महापुरानंतरची आरोग्य दक्षता | पुढारी | पुढारी

महापुरानंतरची आरोग्य दक्षता | पुढारी

डॉ. अनिल मडके

ऑगस्ट महिन्यात सांगली-कोल्हापूर चर्चेत आले त्याचे कारण म्हणजे महाप्रलय, महापूर! या महापुराने सांगली-कोल्हापूरबरोबरच महाराष्ट्रातील इतर अनेक शहरांना, गावांना तडाखा दिला. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. महाराष्ट्राबाहेरही अनेक ठिकाणी पूर आले. राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशातही नद्या भरून वाहत असल्याचे द‍ृश्य आपण पाहिले.

सर्वत्र वित्तहानी झाली हे खरे; पण महापुराच्या काळात आणि त्यानंतरच्या काही आठवड्यात आरोग्याचे अनेक गंभीर प्रश्‍न निर्माण होतात. त्याची आधीच माहिती घेऊन जागरूक राहिले तर चिंता कमी होऊ शकते. आरोग्य अधिक न बिघडता, गुंतागुंत न होता आपण सहीसलामत बाहेर पडू शकतो आणि निदान अनारोग्याचा प्रश्‍न तरी निकालात काढू शकतो.

शहरांत आणि शहरांलगतच्या उपनगरांत अनेक सखोल ठिकाणी पाणी साचून राहिले आहे. त्याचा पुरेसा निचरा झाला नाही. ज्यांची तळघरे होती, तिथले पाणी काढले गेले आहे; पण भिंतींना अजून ओल आहे. पाण्यानंतर म्हणजे या प्रकारच्या पुरानंतर घरात निर्माण होणारी आर्द्रता अनेकजण अनुभवत आहेत. अनेक खेड्यांतून परिस्थिती फारशी वेगळी नाही. मातीच्या भिंती असतील तर केवळ घराचीच नव्हे, तर आरोग्याची मोठी पडझड भविष्यात होऊ शकते, हे लक्षात घ्यावे.

आणखी एक गोष्ट, महापुरातही अनेक ठिकाणी अजून पावसाची रिपरिप सुरू आहे. बर्‍याच संसारोपयोगी वस्तू, कपडे कोरडे करण्यासाठी अनेकांना उन्हाची प्रतीक्षा आहे; पण उन्हे आली म्हणता म्हणता पावसाची सर येते आणि पुन्हा प्रयत्नांवर पाणी पडते. डोळ्यांसमोर आणि डोळ्यांतही पाणी साठून येते.

वाचकहो, खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, ज्या पावसाळ्याच्या आणि पुराच्या काळात फार महत्त्वाच्या आहेत. अनेकांच्या घराभोवती आजही पाणी आहे. पुराचे पाणी ओसरलेले असले तरी अनेक ठिकाणी अजून साचलेले पाणी आहे. शाळा-कार्यालये अजून नीट सुरू आहेत असे नाही. अनेकांना आजही पाण्यातून जावे लागते. पाण्यातून जाताना गमबूट वापरावेत. पाय ओले ठेवू नयेत. कारण गायी, म्हशी, कुत्री, मांजरं, उंदीर, घुशी यांच्या मलमूत्रातून अशा पाण्यामध्ये लेप्टोच्या जीवाणूंचा शिरकाव झालेला असू शकतो आणि लेप्टोची लागण होऊ शकते. या काळात कोणती काळजी घ्यावी? तर गनबूट वापरावेत.

गनबूट कोरडे राहतील अशी काळजी घ्यावी. पाय ओले झाले तर घर-कार्यालयात पोहोचल्यावर हातपाय, गनबूट किंवा चपला स्वच्छ पाण्याने धुवावेत आणि पायही स्वच्छ पाण्याने धुवून ताबडतोब कोरडे करावेत. बरेच लोक मोजे वापरतात. तर त्यांनी हे ओले मोजे काढून टाकून, पाय स्वच्छ पाण्याने धुवावेत आणि कोरडेही करावेत. एसी रूममध्ये प्रवेश करत असाल तर ओल्या डोक्याने, अंगावरच्या भिजल्या-ओल्या कपड्यांनिशी जाऊ नये. डोके कोरडे करावे आणि ओले-भिजलेले कपडे बदलून स्वच्छ कोरडे कपडे परिधान करावेत. ऑफिस किंवा घरातील वातावरण या काळात उबदार ठेवायचा प्रयत्न करावा. ज्यांना आधीच श्‍वसनविकार मधुमेह, ब्लडप्रेशर, दमा, सीओपीडी अशा प्रकारचा कोणताही आजार असेल, त्यांना थंड हवेचा, वातावरणाचा त्रास होऊ शकतो. दररोज कार्यालयात किंवा अशा थंडी वातावरणाच्या ठिकाणी जावे लागत असेल किंवा राहावे लागत असेल तर या कोरडे, मोजे, स्वच्छ टॉवेल यांचा एक सेट प्लास्टिकच्या किंवा तत्सम एखाद्या हवाबंद पिशवीत बरोबर ठेवावा. पिशवी बाळगण्याचा थोडा त्रास झाला तरी आजारांपेक्षा आणि त्यावर होणार्‍या खर्चापेक्षा, मानसिक त्रासापेक्षा हा त्रास परवडेल.

लेप्टोस्पायरोसिस या आजाराच्या बाबतीत लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, जसा हा आजार त्वचेतून शरीरात प्रवेश करतो, तसा तो पिण्याच्या पाण्यातूनही शरीरात प्रवेश करू शकतो. म्हणून उघड्यावरचे पिण्याचे पाणी धोक्याचे आहे, हे लक्षात घ्यावे. कारण श्‍लेष्मल पटलातून हे जंतू शरीरात प्रवेश करू शकतात. उघड्यावरच्या अन्‍नातूनही हा धोका असतो. 

पूर ओसरल्यानंतर अनेक संसर्गजन्य आजार म्हणजे साथीचे आजार या काळात वाढतात. विशेषतः पोटाचे विकार वाढतात. विषमज्वर, कावीळ, कॉलरा, अ‍ॅमिबियासिस असे विकार होतात. जुलाब होतात, उलट्या होतात, अतिसार होतो, शरीरातील पाणी कमी होते. हे सगळे विकार आणि त्रास टाळायचे असतील तर स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. स्वच्छता, स्वच्छता आणि स्वच्छता ही एरव्हीही महत्त्वाची गोष्ट असतेच; परंतु अशा परिस्थितीत त्रिवार महत्त्वाची गोष्ट आहे. जे पिण्याचे पाणी आता सर्वत्र पुरविले जात आहे ते मिनरल वॉटर असेल तर चांगली गोष्ट आहे. परंतु, ते विश्‍वासार्ह नसेल किंवा उपलब्ध नसेल तर फिल्टरचे पाणी पिणे चांगले. शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळण्याचा सर्वांत उत्तम उपाय म्हणजे पाणी निवळून, गाळून, उकळून मग थंड केलेले पाणी पिणे. थंड पाणी याचा अर्थ मिळालेल्या बर्फाने थंड केलेले पाणी असा नाही. असा बर्फ आपण खाऊही नये आणि मुला-बाळांना तर त्यापासून दूरच ठेवावे. कारण बर्फ ज्या पाण्यापासून बनविलेला असतो ते पाणी स्वच्छ-शुद्ध असेलच असे नाही.

पाण्याबरोबरच महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अन्‍न. अन्‍नही दूषित होऊ नये, याची योग्य ती काळजी घ्यावी. ते झाकून ठेवावे. त्यावर माशा बसू देऊ नयेत. कारण माश्यांना अन्‍न काय आणि विष्ठा काय दोन्ही सारखंच असतं. माश्यांमुळे अनेक आजारांचा प्रसार होतो. म्हणूनच संसर्गजन्य आजार टाळायचे असतील तर सार्वजनिक आरोग्याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे. उघड्यावर शौचविसर्जन करू नये आणि शौचविसर्जन झाल्यानंतर हात स्वच्छ पाण्याने व साबणाने धुवावेत. वैयक्‍तिक आणि सार्वजनिक स्वच्छता या गोष्टींना आजच्या परिस्थितीत खूप महत्त्व आहे.

या काळात जे वेगवेगळे आजार वाढतात त्यांत श्‍वसनविकारांची संख्या आणि त्रास वाढतो. विशेषतः ज्या व्यक्‍तींचा गर्दीशी जास्त काळ, जास्त वेळा संपर्क येतो, त्यांनी सावध असायला हवे. कारण गर्दीत एखाद्या व्यक्‍तीला शिंका-खोकला असेल आणि ती व्यक्‍ती तोंडावर रूमाल वगैरे न वापरता तशीत खोकत-शिंकत असेल तर त्यामुळे त्याच्याभोवतालच्या व्यक्‍तींपैकी अनेकांना तो त्रास सुरू होतो. कारण सर्दी हा आजार शिंकांतून किंवा खोकल्यातून पसरतो. ज्यांना सर्दी-खोकल्याचा त्रास आहे, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्वतःची आणि स्वतःबरोबरच इतरांचीही काळजी म्हणून लोकसंपर्क टाळावा. जेव्हा गरजच असेल तेव्हा तोंडावर रूमाल धरावा, जेणेकरून तोंडातून उडणार्‍या तुषरांतून आपले जंतू बाहेर पसरणार नाहीत. या काळात ज्यांना मधुमेह, कर्करोग किंवा न्यूमोनियासारखा आजार आहे किंवा ज्यांची रोगप्रतिकारक्षमता कमी आहे, अशा व्यक्‍तींना या संसर्गाचा त्रास होऊ शकतो. विशेषतः वृद्ध व्यक्‍ती आणि लहान मुलांना गर्दीपासून शक्यतो दूर ठेवावे. गर्दीत जाण्याची वेळ आली तर किंवा पूरपरिस्थितीच्या काळात बरोबर एक स्वच्छ रूमाल नेहमी बाळगावा जर शिंक-खोकला आला तर रूमालाची घडी नाकावर ठेवावी. इतर कोणी शिंकत असेल तरी आपले नाक-तोंड अशा रूमालाने झाकून घ्यावे.

पूर ओसरल्यानंतर मागे खूप चिखल आणि त्याबरोबरच असंख्य कुजलेल्या गोष्टी मागे राहिलेल्या असतात. दुर्गंधीही खूप असते. घरातच जर पाणी आले असेल तर भिंतींवर ओल असते आणि त्यावर एक प्रकारची बुरशी आलेली असू शकते. या बुरशीच्या संपर्कात आल्यास बुरशीजन्य विकार जडू शकतात. म्हणून पाणी बाहेर पडल्यानंतर किंवा काढल्यानंतर घर स्वच्छ करून घ्यावे आणि घरात वायुविजन चांगले राहील, याची काळजी घ्यावी. कोंदट वातावरणामुळे श्‍वसनाचे विकार बळावू शकतात किंवा नव्याने जडूही शकतात. पुरातून बाहेर पडलो आता आजारांपासूनही बाहेरच राहूया.

 

Back to top button