नाकाची काळजी | पुढारी

नाकाची काळजी

आजकाल हवेतील प्रदूषणामुळे नाकांच्या विकारात खूपच वाढ झालेली दिसते. नाकावाटे आपण श्वसन करतो आणि त्यातूनच आपल्या शरीराचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी लागणारा प्राणवायू आपण शरीरात घेतो आणि शरीरात तयार होणारा कार्बन डाय ऑक्साईड वायू बाहेर टाकत असतो. त्यामुळे नाक किंवा ज्ञानेंद्रियांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते.

नाकाच्या विकारांवर काही गुणकारी उपचार घरच्या घरीच करता येतात. ते असे –

नाक चोंदणे हा प्रकार सर्रास जाणवतो. कानात कापसाचे बोळे घालावेत. गरम पाण्याच्या पिशवीने कपाळ शेकावे. साजूक तुपाचे थेंब नाकात घातल्यानेही नाक मोकळे होते.

पावसाळी हवा किंवा पावसात भिजल्यामुळे सर्दी-खोकला सुरू होतो. या दिवसात सर्दी तीव्रता अधिक असल्यास रुमालावर निलगिरी तेलाची थेंब टाकून हुंगणे. ओवा तव्यात भाजून त्याची धुरी घेणे अथवा नुसते गरम पाण्याच्या पिशवीने डोके कपाळ शेकल्यास सर्दी कमी होते.

अचानक नाकात एखादी पुटकुळी उठते आणि नाक दुखू लागते. याला नाकात माळीण होणे असे म्हणतात. यावेळी साजूक तूप नाकात सोडावे. माळीण म्हणजे नाकपुडीच्या आत होणारे फोड. यामुळे वेदना होतात तसेच श्वसनालाही त्रास होतो. प्रामुख्याने हा उष्णतेचा विकार आहे.

गुळणा फुटणे म्हणजे नाकातून अचानक रक्त येणे. हाही उन्हामुळेच होणारा विकार आहे. त्यावर मान खाली घालून मस्तकावर आणि कपाळावर गार पाणी मारल्यास हे रक्त वाहणे थांबते. गादीवर डोके थोड्या वरच्या बाजूला कलते करून दोन-तीन मिनिटे झोपल्यासही रक्त वाहणे थांबते. नाकात काही गेल्यास तपकीर किंवा मिरी पावडर हुंगायला देऊन शिंका काढण्याने नाकात गेलेली वस्तू बाहेर येते; अन्यथा आपोआप घशात उतरते. लहान मुले बरेच वेळा नाकात शेंगदाणे, पेन्सिली अशा वस्तू घालतात, त्यावेळी मात्र तज्ज्ञ डॉक्टरकडे नेऊनच त्या काढाव्यात.

– डॉ. प्राजक्ता पाटील

Back to top button