याचा फटका ज्येष्ठांनाही बसला आहे. असे असले तरी सध्याच्या काळात चांगला परतावा देणारे आणि गुंतवणुक सुरक्षित ठेवणार्‍या काही योजना आहेत. या योजना ज्येष्ठांसाठी लाभदायक असून त्यांना या योजनेत सर्वसाधारण योजनेच्या तुलनेत अधिक परतावा मिळत आहे.

सीनियर सिटीझन सेव्हिंग्ज स्कीम आणि पंतप्रधान वय वंदन योजनामध्ये गुंतवणूक केल्यास ज्येष्ठ गुंतवणूकदारांना 8.60 टक्क्यांपर्यंत परतावा मिळत आहे. या योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादा प्रत्येकी पंधरा-पंधरा लाख आहे. 

सीनियर सिटीझन सेव्हिंग्स स्कीम

या योजनेत गुंतवणुकीसाठी किमान रक्कम 1 हजार रुपयेे, तर कमाल रक्कम 15 लाख रुपये आहे. हे खाते पाच वर्षात मॅच्युअर होते.वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्त होणारा कोणताही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकतो. या आधारावर एकल किंवा संयुक्‍त खाते सुरू करता येते. पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेत या योजना उपलब्ध आहेत. 

सध्याच्या काळात या योजनेवर 8.6 टक्के व्याजदर दिला जात आहे. अर्थमंत्रालयाकडून दर तीन महिन्याला या योजनेच्या व्याजाचा आढावा घेतला जातो. या आधारावर गुंतवणुकदाराच्या खात्यावर 1 एप्रिल, 1 जुलै, 1 ऑक्टोबर आणि 1 जानेवारी रोजी पैसा जमा केला जातो. 

या योजनेचा कालावधी पाच वर्षांचा आहे आणि त्यानंतर तीन वर्षे त्यास मुदतवाढ देता येते. जर आपण वेळेपूर्वीच खात्यातून रक्कम काढत असाल किंवा बंद करत असाल, तर आपल्याला शुल्क भरावे लागेल. मुदतवाढीच्या प्रकरणात मॅच्युरिटीच्या वेळी असणारे व्याजदर गुंतवणूकदारास लागू राहील. 

पंतप्रधान वय वंदन योजना

पंतप्रधान वय वंदन योजनेनुसार गुंतवणुकीची कमाल मर्यादा दुप्पट करण्यात आली असून ती आता पंधरा लाख रुपये आहे. या योजनेत गुंतवणुकीचा कालावधी हा दोन वर्षासाठी वाढला आहे. हा कालावधी 3 मे 2018 रोजी संपत होता. आता ती 31 मार्च 2020 ला संपत आहे.

पंतप्रधान वय वंदन योजनेत ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने नोंदणी करु शकतो. ऑनलाइन एनरॉलमेंटसाठी एलआयसीच्या संकेतस्थळावर जावे लागेल तर ऑफलाईनसाठी एलआयसी शाखेत जाणे गरजेचे आहे. 

या योजनेनुसार एकदाच एकरक्कमी पैसे भरावे लागतात. ही रक्कम किमान दीड लाख आणि अधिक पंधरा लाख रुपये असू शकतात. गुंतवणूकदाराला व्याजाची रक्कम एकरक्कमी किंवा पेन्शनच्या रुपाने मिळू शकते. हा पर्याय निवडण्याचा अधिकार गुंतवणूकदाराला राहिल.

* ही योजना दहा वर्षासाठी आहे.

* सध्या या योजनेवर 8 टक्के हमखास परतावा मिळत आहे. 

* तीन वर्षानंतर या योजनेनुसार कर्जाचीही सुविधा आहे.

Back to top button