सोरायसिस आणि स्थूलपणा | पुढारी | पुढारी

सोरायसिस आणि स्थूलपणा | पुढारी

डॉ. शहनाझ अर्सिवाला

सोरायसिस हा बहुतेकदा संसर्गजन्य तसेच त्वचा व सौंदर्यासंदर्भातील विकार समजला जातो. मात्र, हा एक ऑटो-इम्युन विकार आहे. तो संसर्गजन्य स्वरूपाचा नाही. हा विकार प्रौढांमध्ये अधिक आढळत असला तरी तो कोणत्याही वयोगटात होऊ शकतो. स्त्री व पुरुष या विकाराला सारख्याच प्रमाणात बळी पडू शकतात. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ सोरायसिस असोसिएशन्सच्या (आयएफपीए) आकडेवारीनुसार जगातील 125 दशलक्षांहून अधिक लोकांना सौम्य किंवा मध्यम स्वरूपाचा सोरायसिस आहे.

सोरायसिस व स्थूलता या दोन्ही समस्या असलेल्यांची संख्या मोठी आहे, असे अनेक अभ्यासांमध्ये दिसून आले आहे. सोरायसिसग्रस्त लोकांमध्ये स्थूलतेचे प्रमाण अधिक असते. सोरायसिसचे रुग्ण स्थूल असतील तर अशा परिस्थितीत त्यांची अवस्था अधिक बिकट होते व त्यांच्यावर उपचार करणेही अधिक कठीण होते. 

सोरायसिसग्रस्त रुग्णांमध्ये रोगाची लक्षणे तीव्र होण्याची स्थिती बराच काळ टिकते आणि स्थूल व्यक्‍तींमध्येही हेच लक्षण दिसून येते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. शरीरातील चरबीयुक्‍त पेशींमुळे ही फ्लेअर-अप्स (स्थिती) अधिक तीव्र होऊ शकतात. याचा अर्थ रुग्णाचे वजन जेवढे अधिक तेवढा सोरायसिस तीव्र होऊ शकतो.

आणखी एका अभ्यासानुसार, सोरायसिस काही जणांमध्ये स्थूलता निर्माण करू शकतो. उदाहरणार्थ, सोरायटिक संधिवातासारख्या विकारांमध्ये क्रियाशील राहणे वेदनादायी असल्यामुळे रुग्ण निष्क्रिय होतात आणि त्यांचे वजन वाढते. त्याचप्रमाणे सोरायसिसमुळे रुग्णांमध्ये त्यांच्या त्वचेबाबत अवघडलेपणाची भावना येते आणि त्यामुळे स्वत:ला दिलासा देण्यासाठी ते अनारोग्यकारक आहाराच्या सवयी जडवून घेतात. यामुळे वजन वाढू शकते.

वजनाचे व्यवस्थापन केल्यास सोरायसिस रुग्णांना अधिक चांगला व दीर्घकाळ आराम मिळवून देण्यात त्याचा खूप उपयोग होतो. बीएमआयनुसार अतिरिक्‍त वजन असलेल्या रुग्णांमध्ये सोरायसिससाठी बायोलॉजिक्ससारखे उपचारांचे प्रगत पर्याय उपयुक्‍त ठरू शकतात.

प्रगत उपचारांसोबतच रुग्णांनी त्यांच्या आहाराकडे नीट लक्ष देणे आवश्यक आहे. ते काय खातात यावर त्यांना जाणवणार्‍या फ्लेअर-अप्सचे प्रमाण अवलंबून आहे. उदाहरणार्थ, सॅच्युरेटेड फॅटस्मुळे फ्लेअर-अप्स वाढतात. त्यामुळे स्वयंपाकासाठी आरोग्यकारक तेल निवडणे महत्त्वाचे आहे. ओमेगा-थ्री फॅटी अ‍ॅसिडस्ने यक्‍त अशा समृद्ध तंतूमय आहारामुळे सोरायसिस रुग्णांमधील वजनाच्या व्यवस्थापनाला मदत मिळते. रुग्णामध्ये फ्लेअर-अप्सचे प्रमाण वाढत असेल तर त्वचारोगतज्ज्ञांसोबत आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणेही उत्तम. जेव्हा रुग्ण जीवनशैलीत बदल करतात आणि स्थिर वैद्यकीय औषधोपचार व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार योजनेचे पालन करतात, तेव्हा त्यांच्या आयुष्याचा दर्जा अधिक चांगला होण्याची शक्यता वाढते.

 

Back to top button