मुकाबला हायपर टेन्शनचा, जाणून घ्या उच्च रक्तदाबाची लक्षणे काय आहेत? | पुढारी

मुकाबला हायपर टेन्शनचा, जाणून घ्या उच्च रक्तदाबाची लक्षणे काय आहेत?

बदललेल्या जीवनशैलीने माणसाला अनेक भौतिक सुखसुविधा दिल्या आहेत. मात्र, त्याबरोबरच आरोग्याच्या मोठ्या तक्रारीही दिलेल्या आहेत. काही वर्षांपूर्वी जे आजार तुरळक प्रमाणात दिसत होते, ते आता घराघरांत पोहोचले आहेत. उच्च रक्तदाब हा यापैकीच एक होय.

हसत खेळत पुढे जात असणार्‍या आयुष्यावर अलीकडच्या काळात उच्च रक्तदाबाची टांगती तलवार सतत लटकत असल्याचे दिसत आहे. सावकाश पावलांनी हा आजार शरीरात कधी आपले घर बनवतो, याची जाणीवसुद्धा व्यक्तीला होत नाही. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जीवनशैलीतील बदलांमुळे जवळपास प्रत्येक घरातच किमान एक व्यक्ती तरी या आजाराने त्रस्त असल्याचे दिसते. उच्च रक्तदाब असणार्‍या लोकांची वाढती संख्या पाहता, जागतिक आरोग्य संघटनेने या समस्येला सार्वभौमिक आरोग्य समस्या मानले आहे.

उच्च रक्तदाबाचा परिणाम इतर आजारांच्या वाढीस कारणीभूत ठरतो, त्याचबरोबर किडनी खराब होणे, अपंगत्व आणि इतकेच नाही तर मृत्यूपपर्यंत विविध रूपात बघायला मिळतो. एका संशोधनानुसार जगातील जवळपास 26 टक्के लोकांना हायपरटेन्शन आहे. हॅवद विद्यापीठातील संशोधनानुसार अमेरिकेत जवळपास 15 टक्के लोकांचा मृत्यू होण्यामागे हे कारण प्रामुख्याने दिसून आले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे उच्च रक्तदाबाची कारणे वेगवेगळी असू शकतात.

असंयमित जीवनशैली हे बहुतेक लोकांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमुख कारण दिसून येते. कमी शारीरिक श्रम, अधिक तणाव यांसोबतच धूम्रपान, मद्य इत्यादींचे सेवन उच्च रक्तदाबाची समस्या वाढवत आहे. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना या आजाराचा आभास होत नाही म्हणून त्याला सायलेंट किलर असेही म्हणतात.

बरेचदा, प्रसुतावस्थेत महिलांचा रक्तदाब वाढतो. गर्भावस्थेदरम्यान महिलांना होणार्‍या उच्च रक्तदाबाला वैद्यकीय भाषेत ‘प्रेग्नन्सी इंड्रयस्ड हायपरटेन्शन’ असे म्हणतात. यामुळे गर्भवती महिलांच्या पायावर सूज येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे, चक्कर येणे, अस्वस्थता, घाबरलेपण इत्यादी त्रास होऊ शकतो. म्हणूनच गरोदर महिलांनी नियमित डॉक्टरांकडून तपासणी केली पाहिजे.

उच्च रक्तदाबग्रस्त होण्यामागे इतर कारणेदेखील आहेत. उच्च रक्तदाबाचा संबंध व्यक्तीचे वय, लिंग, त्याची शारीरिक आणि मानसिक हालचाल यावर अवलंबून असतो. ज्या व्यक्तीत अधिक शारीरिक श्रम आणि मानसिक श्रम करतात त्यांचा रक्तदाब अन्य लोकांच्या तुलनेत अधिक दिसून आलेला आहे. उच्च रक्तदाब अनुवंशिकदेखील असू शकतो. म्हणूनच एकाच मोजपट्टीने सर्वांची तपासणी करणे शक्य नसते.

उच्च रक्तदाब म्हणजे काय?

आपल्या शरीरात हृदय, धमण्या या माध्यमातून संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह सतत होत असतो. उच्च रक्तदाबाचे प्रमुख कारण म्हणजे धमण्यांच्या भिंती आपल्या सामान्य आकारापेक्षा जाड आणि संकुचित होणे. यामुळे शरीरात रक्तसंचार सहजगतीने होऊ शकत नाही आणि हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. ज्यावेळी रक्त हृदय किंवा मेंदूपर्यंत योग्य प्रकारे पोहोचू शकत नाही, तेव्हा हृदयाचा झटका येण्याची स्थितीदेखील उत्पन्न होऊ शकते. यामुळे उच्च रक्तदाब असणार्‍या व्यक्तीला नियमितपणे तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. अशा व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधे घ्यावीत. एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाब आहे हे समजल्यानंतर उपचार सोपे होतात हे लक्षात घ्यावे.

उच्च रक्तदाब मोजण्याची पद्धत : रक्तदाब दोन अंकांच्या माध्यमातून दर्शविला जातो. एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब तपासताना 120/80 असेल तर याला सामान्य रक्तदाब मानले जाते. रक्तदाब हृदयाच्या सिस्टोलिक आणि डायस्टोलिक दाबाच्या रुपात मोजला जातो. 120/80 या अंकांमध्ये सिस्टोलिक म्हणजे 120 आणि 80 हा डायस्टोलिक रक्तदाब आहे. त्याला सामान्य भाषेत वरचा आणि खालचा दाब म्हटले जाते. सामान्यपेक्षा अधिक रक्तदाब असणे हे उच्च रक्तदाबाचे लक्षण आहे; परंतु याची निश्चिती डॉक्टर रुग्णाची तपासणी केल्यानंतरच करतात.

उच्च रक्तदाब मोजण्याची योग्य पद्धत : नोंदवलेल्या रक्तदाबाचे नियमित रेकॉर्ड ठेवावे. ते कागदावर लिहून काढावे. प्रत्येक दोन मिनिटांनंतर दोन किंवा तीन वेळा रक्तदाब मोजावा आणि त्यानंतरच सरासरी काढावी. रक्तदाब मोजताना चिंताग्रस्त अथवा तणावग्रस्त नसावे. यामुळे रक्तदाब तेवढ्यापुरता वाढलेला दिसून येतो. तसेच रक्तदाब मोजण्यापूर्वी मूत्रविसर्जन किंवा शौचक्रियादेखील करून घ्यावी. मसालेदार पदार्थ, जड भोजन किंवा कॉफी सिगारेट घेतल्यानंतर त्वरित रक्तदाब तपासू नये.

उच्च रक्तदाबाची लक्षणे : तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार तपासणी केल्यानंतर वास्तविक स्थिती समजत असली तरीही रक्तदाबाची काही लक्षणे या आजाराकडे इशारा करत असतात. व्यक्तीला थकल्याची तक्रार असणे, धाप लागणे, ससतत डोकेदुखी, कानात एखादा आवाज घुमत असल्याची जाणीव होणे इत्यादी लक्षणे उच्च रक्तदाबाची असतात. या व्यतिरिक्त हृदयाची गती अचानक वाढणे वा कमी होणे किंवा हृदयात वेदना निर्माण होणे इत्यादी लक्षणेही उच्च रक्तदाबाची असू शकतात.

उच्च रक्तदाब नियंत्रित राखण्यासाठी मिठाची भूमिका महत्त्वाची असते. एका प्रौढ व्यक्तीने दिवसातून पाच ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी प्रमाणात मिठाचे सेवन केले पाहिजे. जंक फूड, बाजारातील वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स यामध्ये मिठाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे असे पदार्थ खाताना विचार केला पाहिजे. काही विशिष्ट परिस्थितीत देखील उच्च रक्तदाब निर्माण होऊ शकतो. डायबेटिस, थायरॉईड, हृदय, किडनी, लिव्हर, ट्युमर इत्यादींसंबंधी आजारांमुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो.

डॉ. संतोष काळे

Back to top button