नवीन कररचना जाणून घेताना… | पुढारी | पुढारी

नवीन कररचना जाणून घेताना... | पुढारी

सत्यजित दुर्वेकर

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नव्या अर्थसंकल्पात कमी कराची नवीन कररचना सादर केली आहे. नवीन कररचनेत एकूण सात स्लॅब असणार असून त्यात डिडक्शनचा लाभ मिळणार नाही.

नवीन अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करदात्यांसाठी करप्रणाली अधिक सुटसुटीत करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र काही बाबतीत ही प्रणाली किचकट मानली जात आहे. अर्थमंत्र्यांनी नवीन रचना आणून करदात्यांना गोंधळात टाकले आहे.

नवीन व्यवस्थेत वैयक्‍तिक करदात्यांसाठी कर कमी केले आहेत, मात्र त्यासाठी एकच अट घातली आहे, ती म्हणजे टॅक्स डिडक्शन सोडून देणे होय. दुसरीकडे हायर स्लॅब रेटस परंतु टॅक्स डिडक्शन बेनिफिट देणारी दुसरी जुनी कर व्यवस्था चालू ठेवू शकता. तरीही कोणती व्यवस्था निवडावी यावरून करदाते संभ्रमात आहेत. याचे आपण अधिक विस्ताराने आकलन करू. 

नवीन व्यवस्था अडीच लाखांपर्यंत कोणताही कर नाही.

 अडीच ते पाच लाखांपर्यंत पाच टक्के; मात्र 12,500 च्या सवलतीच्या आधारावर कर शून्य.

 पाच ते साडेसात लाखांपर्यंतच्या उत्पन्‍नावर दहा टक्के कर.

 साडेसात ते 10 लाख रुपयांपर्यत पंधरा टक्के प्राप्‍तिकर.

 दहा ते 12.5 लाखांपर्यंत वीस टक्के कर.

 15 लाखांपेक्षा अधिक उत्पन्‍न असेल तर त्यावर 30 टक्के कर.

याचा अर्थ काय?

नवीन कररचनेचे गणित कसे काम करते, हे अगोदर पाहवे लागेल. बजेटच्या माध्यमातून अर्थमंत्र्यांनी प्रस्ताव मांडल्यानंतर आपल्याला नवीन व्यवस्था हवी, की जुन्या व्यवस्थेनुसार काम करायचे? याची निवड करावी लागेल. आतापर्यंत कराचा बोजा कमी करण्यासाठी टॅक्स डिडक्शनसाठी काही गुंतवणूक आणि विमा योजनेची खरेदी करावी लागत होती. याप्रमाणे उत्पन्‍न आणि आर्थिक ध्येयाच्या आधारावर त्याची खरेदी करावी लागत होती. जर आतापर्यंत आपण टॅक्सेशन आणि फायनान्शिअल ध्येय पूर्ण करण्यासाठी करसवलती देणार्‍या योजनांत गुंतवणूक करत असाल, तर जुनी करव्यवस्था फायदेशीर राहू शकते. नवीन व्यवस्थेचा फायदा गुंतवणूक न करणार्‍यांसाठी आहे. ज्यांना आपल्या हातात अधिक पैसा बाळगायचा आहे, अशा करदात्यांसाठी नवीन प्रणाली उपयुक्‍त ठरेल.

गुंतवणुकीचा उद्देश काय 

 नवीन व्यवस्थेनुसार करसवलतीवर पाणी सोडावे लागणार आहे. कर वाचवण्यासाठी अनेक मंडळी पारंपरिक करसवलती देणार्‍या योजनांत पैसा गुंतवणूक करण्याबाबत आग्रही असतात. परंतु आपण करसवलत न देणार्‍या योजनांत पैसा टाकू इच्छित आहात की नाही, हे अगोदर पाहवयास हवे. जसे की, ईएलएसएस वगळता अन्य म्युच्युअल फंड योजना. यामुळे करबचत योजनांच्या गुंतवणुकीतून बाहेर पडून चांगला परतावा देणार्‍या योजनात पैसे टाकण्याचे स्वातंत्र्य मिळेल. त्यामुळे सर्वात अगोदर गुंतवणुकीचा उद्देश जाणून घ्यायला हवा. 

आपले उत्पन्‍न किती?

कोणताही पर्याय निवडण्यापूर्वी आपले उत्पन्‍न किती आहे, हे जाणून घ्यायला हवे. जर आपले उत्पन्‍न दहा लाख असेल किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर आपण करसवलत देणार्‍या योजनांत गुंतवणूक करून आपल्यावरचा बोजा वाढवू शकतो. अशा स्थितीत आपण अधिक पैसा वाचवण्यासाठी करआकारणी कमी करण्यासाठी आपल्या सुविधांनुसार गुंतवणूक योजनेची निवड करू शकतो. 

आपण आताही इन्शोर्ड राहाल

जीवन विमा ही चांगली गुंतवणूक असण्याबरोबरच कर सवलत देणारी योजना म्हणूनही त्याकडे पाहिले जाते. विमा योजना ही आपल्यासाठी आणि कुटुंबासाठी आर्थिक संरक्षण देणारी महत्त्वाची योजना आहे. जर आपण कर वाचवण्यासाठी एखादी विमा योजना निवडली असेल आणि नव्या करप्रणालीच्या आधारावर त्याच्याशी नाते तोडणे आपल्याला संयुक्‍तिक वाटेल काय. जीवन विमा हे आपल्या कुटुंबाला दुर्दैवी घटनांमुळे होणार्‍या आर्थिक आघातापासून बचाव करण्याचेे काम करते. जीवन विमा असो, आरोग्य विमा असो; आणीबाणीच्या काळात या योजना अतिशय मोलाची कामगिरी बजावतात. जर नवीन व्यवस्था आपल्यासाठी फायदेशीर असेल तरीही आरोग्य विमा उतरवणे ही काळाची गरज आहे. 

आपण कोणत्या प्रकारच्या सवलती घेता?

आपण उच्च उत्पन्‍नधारक घटकात असाल आणि आपण गृहकर्ज किंवा आरोग्य विमा उतरवला असेल, तर त्याआधारे चांगली करसवलत मिळते. आपली करकपात होते. त्यामुळे आपण नवीन व्यवस्था स्वीकारल्यामुळे करात बचत होते की नाही, हे पाहिले पाहिजे. ज्याप्रमाणे आपण जुन्या व्यवस्थेत करबचत देणार्‍या योजनांत गुंतवणूक करून कर वाचवत होतो, त्याचप्रमाणे नव्या व्यवस्थेतही तसाच लाभ मिळतोय काय? याचा विचार करायला हवा.

हे लक्षात ठेवा

आपण अजूनही संभ्रमात असाल, तर आर्थिक सल्लागाराची मदत घेणे हिताचे ठरू शकते. आर्थिक ध्येयाशी तडजोड केल्याविना आर्थिक ध्येय सुरक्षित करण्यासाठी योग्य पावले उचलणे गरजेचे आहे. 


 

Back to top button