Share Market Updates : रशिया-युक्रेन संघर्षाचं शेअर बाजारात टेन्शन! काही मिनिटांत ६ लाख कोटी बुडाले , क्रिप्टोकरन्सीही घसरली | पुढारी

Share Market Updates : रशिया-युक्रेन संघर्षाचं शेअर बाजारात टेन्शन! काही मिनिटांत ६ लाख कोटी बुडाले , क्रिप्टोकरन्सीही घसरली

पुढारी ऑनलाईन डेस्क

Share Market Updates : पूर्व युक्रेनमधील डोनेस्टक आणि लुहांस्क या दोन प्रांतांना रशियाने देश म्हणून मान्यता दिली आहे. तसेच युक्रेनच्या सीमेवरील रशियाच्या वाढत्या सैन्य तैनातीमुळे (Russia-Ukraine crisis) तणाव वाढला आहे. कधीही युद्ध होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचे पडसाद आज सोमवारी आशियाई शेअर बाजारात उमटले. भारतीय शेअर बाजाराचा सेन्सेक्स (Sensex crashes) मंगळवारी सकाळच्या सत्रात तब्बल १ हजार अंकांनी कोसळला. तर निफ्टी (Nifty) ३०० अंकांनी खाली येऊन व्यवहार करत आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टीच्या घसरणीमुळे काही मिनिटांत गुंतवणूकदारांना सुमारे ६ लाख कोटींचा फटका बसला. मागील सत्रातील २५७ लाख कोटींच्या तुलनेत गुंतवणूकदारांची संपत्ती २५१ लाख कोटींवर घसरल्याने बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे भांडवली मुल्य सुमारे ६ लाख कोटींनी कमी झाले. मिड कॅप आणि स्मॉल कॅप काउंटरवर (Share Market Updates) मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने बाजारातील व्यवहारांवर त्याचा परिणाम झाला. नकारात्मक संकेतामुळे बीएसई मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक आजच्या व्यवहारात अनुक्रमे ३९७ अंक आणि ५४२ अंकांनी घसरले.

काल सोमवारी शेअर बाजाराचा सेन्सेक्स १४९ अंकांनी खाली जाऊन ५७,६८३ अंकांवर बंद झाला होता. तर निफ्टी ६९ अंकांनी घसरून १७,२०६ अंकांवर बंद झाला होता. सेन्सेक्समध्ये सन फार्मा, टीसीएस आणि आयटीसी शेअर्स सर्वाधिक म्हणजे २.३९ टक्क्यांपर्यंत घसरले होते.

क्रिप्टोकरन्सीही घसरली

दरम्यान, बिटकॉईन (Bitcoin), इथेरियम (Ethereum) या क्रिप्टोकरन्सीमध्येदेखील ५ टक्क्यांनी घसरण दिसून येत आहे. डोगेकॉइन (Dogecoin), शिबा इनू (Shiba Inu) १० टक्क्यांनी घसरली आहेत.

Back to top button