डिप्रेशन जाणवतेय, मानसिक आजार ओळखायचा कसा? | पुढारी

डिप्रेशन जाणवतेय, मानसिक आजार ओळखायचा कसा?

डॉ. रोहन जहागिरदार

एन्जॉयमेंट किंवा आनंद मिळवण्याच्या नावाखाली व्यसन करणं ही एक जणू सध्या लाटच आली आहे. अशा व्यसनाधीन व्यक्तीच्या आयुष्यात जेव्हा ब्रेकअप होतो किंवा आई-वडील रागावतात तेव्हा आत्महत्येसारखा विचार बळावण्याची शक्यता अधिक असते.
आज जीवनशैलीच नव्हे, तर एकूणच सभोवतालचं वातावरण बदलत चाललं आहे. या बदलत्या काळात ताणतणावांनी प्रत्येकाला ग्रासलं आहे. पूर्वीच्या काळीही ताणतणाव होते; पण त्यांचं स्वरूप वेगळं होतं. दोन वेळचं अन्न मिळवायचं, कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडायच्या यातून येणारा ताण पूर्वी पाहायला मिळायचा. आज तशी स्थिती नाही. आज किमान गरजा भागवण्याइतकी मानवानं प्रगती केली आहे. मागच्या काळापेक्षा आजचं आयुष्य हे कितीतरी प्रमाणात आरामदायी झालं आहे. पण, त्यातून काही नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. माझ्याकडे काही 18-20 वर्षे वयोगटातील तरुण समुपदेशनासाठी येतात. त्यांना या वयात महिन्याला 50-60 हजार रुपये पगार असतो. त्यांच्यावर कोणत्याही कौटुंबिक जबाबदार्‍या नसतात. अशा वेळी त्यांना या पैशांचं काय करायचं हे कळत नाही. यातून बरेचदा ते व्यसनांकडे वळतात.

ताणतणावांचं मूळ

ताणतणावाचं मूळ कारण आहे, मोकळ्या संवादाचा अभाव. एकमेकांशी आपण बोललोच नाही, आपल्या भावना मोकळेपणानं व्यक्तच केल्या नाहीत, तर त्यातून मनावरचं दडपण वाढत जातं. याबाबत आपण दीर्घकाळ कोणतेही उपाय केले नाहीत, तर त्यातून नैराश्य किंवा डिप्रेशनची स्थिती येते. त्यामुळं मोकळेपणानं संवादाची प्रक्रिया वाढीस लागणं अत्यंत आवश्यक आहे. आपण घरात पत्नीशी, मुलांशी बोलतो त्याला संवाद म्हणत नाहीत. संवाद हा इंटरअ‍ॅक्टिव्ह किंवा परस्परांच्या विचारांची देवाणघेवाण करणारा, परस्परांचे विचार समजून घेणारा असला पाहिजे. आज तोच हरपत चालल्यामुळं ताणतणाव वाढत आहेत.

अलीकडील काळात नात्यांची ऊब हरपत आहे. आज नात्यांमध्ये जवळीक राहिलेली नाही. परिणामी, लोकांचं अवलंबित्त्व ‘पीअर ग्रुप’वर म्हणजे मित्र, ऑफिसमधील सहकारी यांच्यावर वाढतं आहे. पण, इथं आपण स्पर्धकही असतो. उदाहरणार्थ, ‘अ’ या दहावीच्या विद्यार्थ्याचा ‘ब’ हा कितीही जवळचा मित्र असला, तरी त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळवणे ही ‘अ’ची गरज असते. या स्पर्धात्मकतेमुळे या नात्यांमध्ये आत्मकेंद्रीपणा असतो. स्वतःचा फायदा पाहिलाच पाहिजे; पण अशा प्रकारचं स्पर्धकतेचं नातं असल्यामुळं एकटेपणा वाढत जातो.

मानसिक आजार ओळखायचा कसा?

याचं सर्वात पहिलं लक्षण म्हणजे स्वभावात अचानकपणे झालेला कोणताही बदल. एखादी बोलकी व्यक्ती अचानकपणाने 8-15 दिवसांपासून शांत शांत राहात असेल किंवा याउलट शांत असणारी व्यक्ती अचानकपणानं खूप जास्त बोलत असेल किंवा कधीही मद्यसेवन न करणारी, कमी प्रमाणात मद्यपान करणारी व्यक्ती अचानकपणानं रोज एक बीअर पिऊ लागली, तर या गोष्टी त्या व्यक्तीच्या आयुष्यात काही तरी चुकीचं घडत असल्याचं निदर्शक असतात. अशा वेळी त्यांना योग्य मानसिक आधार आणि उपचार न मिळाल्यास त्यांची मनोवस्था ढासळत जाते. म्हणूनच अशा व्यक्तींनी सर्वांत प्रथम कुणाशी तरी बोलून मन मोकळं करणं गरजेचं असतं. एकट्यानं मार्ग काढतो असं म्हणून ही अवस्था बदलत नाही. खरे पाहता अशा स्थितीत मनोविकारतज्ज्ञांशी सल्लामसलत करणं कधीही उपयुक्त ठरतं. पण, आपल्याकडे मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणं याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यामुळं मानसिक आजार झालेले, वैफल्यग्रस्त झालेले निम्म्याहून अधिक लोक मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्यास कचरतात. अशा मंडळींनी किमान त्यांच्या आईशी, मित्राशी किंवा पत्नीशी बोलून मनावरचा ताण कमी केला पाहिजे. यातून पहिलं पाऊल पडतं. अशा स्थितीत व्यसनापासून कटाक्षाने परावृत्त राहिले पाहिजे. कारण व्यसनामुळं समस्या सुटत नाही किंवा समस्येपासून काही काळ आरामही मिळत नाही; तर समस्या अधिक बिकट बनू शकते. उदाहरणार्थ, आर्थिक अडचणीच्या काळात मद्यसेवन केल्यामुळं तो प्रश्न सुटत नाही. उलट दारूवर होणार्‍या खर्चानं मनावरचा ताण अधिक वाढत जातो. तसेच नशा केल्यामुळं आपल्या विचारशक्तीमध्ये आणि निर्णयक्षमतेमध्ये बदल होत जातो. म्हणूनच ताणतणाव, नैराश्य असण्याच्या काळात व्यसनाकडे पाऊल पडू देऊ नका.

एखाद्या व्यक्तीचे मधुमेहामुळे पाय कापले असतील किंवा एखाद्याचे अपघातामुळे हात गेलेले असतील, तर असं आयुष्य जगण्यात काय अर्थ आहे असा विचार मनात बळावत जातो आणि आत्महत्येकडे पावले वळतात. कर्करोग, एचआयव्ही, डिमेन्शिया यांसारख्या आजारांमध्ये दीर्घकाळ वेदना सहन कराव्या लागतात. परिणामी, अशा केसेसमध्ये आत्महत्येचे विचार सतत मनात येत राहतात. या सर्व पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांनी दररोज येणार्‍या ताणतणावांचं व्यवस्थापन कसं करायचं, ताणाचा सामना कसा करायचा आणि तणावमुक्त जीवन कसं जगायचं हे जाणून घेऊया. आयुष्यात रुटिन, रिस्पॉन्सिबिलीटी आणि रिलॅक्सेशन या तीन ‘आर’चा समतोल साधता आला पाहिजे. यातील कोणतीही एक गोष्ट 100 टक्के केली, तर आयुष्य यशस्वी होत नाही. उदाहरणार्थ, जबाबदार्‍यांचा विसर पडून केवळ रुटिनमध्येच गुंतून पडून चालणार नाही; त्याचप्रमाणे केवळ मुलाबाळांच्या जबाबदार्‍यांचं ओझं आहे म्हणून रिलॅक्सेशन न घेता सतत धावूनही चालणार नाही. अशाच प्रकारे कोणतीही जबाबदारी न घेता केवळ रिलॅक्सेशन म्हणजेच आराम करूनही चालणार नाही.

तीनही गोष्टींमध्ये समतोल साधणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आज सर्वांना सर्वच गोष्टी सुलभरीत्या उपलब्ध आहेत; मात्र या भौतिक गोष्टींमध्ये सुख कधीच नसतं. अन्यथा, आपण सुपरमार्केटस्मधून सुख विकत घेतलं असतं. म्हणूनच आपल्या स्वतःला आनंद कशात वाटतो हे ओळखून घ्यावं. तुम्हाला एखादं गाणं ऐकण्यात आनंद असेल आणि दुसर्‍याला हजार रुपये खर्च करण्यात आनंद वाटत असेल, तर हे दोन विभक्त विचार आहेत. तुम्ही जर उद्या त्या व्यक्तीप्रमाणे हजार रुपये खर्च करायला जाल ,तर त्यातून आनंद मिळेलच याची कोणतीही शाश्वती नाही. म्हणून आपल्याला आनंद कशात वाटतो ते जाणून घ्या आणि त्याचप्रमाणं आयुष्य जगा.

Back to top button