ऑनलाईन व्यवहारांमध्ये मोठी तेजी  | पुढारी | पुढारी

ऑनलाईन व्यवहारांमध्ये मोठी तेजी  | पुढारी

डॉ. वसंत पटवर्धन

गेल्या सोमवारी श्रीमती निर्मला सीतारामन यांनी 2021-022 चा अर्थसंकल्प मांडल्यानंतर बाजारात अभूतपूर्व तेजी निर्माण झाली आहे व ती आता सर्व वर्षभर टिकून रहावी. शुक्रवारी 5 तारखेला निर्देशांक 50,889 वर होता तर निफ्टी 14,955 वर होता. वर्षभरात दोन्ही अंकांमध्ये किमान 15 टक्के तरी वाढ दिसली कारण अर्थव्यवस्था दिवसेंदिवस जास्त मजबूत होत चालली आहे. परदेशी गुंतवणूकदार आपल्या शेअरबाजाराकडे जास्त आकृष्ट झाले आहेत. सरकारने वर्षभरात भारतीय आयुर्विमा नियोगाचे  अंशतः विनिमयन करायचे ठरवले असून भारतीय आयुर्विम्याचे किमान 48 टक्के शेअर्स विक्रीला  निघतील. प्राथमिक भागविक्रीचा भावही खूप मोठा असेल. देशभरात भारतीय आयुर्विम्याचे एजंट्स कित्येक हजार असून त्यांच्यातर्फे मोठी विक्री होईल. देशातील ही आतापर्यंतची मोठ्यांत मोठी निर्गुंतवणूक ठरेल. तत्पूर्वी भारत पेट्रोलियममधील काही शेअर्स अर्थखाते विक्रीला काढेल. त्यामुळे निवेशकांनी सध्याच भारत पेट्रोलियमचे शेअर्स विकत घेऊन  ठेवावेत.

थकीत कर्जांच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी एक वेगळीच बँक काढली जाऊन (बॅड बँक) त्यात ही सर्व थकीत कर्जे वर्ग केली जातील. या बँकेची रचना इतर बँकापेक्षा वेगळी असेल. ही कर्जे विकत देताना बँकांना खूप मोठा फटका बसेल कारण त्यासाठी सरकारला वेगळे भांडवल घालावे लागेल. अशा पद्धतीची बँक म्हणजेच अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन असेल. त्यात इतर बँक आपली कर्जे जेव्हा वर्ग करतील तेव्हा मोठा वटाव (Discount) त्यांना द्यावा लागेल. म्हणजेच 1000 कोटी रुपयांची कर्जे कदाचित 700 ते 800 कोटी रुपयांना वर्ग होतील. मधला फरक हा बँकांचा तोटा असेल. ही अ‍ॅसेट मॅनेजमेंट बँक थकीत कर्जांची वसुली करायला लागेल. थकीत कर्जदारांना एकरकमी भरपाई करावी लागेल. (One Time Payment) मात्र हे झाल्यानंतर सार्वजनिक बँकांचे ताळेबंद स्वच्छ होतील. 

देशातील बँकिंग उद्योगामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची 60 टक्के हिस्सेदारी आहे. तर दहापेक्षा अधिक सार्वजनिक बँकामध्ये केंद्र सरकारची हिस्सेदारी 70 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यातही 3 सार्वजनिक बँकांमध्ये सरकारची हिस्सेदारी 90 टक्के आहे. 

नवीन वर्षाच्या म्हणजेच 2021 च्या जानेवारीत देशातील ऑनलाईन व्यवहारांमध्ये मोठी तेजी दिसून आली. नीती आयोगाच्या माहितीप्रमाणे जानेवारी 2021 मध्ये युनिफाईड पेमेंट इंटरफेस (युपीआय)च्या माध्यमातून 230 कोटींहून अधिक व्यवहार झाले आहेत. या व्यवहारांचे एकूण मूल्य 4 लाख 20 हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. मागील वर्षातील जानेवारीपेक्षा ते 75 टक्के हून अधिक आहे. यापूर्वी डिसेंबर 2020 मध्ये ‘युपीआय’व ‘भीम’च्या माध्यमातून 223 कोटी रुपयांहून अधिक व्यवहारांची नोंद झाली होती. या व्यवहारातील एकूण मूल्य 4 लाख 16 हजार  कोटी रुपयांहून अधिक होते. 

अल्ट्राटेक सिमेंट या वर्षात 40 कोटी डॉलर्सचे विदेशी रोखे विक्रीस काढेल. आदित्य बिर्ला समूहातील ही प्रमुख कंपनी आहे. रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार बँकांनी 62000 कोटी रुपयांची अनार्जित  कर्जे विक्री करून आपल्या ताळेबंदातून काढून टाकली आहेत. त्यामध्ये या कंपन्यांचा समावेश  होतो.

1) विनसम डायमंड अ‍ॅड ज्वेलरी,  2) आर. इ.आय. अ‍ॅग्रो, 3) क्युडोज केमिकल्स, 4) झूम डेव्हलपर्स, 5) एबीजी शिपयार्ड, 6) फॉर एव्हर प्रेशस ज्वेेलरी अँड डायमंडस, 7) सूर्या विनायक इंडस्ट्रीज. 

यंदाच्या अर्थसंकल्पात भांडवल उभारणीला मोठे महत्त्व दिले गेले आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदाची वाढ 31% आहे. सरकारप्रमाणे खासगी क्षेत्रातील कंपन्याही हक्‍कभाग विक्रीला काढतील.(Rights Issue) किंवा नवीन प्राथमिक भाग विक्री करतील. 

कोरोनाच्या काळात मोठ्या कंपन्यांकडून नोकरकपात होत असता नवीन कंपन्यांनी (Start up) मात्र एप्रिल 2020 सप्टेंबर 2020 या काळात 1.70 लाख रोजगार दिले. या नवीन कंपन्यांचा आकडा 40000 च्या आसपास होता. सध्या सोन्याचा भाव प्रचंड वाढल्यामुळे आता तिथली खरेदी थोडी मंदावली आहे. त्यामुळे या पैशाचा शोध शेअरबाजाराकडे जाईल. प्रमुख भाववाढ जिथे दिसेल, त्यात सार्वजनिक बँका व टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि इन्फोसिससारख्या कंपन्या असतील. भारत आता प्रगत राष्ट्रांच्या पंगतीत जाऊन बसला आहे. त्यामुळे यापुढे परकीय भांडवल मोठ्या प्रमाणात येत राहील. पुढील दोन वर्षात निर्देशांक व निफ्टी पन्‍नास यात वार्षिक 15 टक्केवारी वाढ व्हावी.

 

Back to top button