बहुउपयोगी लसूण | पुढारी | पुढारी

बहुउपयोगी लसूण | पुढारी

जयदीप नार्वेकर

लसणाच्या औषधी गुणांमुळे आयुर्वेदीय आहार चिकित्सेत लसणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लसूण हा वात व कफाच्या विकारांवर अत्यंत गुणकारी आहे. त्याचप्रमाणे डोळे, अस्थी, त्वचा व रक्‍तातील दोष दूर करणारा आहे.

आधुनिक आहारशास्त्रानुसार लसणाचे अगणित फायदे आहेत. लसणात ऍलिसीन नावाचे सल्फर कंपाऊंड आहे. या ऍलिसीनमुळे लसणात अँटिबायोटिक व बुरशीजन्य आजारांना प्रतिबंध करण्याचा गुण दिसून येतो; परंतु या उडणशील द्रव्याचा फायदा मिळविण्यासाठी लसूण चिरणे किंवा चावून खाणे गरजेचे आहे. लसणाची पाकळी तशीच गिळल्यास औषधी गुणांचा फायदा मिळत नाही.

लसणामध्ये रक्‍त पातळ करण्याचा नैसर्गिक गुण आहे.त्यामुळे तो रक्‍तात गुठळी निर्माण होऊ देत नाही. म्हणूनच, उच्च रक्‍तदाब व कोलेस्टेरॉलच्या नियंत्रणाखाली लसणाचा आहारात समावेश करण्याबद्दल सांगितले जाते. साधारणत: दिवसाला 2 ते 4 लसूण पाकळ्या खाणे योग्य ठरते. लसूण हा कर्करोग प्रतिबंधकदेखील आहे. लसूण नियमित खाण्यात असल्यामुळे जठर व आतड्याच्या कॅन्सरचा धोका कमी होतो.  प्राण्यांवर केलेल्या एका संशोधनात लसणामुळे ट्युमर कमी झालेला आढळून आला आहे.

शरीराच्या प्रतिकारशक्‍तीची यंत्रणा लसणामुळे उत्तम राहते. संधिवात व आपवाताचा त्रास असणार्‍यांनी त्यांच्या रोजच्या आहारात लसणाचा समावेश केल्यास शूल कमी होण्यास मदत होते. लसूण खाल्ल्याने काही लोकांना अ‍ॅसिडीटी होते. अशांनी लसूण दोन ते तीन तास दुधात भिजवून खावा व भरपूर पाणी प्यावे. 

भाजी, वरण, आमटी व चटणीत लसणाचा सढळ हाताने वापर केल्यास कुटुंबातील सर्वांचे आरोग्य उत्तम राहाते. लसूण हा अत्यंत औषधी व आरोग्यदायी आहे. उच्च रक्‍तदाब, हृदयविकार, हाय कोलेस्टेरॉल, कर्करोग अशा विकारांपासून लसूण संरक्षण देतो. 

 

Back to top button